पीएसीच्या बहुतांश सदस्यांचा खर्गेंच्या प्रस्तावाला विरोध

ऍटर्नी जनरल, कॅगना बोलावले जाण्याची शक्‍यता कमीच

नवी दिल्ली: राफेल अहवालाविषयी विचारणा करण्यासाठी ऍटर्नी जनरल आणि कॅग यांना पाचारण केली जाईल, असे सूतोवाच संसदेच्या लोक लेखा समितीचे (पीएसी) अध्यक्ष आणि कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी केले. मात्र, त्या प्रस्तावाला पीएसीच्या बहुतांश सदस्यांचा विरोध असल्याने ऍटर्नी जनरल आणि कॅगना बोलावले जाण्याची शक्‍यता कमीच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने राफेल प्रकरणाबाबत शुक्रवारी मोदी सरकारला दिलासा दिल्यानंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. कॅगचा अहवाल पीएसीसमोर सादर करण्यात आल्याचा उल्लेख न्यायालयाने केला. मात्र, अहवाल सादर झाला नसल्याचा दावा त्यांनी केला. त्यानंतर खर्गे यांनी संसदेत कॅगचा अहवाल केव्हा सादर होणार अशी विचारणा करण्यासाठी ऍटर्नी जनरल आणि कॅगना पाचारण करण्याचा प्रस्ताव पीएसीच्या सदस्यांपुढे ठेवणार असल्याचे म्हटले. मात्र, त्या प्रस्तावाला भाजपबरोबरच विरोधी पक्षांचेही सदस्य अनुकूल नसल्याचे संकेत मिळत आहेत.

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या सदस्यांनी ऍटर्नी जनरल आणि कॅगना पाचारण करण्याच्या प्रस्तावाला कडाडून विरोध दर्शवला आहे. तशा कृतीने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचीच चौकशी करण्यासारखे होईल, अशी भूमिका त्या सदस्यांनी मांडली. अहवाल अजून पीएसीसमोर मांडण्यात आलेला नाही. त्यामुळे तो विषय पीएसीच्या अजेंड्यावर नाही. असे असताना सरकारच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना कसे काय पाचारण केले जाऊ शकते, असा सवालही त्यांनी केला. तर संसदेत अहवाल सादर झाल्यानंतरच ऍटर्नी जनरल आणि कॅगना पाचारण केले जाऊ शकते, असे तेलगू देसम पक्षाच्या सदस्याने म्हटले. पीएसीमध्ये एकूण 22 सदस्यांचा समावेश आहे. त्यात भाजपचे बहुमत (12) आहे.

शिवसेना आणि शिरोमणी अकाली दल या भाजपच्या मित्रपक्षांचा प्रत्येकी 1 सदस्य आहे. खर्गेंसह कॉंग्रेसचे 3 सदस्य आहेत. तेलगू देसम, बिजद आणि अण्णाद्रमुकचा प्रत्येकी 1 तर तृणमूल कॉंग्रेसचे 2 सदस्य आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)