बचतगटांना कर्ज पुरवठ्याच्या नावाखाली खासगी सावकारी

फायनान्स कंपन्याचा सुरु आहे नवा फंडा
अंकुश महाडिक

सणबूर – पाटण तालुक्‍याच्या ग्रामीण भागात फायनान्स कंपन्यांकडून आकड्यांचा खेळ करुन सर्वसामान्यांना कर्ज उपलब्ध करुन दिली जात आहेत. मात्र, त्यानंतर व्याज भरुनच ग्राहक मेटाकुटीस येत आहेत. एकंदरी पाटण तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील जनतेच्या अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन फायनान्स कंपन्यांना पाटण तालुक्‍यात विशेषत: ढेबेवाडी परिसरात एकप्रकारचा सावकारीचा गोरखधंदाच सुरु केल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र सरकारच्या खासगी सावकारीविरुद्ध कायद्यामुळे गेले काही दिवस सुप्त अवस्थेत असलेल्या फायनान्स कंपन्यांनी आपला मोर्चा ढेबेवाडी परिसरातील ग्रामीण भागात वळवल्याचे दिसते. ज्यामध्ये अनेक दक्षिण भारतातील कंपन्यांनाचा समावेश आहे. ज्यांची कार्यालय कराडसारख्या शहरात आहेत. ढेबेवाडी परिसरात महिला बचतगटांचे फार मोठे जाळे आहे. अनेक गरजू महिला या गटांच्या माध्यमातून आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करतात. नेमके हेच या कंपन्यांनी ओळखून या भागांचा अतिशय सूक्ष्म असा सर्वे केल्याचे दिसते. जसे कि गावामध्ये एकूण बचतगट किती, त्यांची सदस्य संख्या किती, यामधील सुशिक्षित किती, आतापर्यत कोणकोणत्या वित्तीय संस्थांकडून आर्थिक मदत घेतलेली आहे व त्यांचे परतफेडीचा तपशील काय आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यासारखी बारीकसारीक माहिती मिळवण्याच्या कामामध्ये त्यांना स्थानिक लोकांची खूप मोठी मदत होते. या स्थानिक लोकांना कंपनीच्या माध्यमातून अनेक अमिषे दाखवली जातात. आणि त्यांचेकडून आवश्‍यक ती माहिती गोळा केली जाते. सहकार खात्याचे सर्व नियम धाब्यावर बसवून या कंपन्या राजरोसपणे आपला सावकारीचा धंदा करत आहेत. मुळात ग्रामीण भागामध्ये लोकांच्या कर्जाच्या गरजा कमीत कमी 1 हजारांपासून जास्तीजास्त 50 हजारापर्यंत मर्यादित असतात. एवढे कर्जसुद्धा या लोकांना बॅंका अथवा वित्तीय संस्थाकडून सहजपणे उपलब्ध होत नाही. म्हणून लोक फंड, भिशी, बचतगट यासारखे पर्याय निवडतात.

बॅंका, वित्तीय संस्थांपेक्षा या कंपन्यांचे व्याजदर जास्त असतात. परंतु भरमसाठ कागदपत्र, जमीनदार, शेअर्स, इमारत निधी, नाहरकत दाखले, प्रोसेसिंग फी, यापैकी कोणत्याही गोष्टीची अट नाही फक्त कर्जदार महिला असावी. ती बचतगट सदस्य असावी, जामीनदार म्हणून संपूर्ण गट जामीनदार असतो. जलद प्रक्रिया आणि सर्वात महत्वाचे म्हणजे व्याजदर दरमहा 1 रुपये 60 प्रती शेकडा अशी अनेक गोंडस आमिषे दाखवून कर्ज घेण्यास भाग पाडले जाते. आणि मग सुरु होते खरी सावकारी. कर्ज रक्कमेनुसार प्रत्येक आठवड्याला एक ठराविक रक्कम हप्ता म्हणून देणे बंधनकारक असते ही वसुली करण्यासाठी गुंडप्रवृत्तीची माणसे ठेवलेली असतात. हप्त्याची रक्कम वेळेत न मिळाल्यास कर्जदारास धमकावणे, मारणे प्रसंगी अपहरण देखील करण्यास मागेपुढे पहिले जात नाही.

या वसुलीच्या भितीपोटी कर्जदार काहीही करून हप्ते भरण्याचा प्रयत्न करतात. मग प्रसंगी घरातील दागदागिने गहाण ठेवले जातात, दुभती जनावरे विकली जातात. परंतु हप्ते वेळेत भरले जातात आणि जर त्यातून पण एखादा थकबाकीमध्ये गेला तर त्याचे कर्ज त्या गटातील इतर सदस्यांकडून वसूल केले जाते. मुळात ग्रामीण भागातील लोकांना मासिक 1 रुपये 60 पैसे व्याजाचा अर्थ समजत नाही आणि हेही सरळव्याज नसून चक्रवाढ व्याज पध्दतीने वसूल केले
जाते. म्हणजे ते वार्षिक जवळपास 40 टक्क्‌यांनी वसूल केले जाते. यामध्ये अनेक सर्वसामान्य कुटुंबे कर्जबाजारी झाल्याचे दिसते. या फायनान्स कंपन्यांना वेळीच आवरले नाही तर ढेबेवाडी परिसरातील ग्रामीण भागात सावकारीतून कर्जबाजारी होऊन विदर्भ, मराठवाड्या सारख्या आत्महत्या होतील.

ढेबेवाडी परिसरातील खेडेगावामधील अनेक बचतगट या फायनान्स कंपन्यांच्या आमिषाना बळी पडलेले आहेत याबाबत प्रशासनाने वेळीच कारवाई केली तर पुढील अनर्थ टळेल.
संदीप जाधव, उपसरपंच, सणबूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)