तलाठी कार्यालयात खाजगी संगणक कर्मचाऱ्यांची मनमानी

हेलपाटे घालून शेतकरी हैराण

फलटण – तलाठी कार्यालयात नियमबाह्यपणे नेमण्यात आलेल्या खाजगी संगणक कर्मचारी यांच्या मनमानी कामकाजामुळे फलटण तालुक्‍यातील शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे. जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून खाजगी संगणक कर्मचारीमुक्त मंडलाधिकारी व तलाठी कार्यालय करण्यासाठी आदेश काढावेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

शेतकऱ्यांसाठी तलाठी कार्यालय हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. विविध कामांसाठी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयात जावे लागते. तलाठी कार्यालयांमधून शेतकऱ्यांना होणारा जाच कमी करण्याचा प्रयत्न म्हणून सात-बारा ऑनलाइनवर करून त्याचे वितरण करणे हा राज्यशासनाच्या उद्देश होता. याचबरोबर खरेदी खत व वारस नोंद, बोजा दाखल करणे, मृत्यूपत्र किंवा बक्षीसपत्रामधील नोंदसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याला तलाठी कार्यालयात न येता ऑनलाईन अर्जाची सोय ऑनलाईनच्या माध्यमातून दिली जाणार आहे. तलाठी कार्यालयांमध्ये शेतकऱ्यांची वर्दळ कमी करून ऑनलाइन सेवा वाढवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असताना फलटण तालुक्‍यातील तलाठी कार्यालयांमधून शेतकऱ्यांना होणारा जाच कमी होताना दिसत नाही.

विविध प्रकारच्या कामासाठी शेतकरी तलाठी कार्यालयात गेल्यास नेमून दिलेल्या तलाठी ऐवजी त्याला खाजगी संगणक कर्मचारी यांना भेटायला सांगितले जाते. जी कामे डिजिटल सिग्नेचरद्वारे तलाठी यांनी स्वतः करावयाची आहेत ती कामे खाजगी संगणक कर्मचारी नियमबाह्य नेमून डिजिटल सिग्नेचर त्यांच्या ताब्यात देऊन केली जात आहेत. खाजगी संगणक कर्मचारी सर्व्हर बंद आहे, इंटरनेट सुरू नाही, प्रिंटर बंद आहे, इतर महत्वाचे काम सुरू आहे अशी कारणे सांगून परत पाठवले जात आहे. किरकोळ कामासाठी तसेच सातबारा खातेउतारा या नकला देण्यास अनेक दिवस लावले जात आहेत.

या सर्व गोष्टीकडे मंडलाधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांचे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. आजअखेर अनेक सातबारा नोंदी ऑनलाईन करतेवेळी अनेक चूका आहेत. त्याकडे महसूल प्रशासन कोणत्याही प्रकारचे लक्ष देत नाही. ऑनलाईनपेक्षा पूर्वीची हस्तलिखित पध्दतच चांगली होती, अशी म्हणायची वेळ शेतकऱ्यांच्यावर आली आहे. जिल्हाधिकारी यांनी याप्रकरणी लक्ष घालून खाजगी संगणक कर्मचारीमुक्त मंडलाधिकारी व तलाठी कार्यालय करण्यासाठी आदेश काढावेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)