प्रियांका, गहलोत, पायलट यांनी घेतली राहुल यांची भेट

नवी दिल्ली – कॉंग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयावर ठाम असलेले राहुल गांधी यांची आजही पक्षाच्या अन्य प्रमुख नेत्यांनी भेट घेऊन त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांच्या भगिनी प्रियांका गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, उपमुख्यमंत्री सचिन पायलट या नेत्यांचा समावेश होता. राहुल गांधी यांच्या तुघलक रोडवरील निवासस्थानी आज रणदीप सुर्जेवाला आणि के. सी. वेणुगोपाल यांनीही त्यांची भेट घेतली.

कॉंग्रेस मधील अंतर्गत घडामोडींविषयी पक्षाकडून कोणतीही अधिकृत माहिती दिली जात नसल्याने पक्षांतर्गत घडामोडींविषयी माध्यमांतून बऱ्याच उलटसुलट बातम्या प्रसारीत होत आहेत. गेल्या शनिवार पासून अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांना अजून त्यात यश आलेले नाही. त्यामुळे आता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करून त्यावर सद्यस्थिती विषयी विचार विनीमय केला जाणार आहे.

दरम्यान आता विविध प्रदेश समित्यांकडून राहुल गांधी यांचे समर्थन केले जात आहे. सर्वात आधी तेलंगणा प्रदेश र्कॉंग्रेस समितीने राहुल गांधी यांचे समर्थन केले असून त्यांनीच पक्षाध्यक्षपदी राहिले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. केरळातील कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनीही राहुल गांधी यांचे समर्थन करताना म्हटले आहे की पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी तेच एकमेव योग्य व्यक्ती आहेत. पक्षाला अडचणीच्या स्थितीतून बाहेर काढण्याचे काम राहुल गांधी यांच्याखेरीज अन्य कोणीही करू शकत नाही असे त्यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)