“पवनामाई’ गिळंकृत करण्याचा उद्योग जोमात

नवी सांगवीतील प्रकार : नदीपात्रात भराव टाकून होतेय अतिक्रमण

सांगवी  – स्मार्ट सिटी करण्याच्या नादात नदीपात्र बुजविण्याचे काम सोयीस्कर सुरू आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि महापालिका पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत नवी सांगवीत बुल्डोझरने पवना नदीचे पात्र बुजविले जात आहे. केवळ चिरीमिरीपायी नदीपात्र बुजविण्यास ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून राडारोडा टाकण्याचे काम थांबविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. दरम्यान, बुजविलेल्या नदीपात्रात पत्राशेडही उभारण्यात आले आहेत.

सांगवी, पिंपळे गुरव परिसरात वर्षभरापासून रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. खोदकाम करून निघालेला राडारोडा थेट पवना नदीपात्रात टाकला जात आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि महापालिका पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती असूनही केवळ चिरीमिरी मिळते, म्हणून हे अधिकारी याकडे डोळेझाक करीत आहेत. मात्र, यांच्या चिरीमिरीपायी रुंद पात्र अरुंद होत आहे. नदीला मोकळा श्‍वास कधी मिळणार? नदीत मिसळणारे दूषित पाणी कधी थांबणार? कचरायुक्त दुर्गंधी आदीमुळे पवनामाईचा जीव गुदमरतो आहे. असे अनेक प्रश्‍न नागरिकांना पडत आहेत. या विविध प्रश्‍नांकडे प्रशासन उघड्या डोळ्यांनी का पाहू शकत नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

रावेत, पिंपरी, रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नवी सांगवी, दापोडी परिसरातून पुढे बोपोडीकडे पवना नदी वाहत जाते. यातील बहुतांश ठिकाणी नदीपात्र अरुंद झाले असून, नदी लोप पावते की काय अशी परिस्थिती आहे. नदीपात्राला ठिकठिकाणी वळणे आहेत. याच नदीपात्रालगत मैलावाहक ड्रेनेजलाईन आहेत. या ड्रेनेजलाईन अनेकवेळा तुंबतात. दुरुस्ती करण्यासाठी बुलडोझरला रस्ता व साहित्य नेण्यासाठी नदीपात्रात रस्ता केला जातो. रस्ता करताना नदीपात्रात राडारोडा टाकला जातो. काम झाल्यावर तो राडारोडा काढून घेतला जात नाही आणि परिणामी त्याच्यावर थरावर थर राडारोडा टाकून नदीपात्र सोयीस्करपणे बुजविले जात आहे.

नवी सांगवीतील एमएस काटे चौक ते माहेश्‍वरी चौक दरम्यान दोन महिन्यापूर्वी पवना नदीपात्रात मैलावाहक चेंबर दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले. कामासाठी नदीपात्रात रस्ता करण्यात आला. मात्र, काम पुर्ण झाल्यानंतरही राडारोडा काढून घेतला नाही. उलट त्या बनविलेल्या रस्त्यावर राडारोडा व मातीचा भराव टाकण्याचे काम जोमात सुरु आहे. तोडलेल्या बांधकामाचा, कॉंक्रिट रस्त्ता बनविण्यासाठी करण्यात आलेल्या खोदकामाचा राडारोड्याचा भराव नदीपात्रात टाकला जात आहे. यामुळे नदीचे पात्र सांगवी ते रावेतपर्यंत अगदी गटाराएवढे अरुंद बनत चालले आहे. अधिकाऱ्यांसमोर हा घडत असल्याने स्थानिक रहिवाशी व पर्यावरण प्रेमींकडून आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

शहरात नागरिकांसाठी मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. कासारवाडी येथे मेट्रोचे पिलर बनविण्याचे काम सुरु आहे. दोन महिन्यांपूर्वी याच ठिकाणचा राडारोडा पवना नदी किनारी टाकला होता. कारवाई करुन राडारोडा काढून घेण्यात होता. आता रस्ते खोदलेला राडारोडा नदीपात्रात टाकला जात आहे. डंपरच्या सहाय्याने भराव टाकून उपलब्ध जागा बळकावली जात आहे. राडारोडा पाण्यात ढकलला जात आहे.

गेली पंधरा वर्षांपासून महापालिकेच्या आयुक्तांना शेकडो लेखी निवेदन देत आहे. निवेदन दिल्यानंतर फक्त कारवाई करु म्हणतात. प्रत्यक्ष कारवाई केली जात नाही. आरोग्य विभाग व पर्यावरण विभागाकडून कारवाई करण्यास चालढकल केली जात आहे. शहरातील राडारोडा राजरोसपणे नदी किनारी टाकला जात आहे. प्रशासनाकडून दिशाभूल केली जात आहे. दिवसभरात शेकडो डंपर खाली होत आहेत. पाटबंधारे खाते, महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या दुर्लक्षामुळे हे होत आहे.
– राजू सावळे, पर्यावरण प्रेमी, सांगवी. स्मार्ट सिटी, मेट्रो पवनेच्या मुळावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)