राष्ट्रवादाच्या मुद्दयावरून प्रियांकांची मोदींवर टीका

अमेठी – कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “मै हूं मोदी’ या प्रचारतंत्रावर सडकून टीका केली. “मै हूं मोदी’ या सारख्या वाक्‍यामधून कोणता राष्ट्रवाद स्पष्ट होतो? या प्रचार तंत्रातून देशभक्‍ती आणि देशाप्रती प्रेम व्यक्‍त होत असेल. तर देश म्हणजे तरी कोण ? देश म्हणजे देशातील जनता आणि त्यांचे प्रेम आहे. जर आपल्याला केवळ स्वतःबद्दलच प्रेम असेल, तर असा राष्ट्रवाद काय कामाचा, अशी टीका प्रियांका गांधींनी केली. उत्तर प्रदेशाच्या प्रभारी सरचिटणीस असलेल्या प्रियांका गांधी पक्षाध्यक्ष आणि बंधू राहुल गांधी यांच्या अमेठी मतदारसंघामध्ये पत्रकारांबरोबर वार्तालाप करताना बोलत होत्या.

पैशाच्या बळावर गर्दी जमवणे आणि त्यांच्या समोर भाषण देणे सोपे आहे. मात्र मूळ मुद्दा नागरिकांच्या समस्या दूर करणे हा आहे. वास्तविक स्थिती खूपच वेगळी आहे. जेंव्हा नागरिकांशी संवाद साधला जातो, तेंव्हा खूपच वेगळा संदेश मिळतो. हा वेगळा संदेश कधीही पंतप्रधान किंवा भाजपच्या नेत्यांकडून स्वीकारला जात नसल्याचे दिसते, असे प्रियांका म्हणाल्या.
पंतप्रधानांनी वाराणसी मतदारसंघातील एकाही गावाला भेट दिली नाही आणि तेथील समस्यांची चौकशीही केली नाही. भाजपचे राजकारण लोकविरोधी, युवाविरोधी आणि शेतकरीविरोधी आहे. तेथे भटक्‍या प्राण्यामुळे शेतीचे नुकसान होते. अजूनही काही भागात वीज नाही, असेही प्रियांका म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)