काँग्रेसच्या महिला आमदारावरील हल्ल्यावरून प्रियंकांचे भाजपला खडे बोल 

राय बरेली – काँग्रेसच्या राय बरेली येथील महिला आमदार अदिती सिंघ यांनी काल भाजपचे राय बरेली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार दिनेशप्रताप सिंघ यांचे बंधू अवधेश सिंघ यांनी आपल्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप लावला होता. जिल्हा पंचायत समितीचे अध्यक्ष असलेल्या अवधेश सिंघ यांच्याविरोधात मांडण्यात आलेल्या अविश्वास ठरावामध्ये मतदान करण्यासाठी निघालेल्या अदिती सिंघ यांच्या गाडीवर अवधेश सिंघ समर्थकांनी गोळीबार केल्याचं देखील अदिती सिंघ यांनी म्हंटल होतं.

दरम्यान, याच पार्श्ववभूमीवर आता काँग्रेसच्या उत्तर प्रदेश सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकार व स्थानिक प्रशासनावर जोरदार हल्ला चढवला आहे. अदिती सिंघ यांच्यावर करण्यात आलेला हा हल्ला म्हणजे लोकशाहीवर करण्यात आलेला हल्ला असून अशाप्रकारचे हल्ले राय बरेली येथे या पूर्वी कधीच झाले नव्हते असं त्या म्हणाल्या. काँग्रेसच्या महिला आमदारावर करण्यात आलेल्या या हल्ल्याचा विरोध दर्शविण्यासाठी जमलेल्या उत्तर प्रदेश काँग्रेस पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना त्या म्हणाल्या, “या हल्ल्यामध्ये हल्लेखोरांनी गावठी कट्टे, विटा आणि काठ्यांचा वापर केला असून जिल्हा परिषदेच्या सदस्यांना त्यांच्या गाड्यांमधून बाहेर काढून मारण्यात आलं आहे. एका जिल्हा परिषद सदस्याच्या तर अंगावर गाडी चढवण्यात आली आहे. ही कसली लोकशाही आहे? एवढं सगळं होऊन देखील प्रशासन मात्र बघ्याची भूमिका पार पडत आहे.” यावेळी बोलताना प्रियंका गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना धीर देताना आपण या हल्ल्याविरोधात सर्वत्र आवाज उठवू अशी ग्वाही दिली.

दरम्यान, प्रियंका गांधी या आज पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढवत असलेल्या वाराणसीमध्ये एका रोड-शोमध्ये सहभागी होणार आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)