मानुषी छिल्लर “मिस इंडिया 2017′ झाल्यापासून तिच्या बॉलिवूड पदार्पणाचे अंदाज वर्तवले जायला लागले होते. किमान वर्षभर तरी ती “मिस वर्ल्ड’च्या उपक्रमांमध्ये बिझी होती. त्यानंतर सलमानने तिला लॉंच करायचे ठरवले होते. तर मानुषीने मात्र अनेकवेळा आमिर खानबरोबर काम करण्याची ईच्छा व्यक्त केली आहे. मात्र आता आमिर खानच्या ऐवजी अक्षय कुमारच्या बरोबर ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावरील ऐतिहासिक सिनेमामध्ये अक्षय आणि मानुषी लीड रोलमध्ये असणार आहेत. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली होणाऱ्या या सिनेमात संयुक्ताच्या रोलसाठी मानुषीला साईन करण्यात आले आहे. आदित्य चोप्राच्या मते मानुषीचा स्क्रीन प्रेजेंटेशन सेन्स खूप चांगला आहे. या ऐतिहासिक प्रेमकथेवरील चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी करणार आहेत.
या सिनेमातून पदार्पण करण्यासाठी मानुषी सध्या जोमाने तयारी करते आहे. ऍक्टिंग आणि डान्सचे वर्कशॉप ती करते आहे. काही दिवसांपूर्वी ती फराह खानच्या प्रॉडक्शनमधून पदार्पण करणार असल्याचे बोलले गेले होते. तर ती रणवीर सिंहबरोबर काम करणार असल्याचीही अफवा पसरली होती. ती नक्की कोणाबरोबर काम करणार आहे, याबाबत तिच्यावतीने कोणतेही स्पष्टिकरण देण्यात आलेले नाही.