कोल्हापूर: कोल्हापूर व हातकणंगले या दोन लोकसभा मतदारसंघात मतदारसंघ व मतदारसंख्या जास्त असल्याने 14 ऐवजी 20 टेबलांवर मतमोजणी करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडे पाठविला होता. त्याला गुरुवारी निवडणूक आयोगाने मान्यता दिल्याचे कळविले आहे. या निर्णयामुळे टेबलसंख्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सहाने वाढल्याने मतमोजणी प्रक्रिया वेगाने करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. दोन्ही मतदारसंघांत प्रत्येकी सहा विधानसभा मतदारसंघांत एकूण 120 टेबल लागणार आहेत.
येत्या 23 मे रोजी मतमोजणी आहे. ईव्हीएमसोबतच व्हीव्हीपॅटवरील मते रॅंडम पद्धतीने मोजली जाणार आहेत. तथापि कोल्हापूर, हातकणंगले या दोन्ही मतदारासंघांत राज्यातील उच्चांकी मतदान आणि मतदारसंघांची संख्या जास्त असल्याने अंतिम निकाल वेळेत मिळण्यासाठी पूर्वीची 14 टेबलांची रचना अपुरी पडत होती. निवडणूक विभागाने या संदर्भात निवडणूक आयोगाकडे टेबल वाढविण्यासंबंधी मागणी केली. निवडणूक आयोगाने कोल्हापूर, हातकणंगलेसह मावळ, पनवेल, चिंचवड मतदारसंघांतही जादा टेबल लावण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे या दोन्ही मतदारसंघांत प्रत्येकी 60 याप्रमाणे 120 टेबल लागणार आहे. त्यात व्हीव्हीपॅटच्या स्वतंत्र टेबलांची आणखी भर पडणार आहे. त्यामुळे एका मतदारसंघात प्रत्येकी 20 टेबल असले तरी त्यात व्हीव्हीपॅटसह निरीक्षकांच्या दोन टेबलची भर पडून ती 23 इतकी होणार आहे.