सर्वात कमी वयाच्या महिला गिर्यारोहकाचा जागतिक विक्रम
मागे उभा मंगेश…!
प्रियांकाच्या गिर्यारोहणाच्या संपूर्ण वाटचालीत वडील मंगेश मोहिते हे ठामपणे उभे राहिले आहे. तब्बल पाच जागतिक दर्जाच्या मोहिमांचा खर्च कोटीच्या घरात गेला त्यावेळी सामान्य परिस्थितीच्या मोहिते कुटुंबीयांची प्रचंड कसरत झाली. मकालू मोहिमेलासुद्धा तब्बल सोळा लाख रुपये खर्च झाल्याचे मंगेश मोहिते यांनी सांगितले. या आव्हानात्मक करिअरसाठी या क्षेत्रात प्रायोजक मिळण्याची खरी अडचण आहे असे त्यांनी स्पष्ट केले. ऋग्वेदातील संदर्भानुसार चराचरात नारायण आहे त्यालाच भागवत पुराणात मंगेशाची उपमा आहे. जो प्रत्येक सजीवाला ठामपणे जगवतो तसेच प्रियांकाच्या या छंदाच्या व जिद्दीच्या पाठीमागे वडील मंगेश ठामपणे उभे राहिले आहेत.
सातारा – नेपाळ व चीन देशांच्या हद्दीवर असलेल्या मकालू या हिमशिखरांवर साताऱ्याच्या प्रियांका मंगेश मोहिते हिने पाऊल ठेवून पुन्हा एकदा नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. बुधवारी सकाळी सव्वानऊ वाजता तिने मकालूच्या शिखरावर पाय ठेवत या विक्रमाची नोंद केली. असा पराक्रम करणारी ती जगातील सर्वात लहान वयाची गिर्यारोहक ठरली असून प्रियांकाच्या या भीमपराक्रमाचे राष्ट्रीय स्तरावरून अभिनंदन होत आहे.
साताऱ्याच्या माउंटन गर्ल प्रियांका मोहिते हिने आपल्या गिर्यारोहणाच्या क्षेत्रात नवनवीन विक्रमांचा धडाका सुरूच ठेवला आहे. एव्हरेस्ट, ल्होत्से, माउंट किलीमांजारो, माउंट एलब्रुज या जागतिक दर्जाच्या पर्वतावर यशस्वी आरोहन करणाऱ्या प्रियांकाने मकालूवर बुधवारी सकाळी सव्वानऊ वाजता यशस्वीपणे चढाई केली. नेपाळच्या पायोनियर ऍडव्हेंचर ग्रुपकडून मकालूच्या मोहिमेत जगभरातील निवडक बावीस सदस्यांची निवड करण्यात आली आहे, त्यामध्ये साताऱ्याची प्रियांका मंगेश मोहिते एकमेव भारतीय आहे.
या ग्रुपचे प्रतिनिधित्व करणारे लाखपा शेर्पा यांनी सकाळी दहा वाजता सॅटेलाईट फोनवरून प्रियांकाच्या या भीमपराक्रमाची गोड बातमी साताऱ्यात मंगेश मोहिते यांना दिली. ताशी पंच्चाहत्तर मैल वेगाने वारे वहात असतानाही प्रियांकाने मकालूच्या माथ्यावर आपले पाऊल ठेवत नव्या जागतिक विक्रमांची नोंद केली. या शिखरावर पाय ठेवणारी प्रियांका जगात सर्वात कमी वयाची गिर्यारोहक ठरली आहे.
चीन व नेपाळ या दोन देशांच्या सीमेवर हिमालयीन महालंगूर पीक सेक्टरमध्ये असणाऱ्या माउंट मकालूची रचना ही एखाद्या पिरॅमिड प्रमाणे असल्याने त्यावर चढाई करणे एक प्रकारचे आव्हानच होते. पण प्रियांकाने आपला सातारी दमसास दाखवत प्रतिकूल परिस्थितीतील चढाईचे आव्हान यशस्वीरित्या पेलले. सात हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवर असणाऱ्या जगातील दहा पैकी पाच शिखरांवर प्रियांकाने यशस्वी आरोहन केले आहे. प्रियांकांच्या या पराक्रमाची नोंद घेत महाराष्ट्र शासनाने तिला शिवछत्रपती पुरस्कार प्रदान केला आहे. सध्या प्रियांका बेंगलोर येथे एका बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत असून कंपनीने या मोहिमेसाठी तिला खास एक महिना रजा दिली. प्रियांकाच्या या जागतिक दर्जाच्या पराक्रमाचे साताऱ्याच्याच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरील वेगवेगळ्या क्रीडापट्टूंकडून कौतुक होत आहे.