पुरस्कारांचे राजकारण (अग्रलेख)

भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाही देशात सरकारने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाला नेहमीच राजकारणाचा वास येत असल्यानेच यावर्षी सरकारने जाहीर केलेले विविध नागरी पुरस्कारही राजकारणमुक्त आणि वादमुक्त राहिले नाहीत.ज्यांना हे प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार जाहीर झाले त्यांच्या नावापासून ते ज्यांना पुरस्कार मिळाले नाहीत अशांच्या नावावरून हा गोंधळ आणि वाद सुरु झाला आहे. भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.तरीपण हा पुरस्कारही वादाचा आणि राजकारणाचा विषय ठरतो हे विशेष आहे. हा पुरस्कार कुणाला द्यावा यासाठी पंतप्रधान नावांची शिफारस करत असतात. यावर्षी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, ज्येष्ठ गायक भुपेन हजारिका आणि भारतीय जनसंघाचे नेते नानाजी देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. नानाजी देशमुख आणि भुपेन हजारिका यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर देशाच्या राजकारणातील योगदान लक्षात घेऊन माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना हा पुरस्कार मोदी सरकारने जाहीर केला .पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यावरही प्रणव मुखर्जी राष्ट्रपतीपदावर होते.

दिल्लीच्या राजकारणातील अनेक गोष्टी मला प्रणवदांमुळे समजल्या अशी कबुली मोदी यांनी अनेकवेळा दिली होती . तसेच मागील वर्षी मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमातही हजेरी लावली होती आणि तिथेही त्यांनी आपले स्पष्ट आणि परखड विचार मांडले होते. अर्थात राष्ट्रपती होण्यापूर्वी प्रणवदा कॉंग्रेसमध्ये सक्रिय होते ते दीर्घकाल मंत्री होते आणि कॉंग्रेसच्या काळात त्यांचे नाव पंतप्रधानपदासाठीही वारंवार घेतले जात असे. अशा कॉंग्रेसच्या कट्टर नेत्याचा भारतरत्न देऊन गौरव करून मोदी सरकारने लोकसभा निवणुकीच्या तोंडावर एक मुत्सद्दी डाव खेळला आहे असेच म्हणावे लागते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एकीकडे कॉंग्रेसला प्रणव मुखर्जी यांच्या भारतयत्न पुरस्काराचे स्वागत करावे लागणार आहे आणि दुसरीकडे नानाजी देशमुख यांच्या नावाला आक्षेप घेताना विचार करावा लागणार आहे. तसे पाहता नानाजी देशमुख हे महाराष्ट्रातले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून त्यांनी समाजासाठी आयुष्य वेचले. संघाचे तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंघाची निर्मिती करण्यात नानाजी देशमुख यांचा मोठा वाटा होता. पांचजन्य, राष्ट्रधर्म आणि स्वदेस या नियतकालिकांचे कामही त्यांनी काही काळ पाहिले. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतही त्यांनी कार्य केले होते. याआधी नानाजी देशमुख यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊनही गौरवले होते. त्यामुळे एक व्यक्ती म्हणून विरोध प्रकट करणे अशक्‍य आहे.मुख्य म्हणजे कॉंग्रेसच्या कार्यकाळात संघाशी संबंधित कोणाला किंवा विरोधी विचाराच्या कोणाला सर्वोच्च किंवा इतर नागरी पुरस्कार देण्याचे प्रमाण खूपच कमी होते. म्हणूनच आता नानाजी देशमुख यांच्यासारख्या संघाशी संबंधित लोकांना पुरस्कार जाहीर करताना कॉंग्रेसशी संबंधित लोकांनाही सन्मानित करण्याचे धोरण सरकारने स्वीकारलेले दिसते.

भूपेन हजारिका याना सन्मानित करून सरकारने ऐन निवडणुकीच्या काळात पश्‍चिम बंगाल आणि ईशान्य भारतातील लोकांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण हजारिका म्हणजे बंगालची अस्मिता मानली जाते . आपले सगळे जीवन संगीत आणि गाण्यासाठी वेचलेले एक पहाडी आवाजाचा गायक अशी त्यांची ख्याती होती. भुपेन हजारिका हे त्यांची गाणी स्वतः लिहीत आणि संगीतबद्ध करत. रुदाली या सिनेमातील दिल हूम हूम करे हे त्यांचे गाणे आजही लोकांच्या मनात रुंजी घालते आहे. हजारिका यांना याआधी पद्मविभूषण, पद्मश्री, दादासाहेब फाळके यासारखे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.आता भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सर्वोच्च सन्मान करण्यात आला आहे.या पुरस्काराना राजकारणाचा वास येत असला तरी दुसरीकडे ज्या लोकांना डावलण्यात आले त्या व्यक्तींच्या नावावरून वादही सुरु झाले आहेत.सरकारकडून जाहीर झालेल्या भारतरत्न पुरस्कारावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भारतरत्न पुरस्कारात स्वातंत्र्यवीर सावरकरांना डावलण्यात आल्याबद्दल आपल्या मनातील राग व्यक्त केला आहे. वीर सावरकरांच्या नशिबी पुन्हा काळे पाणी आले असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

केंद्रात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार असल्यामुळे निदान यावर्षी तरी सावरकरांना भारतरत्न पुरस्कार जाहीर होईल असे सावरकरप्रेमींना वाटले होते. पण त्यांची निराशा झाली असल्याची टीका आता होऊ लागली आहे दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही दिवसात सतत ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यासाठी शिफारस करु आणि पाठपुरावा करू अशी घोषणा केली होती. पण थोर सामाजिक काम करणाऱ्या या महान दाम्पत्याचा यावर्षी गौरव करण्यातही अपयश आल्याने सरकारला टीकेचे धनी व्हावे लागणार आहे. त्यातच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे याना पदमविभूषण जाहीर करण्यात आल्याने त्याचाही वाद सुरु झाला आहे. या निर्णयाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशाराही काही संघटनांनी दिला आहे. यावरून सामाजिक वातावरण पुन्हा एकदा गढूळ होण्याचा धोका समोर दिसत आहे. एकूणच कोणताही पुरस्कर हा आनंदाचा विषय असला तरी सरकारी पुरस्कार मात्र वादाला आणि आंदोलनाला निमंत्रण देत आहेत. त्यामुळेच लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आली असताना या पुरस्कारांचा फायदा होण्याऐवजी सरकारची डोकेदुखीच वाढली तर आश्‍चर्य वाटायला नको. सध्यातरी सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे अभिनंदन करायला हवे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)