ज्ञानकल्लोळ : खासदारांचे उद्योग-व्यवसाय 

ए. दत्तात्रय 
भारतात सहसा राजकारण करणे हाच एक मोठा आणि कमी कष्टात हवे तेवढे पैसे मिळवून देणारा व्यवसाय असल्याचे मानले जाते. हे खरेही आहे. महाविद्यालयीन जीवनात वाढदिवसाचे फ्लेक्‍सपासून राजकीय कारकिर्द उमलत जाते आणि मग क्रमाक्रमाने असे “गल्लीदादा’ राजकीय नेते बनत जातात. त्यांच्याकडे येणाऱ्या पैशाचा स्त्रोत कधीच “स्वच्छ’ नसतो आणि हे “उघड गुपित’ सर्वांना माहिती असते. पण तरीही कोणी काही बोलत नसते, हे विशेष. यालाच “बेरजेचे राजकारण’ म्हणत असावेत का?
आता ऐकून-वाचून आश्‍चर्य वाटेल पण आपण निवडून दिलेल्या आजवरच्या काही प्रमुख संसद सदस्यांपैकी सर्वाधिक खासदार हे समाजसेवा करीत असतात. ही बाब केवळ ऐकीव वा संकलित माहिती नसून संसदेच्या कागदोपत्री 15 व्या लोकसभेतील सदस्यांच्या संदर्भात तशी अधिकृतपणे नोंद झालेली आहेत. यासंदर्भात आकडेवारीसह उपलब्ध असणारा तपशील पुढीलप्रमाणे आहे –
125 समाजसेवक खासदार :
विद्यमान लोकसभेतील सर्वाथिक खासदारांनी म्हणजेच 125 सदस्यांनी आपला व्यवसाय “समाजसेवा’ असल्याचे नमूद केले असून त्यामध्ये प्रामुख्याने सोनिया गांधी, लालूप्रसाद यादव, प्रिया दत्त, फारुख अब्दुल्ला, मीरा कुमार, भजनलाल, टी.आर. बालू व कमलनाथ यांचा समावेश आहे.
112 शेतकरी खासदार :
लोकसभेतील 112 खासदारांनी आपण शेतकरी असल्याचा दावा केला असून, त्यामध्ये चक्क राहुल गांधी, मुलायमसिंह यादव, एच. डी. कुमारस्वामी. एच. डी. देवेगौडा, सुशीलकुमार शिंदे, शरद पवार, जयपाल रेड्डी, जितेंद्र प्रसाद, सचिन पायलट, प्रफुल्ल पटेल, नवीन जिंदल आदींचा समावेश आहे.
47 उद्योगपती खासदार : 
आपल्या खासदारांमध्ये 47 उद्योगपतींचा समावेश असून त्यामध्ये देवरा पिता-पुत्र, सुरेश कलमाडी, दिनशा पटेल, विजय मल्ल्या, राहुल बजाज आदींचा समावेश करता येईल.
42 वकील खासदार :
सध्याच्या संसदेत तब्बल 42 खासदार वकील असून त्यामध्ये प्रामुख्या कपिल सिब्बल, अरुण जेटली, सलमान खुर्शिद, सुषमा स्वराज, ममता बॅनर्जी, पी. चिदंबरम्‌, ए. राजा, असदुद्दीन ओवेसी इ.चा समावेश आहे.
खासदारांच्या वर नमूद केल्याप्रमाणे कागदोपत्री व त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार उपलब्ध असणाऱ्या व्यावसायिक माहितीच्या संदर्भात बऱ्याच रंजक बाबी स्पष्ट झालेल्या आहेत. उदाहरणार्थ, ममता बॅनर्जींनी लोकसभेवर निवडून आल्यावर “वकिली’ हा आपला प्राथमिक व मुख्य व्यवसाय असल्याचे नमूद केले होते तर त्याचवेळी सोनिया गांधी, फारुख अब्दुल्ला, ज्योतिरादित्य शिंदे, कमलनाथ इ. सगळ्यांनी सरसकट “समाजसेवा’ हेच आपले मुख्य क्षेत्र असल्याचे नमूद केले होते.
“समाजसेवक’ खासदार लोकसभेत पाठविण्यामध्ये संसदेत सर्वाधिक खासदार पाठविणाऱ्या उत्तर प्रदेशचा अर्थातच अग्रक्रम लागतो तर त्यापाठोपाठ प. बंगाल, बिहार व महाराष्ट्र यासारख्या मोठ्या राज्यातून समाजसेवा करणारे खासदार संसदेत जातात. शेतकरी-खासदार बनणाऱ्यांची संख्या अर्थातच या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. शरद पवार, जयपाल रेड्डी यांच्यासारख्या दिग्गजांपासून तर मुलायम व अखिलेश यादव आणि देवेगौडा- कुमारस्वामी या पिता-पुत्रांनी तर शेती हाच आपला मुख्य व्यवसाय तर घोषित केला होताच त्याशिवाय उत्तर-पश्‍चिम मुंबईचे खासदार गुरुदास कामत यांनी शेती हा आपला पूरक व्यवसाय असल्याचे घोषित केले होते. सर्वांत महत्त्वाचे व आश्‍चर्याचे म्हणजे भारतीय शेती आणि शेतकऱ्यांचे अग्रणी नेते चौधरी चरणसिंह यांचे चिरंजीव खासदार अजित सिंह यांनी मात्र आपल्या व्यवसायाची नोंद “संगणक तज्ज्ञ’ म्हणून केली होती व 15 व्या लोकसभेतील ते एकमेव संगणक तज्ज्ञ खासदार ठरले होते. आता बोला!
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)