पुणे महापालिका भवन इमारतीत प्रथमोपचाराच्या सोयीचा प्रस्ताव

पुणे – महापालिका भवन इमारतीत प्रथमोपचारासाठी दिवसभर 108 नंबरची ऍम्ब्युलन्सची सोय करण्याचा प्रस्ताव महिला बालकल्याण समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा ज्योत्स्ना एकबोटे यांनी समितीच्या बैठकीत ठेवला. बुधवारी झालेल्या समितीच्या बैठकीत त्यावर चर्चा झाली. हा प्रस्ताव प्रशासनाकडे अभिप्रायासाठी पाठवण्यात आला आहे. एकबोटे यांनी याविषयी माहिती दिली.

दैनंदिन जीवनशैलीत बदल होत असल्याने अनेक ताणतणावांमुळे आरोग्यावर परिणाम होत असतो. महापालिका भवनात विविध कामांसाठी रोज हजारो नागरिक येतात. तसेच, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते, महापालिकेतील कर्मचारी, अधिकारी दैनंदिन कामासाठी भवनात असतात. महापालिका इमारतीमध्ये आरोग्याविषयी एखादी आपत्कालिन स्थिती निर्माण झाल्यास प्रथमोपचार मिळण्याची सोय, साधनसामुग्री, प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपलब्ध नाहीत. त्वरित उपचार न मिळाल्याने एखाद्याच्या जिवावरही ते बेतू शकते. त्यामुळे जुन्या आणि नव्या इमारतीमध्ये प्रथमोपचाराची सोय असावी, असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

या प्रस्तावावर महिला बालकल्याण समितीच्या बैठकीत चर्चा झाली. त्यामध्ये प्राथमिक उपचार मिळावेत यासाठी 108 नंबरची ऍम्ब्युलन्स दिवसभरासाठी म्हणजे सकाळी 10 ते संध्याकाळी 7 या कार्यालयीन वेळेत महापालिका इमारतीत सज्ज ठेवणे शक्‍य आहे का, हे तपासून पाहण्याविषयी विचार झाला. हे शक्‍य आहे का, याचा अभिप्राय महापालिकेतील आरोग्य विभागाने द्यावा, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)