संकटात सापडल्यानेच प्रियंकांचे ‘टेम्पल रन’ : सपा नेत्याची टीका 

उत्तर प्रदेश : नुकत्याच सक्रिय राजकारणामध्ये उतरलेल्या प्रियंका गांधी वढेरा यांच्यावर काँग्रेसतर्फे उत्तर प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाच्या असणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये प्रियंका गांधी यांनी तळ ठोकला असून त्या सध्या उत्तर प्रदेशातील विविध मंदिरांना भेटी देत आहेत.

प्रियंका गांधी यांच्या या ‘टेम्पल रन’वरून समाजवादी पक्षाचे नेते राम गोपाल यादव यांनी चांगलाच निशाणा साधला आहे. ते म्हणतात, “एखादा माणूस देवाचा धावा तेव्हाच करतो जेव्हा तो कोणत्या तरी अडचणीत फसलेला असतो आणि काँग्रेस बाबत बोलायचं झाल्यास उत्तर प्रदेशात तर काँग्रेस अडचणीतच आहे.”

तत्पूर्वी, काँग्रेसकडून सपा-बसपा आघाडीसाठी उत्तर प्रदेशमध्ये 7 जागा सोडण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. यावर बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती आणि सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी काँग्रेस सोबत कोणतीही आघाडी नसल्याने काँग्रेसने सपा-बसपाच्या आघाडीसाठी जागा सोडण्याची कोणतेही कारण नसल्याचे स्पष्ट केले होते. अशातच आता सपा नेत्याकडून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा यांच्यावर निशाणा साधण्यात आल्याने सपा बसपा आघाडी आणि काँग्रेस यांच्यातील संबंध दुरावत असल्याचे संकेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)