समर्थकांनीच वाढवल्या उदयनराजेंच्या अडचणी

उपनगराध्यक्षांकडून पाणी टंचाईच्या प्रश्‍नावर महिलांना दुरूत्तरे

सातारा – साताऱ्यात विरोधातील भावकीचे राजकारण रंगायला सुरवात झालेली असताना खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी राजेंच्या अडचणी वाढवायला सुरुवात केली आहे. उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी समर्थ मंदिर परिसरातील पाणी टंचाईच्या प्रश्‍नावर परिसरातील महिलांना दुरूत्तरे केल्याची घटना समोर आली असून संतापलेल्या नागरिकांनी थेट लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या घटनेचा बभ्रा झाल्याने राजे समर्थकांना सारवासारव करण्याची पंचायत झाली आहे. दिल्लीस्वारीची हॅटट्रिक करण्याच्या तयारीत खासदार उदयनराजे भोसले यांनी थोरल्या पवारांच्या साक्षीने राजकीय दंड थोपटले आहेत. मात्र राजेंच्या विरोधात भावकीचा पलिता धडाडून पेटला असून उदयनराजेंना होमग्राउंडवर डोकेदुखी वाढली आहे. त्यातच साताऱ्यात कोणताही राजकीय वाद नको असे राजेंचे स्पष्ट आदेश असताना तो वाद अंगावर ओढवून जनता जनार्दनाचा रोष पत्करण्याची खुमखुमी काही जणांना आली आहे . समर्थ मंदिर परिसर म्हणजे उपनगराध्यक्ष सुहासराजेशिर्के यांचा वार्ड.तेथेच वादाची भांडी वाजू लागल्याने शहरात पाणीटंचाई बरोबर राजकीय तापही वाढू लागला आहे . उन्हाच्या वाढत्या झळांनी कासचा पाणी साठा आटल्याने शहराची घंटेवारी कोलमडली आहे, तशातच समर्थ मंदिर परिसरात गेल्या दहा दिवसापासून तीव्र पाणी टंचाई होऊ लागल्याने काही महिला व नागरिकांनी उपनगराध्यक्षांची थेट त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली . उपनगराध्यक्षांचा पारा सातवे आसमॉंन पर गेल्याने त्यांनी ठेवणीतले उपदेश सुनवायला सुरवात केली . मी फकत पिण्याच्या पाण्याची सोय करू शकतो.

वापरण्याच्या पाण्याचं तुमचं तुम्ही बघा . घराबाहेर दोन पातेली किंवा भांडी ठेवा नाही तर हौद बांधा आणि तुमच्या पाण्याच्या तक्रारी इथे सांगायच्या नाहीत तिकडे नगरपालिकेत यायचे, अशा उपनगराध्यक्षांच्या दुरुत्तरामुळे महिला व नागरिक संतप्त झाले . तुम्ही आमच्या वॉर्डचे नगरसेवक आहात म्हणून तुमच्याकडे समस्या मांडली यात आमचे काय चुकले ? आम्ही उदयनराजेंकडे बघून तुम्हाला मतदान केले आहे आता काय अडचणं असेल ते महाराजांशीच बोलू असा तीव्र  संताप नागरिकांनी व्यक्त करत उपनगराध्यक्षांशी हुज्जत घातली . झाल्या प्रकाराबाबत पीडित महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली . सातारा लोकसभेसाठी भयंकर काटामारी सुरू झालेली असताना जनता जनार्दनाला नाडवणाऱ्या कार्यकर्त्यविषयी प्रचंड रोष निर्माण झाला आहे. नागरिकांनी लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्काराचा पवित्रा घेतल्याने साताऱ्याच्या पाणीटंचाईची राजकीय संवेदनशीलता वाढली आहे.

समर्थ मंदिर परिसराची घंटेवारीच मुळात प्रचंड वादातीत आहे. समर्थ मंदिर परिसर ते धस कॉलनी व मंगळवार पेठेतून ते थेट सोहनीच्या गिरणीपर्यंतच्या भागात पाण्याची सध्या प्रचंड ओरड आहे. या भागात आता केवळ पंधराच मिनिटे पाणी येते ही मूळ ओरड आहे. त्यासाठीच नागरिकांनी सुहास राजेशिर्के यांची मदत मागितली मात्र उपनगराध्यक्षांनी त्यांना राजकीय हेका दाखवल्याने नागरिकांनी थेट जल मंदिरावर जाऊन उदयनराजेंकडे तक्रार करण्याचा पवित्रा घेतला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)