प्रचाराची ‘उड्डाणे’

– अवंती कारखानीस

लोकसभा निवडणुकांसाठीचा प्रचार सुरू झाल्याबरोबर नेत्यांसाठी विमानांचे पंखे गरागरा फिरू लागले आहेत. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते आणि स्टार प्रचारक निवडणूक प्रचारादरम्यान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी चार्टर्ड प्लेन किंवा छोट्या विमानांचा वापर करतात; तर काही जण हेलिकॉप्टर्स वापरतात. हेलिकॉप्टर कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अंतर पार करते. निवडणुकांच्या काळात प्रचारसभांसाठी फिरताना वेळ हा अत्यंत महत्त्वाचा असतो.

साहजिकच मोठ्या नेत्यांना रस्त्यांवरून रहदारीतून जाणे शक्‍य नसते. त्यामुळे विमाने आणि हेलिकॉप्टर्सचा वापर केला जातो. हेलिकॉप्टर्सच्या माध्यमातून 200 ते 300 फूट उंचीवरून 100 ते 140 मैल प्रति तास इतक्‍या वेगाने अंतर कापता येते.

अनेकांना हे माहीत नसेल पण प्रचारासाठी बुक करण्यात येणाऱ्या छोट्या आकाराच्या विमानांसाठी तीन तासांना दोन ते 10.5 लाख रुपये भाडे आकारले जाते. गंमत म्हणजे इतके भाडे आकारले जात असूनही आजघडीला विमान कंपन्यांकडे छोटी विमाने नेत्यांसाठी उपलब्ध नाहीयेत आणि पुढाऱ्यांची शिफारसही कामी येत नाहीये.

आजघडीला देशभरात जवळपास 275 नागरी हेलिकॉप्टर्स नोंदणीकृत आहेत. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारे, कॉर्पोरेटस्‌च्या हेलिकॉप्टर्सचा समावेश आहे. निवडणुकांच्या काळात या हेलिकॉप्टर्सना मोठी मागणी असते. आजघडीला 2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी सर्व विमाने आणि हेलिकॉप्टर्स बुक झालेले आहेत. यामध्ये छोट्या विमानांना सर्वाधिक मागणी आहे. याबाबतची नेमकी आकडेवारी उपलब्ध नसली तरी भाजपा हा विमानांचा सर्वांत मोठा ग्राहक आहे. भाजपाने जवळपास 50 टक्‍के हेलिकॉप्टर्सचे बुकिंग करून ठेवले आहे. पक्षांनी रोज तीन तासांच्या हिशेबाने जवळपास 45 ते 60 दिवसांचे बुकिंग करून ठेवले आहे.

छोट्या विमानांसाठी ताशी 75 हजार रुपये भाडे आहे. मात्र यासाठी किमान तीन तासांसाठीचे बुकिंग केलेच पाहिजे अशी अट आहे. मग भलेही तीन तास हेलिकॉप्टरचा वापर होवो अथवा न होवो, तेवढे भाडे दिलेच पाहिजे. मध्यम आकाराच्या विमानांसाठी साडेतीन लाख रुपये प्रति तास इतके भाडे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)