#Prokabaddi2019 : कबड्डीच्या श्रेष्ठत्वासाठी आजपासून रणसंग्राम

हैदराबाद – सुपर टॅकल, सुपर रेड आदी आकर्षक तांत्रिक शब्दांमुळे देशाच्या घराघरात पोहोचलेल्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेस आजपासून येथे प्रारंभ होणार आहे. या खेळातील श्रेष्ठत्वासाठी विलक्षण चुरस दिसून येणार आहे.

आयपीएलइतकीच लोकप्रियता लाभलेल्या या स्पर्धेच्या सातव्या मोसमात तेलुगु टायटन्स, यू मुंबा, पाटणा पायरेट्‌स, गुजरात फॉर्च्युन जाएंट्‌स, तमिळ थलाईवाज, बंगाल वॉरियर्स, जयपूर पिंकपॅंथर्स, यू पी योद्धा, पुणेरी पलटण, हरयाणा स्टीलर्स, बंगळुरू बुल्स, दबंग दिल्ली या संघांना स्थान देण्यात आले आहे. गेल्या मोसमात बंगळुरू बुल्सने गुजरात फॉर्च्युन जाएंट्‌सचा 38-33 असा पराभव करीत अजिंक्‍यपद पटकाविले होते. यंदाही भारतीय खेळाडूंबरोबरच इराण, दक्षिण कोरिया, बांगलादेश, केनिया, नेपाळ, श्रीलंका, थायलंड आदी देशांमधील खेळाडूंचे कौशल्य पाहण्याची संधी मिळणार आहे. त्यामध्ये यांग कुन ली (दक्षिण कोरिया), मिराह शेख, फजल अत्राचेल्ली, मोहम्मद नबीबक्ष, हादी ताजिक, अबोझोर मेघामी, मोहम्मद ताघी, मोहम्मद इस्माईल (इराण), व्हिक्‍टर ओबेरो (केनया) या अव्वल दर्जाच्या खेळाडूंचा समावेश आहे. भारताच्या दीपक हुडा, संदीप नरवाल, रण सिंग आदी खेळाडूंची कसोटीच असेल.

आतापर्यंतचे “सुपरस्टार’

दीपक हुडा – अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याचा नावलौकिक आहे. पहिल्या मोसमापासून प्रत्येक मोसमात त्याने सातत्याने आपला प्रभाव दाखविला आहे. त्याने आजपर्यंत चढाईत 710 गुणांची कमाई केली असून पकडीमध्ये त्याने 75 गुण मिळविले आहेत. तो जयपूर संघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. पराभवाच्या छायेतून विजयश्री खेचून आणण्याची त्याच्याकडे क्षमता आहे.

मिराज शेख – या लीगमधील पहिला परदेशी खेळाडू म्हणून त्याला संधी मिळाली होती. इराणच्या या खेळाडूकडे चतुरस्त्र खेळ करण्याची क्षमता आहे. कुस्तीच्या करिअरला रामराम करीत त्याने या खेळात यशस्वी करिअर केले आहे. स्कॉर्पियन किकबाबत तो ख्यातनाम खेळाडू आहे. त्याने चढाईत 309 गुण व पकडीमध्ये 53 गुण मिळविले आहेत. तो दिल्लीकडून खेळत आहे.

संदीप नरवाल – यु मुंबाचा जबरदस्त अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याने आपला ठसा उमटविला आहे. चढाईत 229 गुण तर पकडीत 254 गुण अशी त्याची कामगिरी आहे. या स्पर्धेतील आजपर्यंतचा सर्वोत्तम खेळडू म्हणून त्याची ख्याती आहे. त्याने सुपर टॅकलमध्ये 23 गुणांची नोंद केली आहे.

रण सिंग- त्याने पहिल्या मोसमात जयपूर संघास विजेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. तो तमिळ संघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. चढाईत 90 गुण व पकडीमध्ये 199 गुण अशी त्याची कामगिरी आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)