कैद्यांना मिळणार माफी (भाग-१)

गुन्हेगारांसाठी सुधारगृहे बनण्याऐवजी आपल्याकडील तुरूंग यातना आणि गुन्ह्यांची केंद्रे बनू लागले आहेत. समाजात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करायची असल्यास कायदेशीर प्रक्रियेतील अडथळे दूर करण्याबरोबरच तुरुंगांची परिस्थिती सुधारणे आणि कैद्यांशी संवेदनशील व्यवहार करणे गरजेचे आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त वयस्कर तसेच गंभीर आजारांनी ग्रस्त कैद्यांना माफी देण्याचा स्वागतार्ह निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, आता तुरुंगांची दुरवस्था दूर करण्यासाठीही प्रयत्न व्हायला हवेत.

सद्यःस्थितीत शिक्षा झालेल्यांमध्ये 27 टक्के तर कच्च्या कैद्यांमध्ये 29 टक्के कैदी अशिक्षित आहेत. त्याचप्रमाणे अनुक्रमे 43 आणि 42 टक्केच कैदी मॅट्रिकपेक्षा कमी शिकलेले आहेत. मॅट्रिकपेक्षा अधिक शिकलेल्यांची संख्या अनुक्रमे 30 आणि 29 टक्केे आहे. एनसीआरबीने दिलेली ही आकडेवारी आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने उच्च न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील तुरुंगांमध्ये कर्मचाऱ्यांची स्वीकृत संख्या 77 हजार 230 एवढी असून, 31 डिसेंबर 2017 पर्यंत प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांची संख्या मात्र 52 हजार 642 एवढीच होती. म्हणजेच, स्वीकृत संख्येपेक्षा 24 हजार 588 कर्मचाऱ्यांची कमतरता असून, तीस टक्यांहून अधिक पदे रिक्त आहेत.

कैद्यांना मिळणार माफी (भाग-२)

-Ads-

देशभरात 134 मध्यवर्ती कारागृहे आहेत. उपकारागृह, जिल्हा कारागृह, मध्यवर्ती कारागृह, महिला कारागृह आणि खुली कारागृहे अशी देशातील तुरुंगांची संरचना आहे. तुरुंगांच्या एकंदर संख्येच्या 50 टक्के उपकारागृहे, एकतृतीयांश जिल्हा कारागृहे, आणि एकदशांश मध्यवर्ती कारागृहे आहेत. 2015 मध्ये देशातील एकंदर तुरुंगांची संख्या 1401 एवढी होती. त्यातील 741 उपकारागृहे, 379 जिल्हा कारागृहे तर 134 केंद्रीय कारागृहे होती. महिला कारागृहांची संख्या 18 (एकूण कारागृहांच्या एक टक्का) होती. अन्य कारागृहांमध्ये खुली कारागृहे, बालसुधारगृहे, विशेष कारागृहे यांचा समावेश आहे. भारतातील प्रत्येक तुरुंगात सरासरीपेक्षा 14 टक्के कैदी अधिक आहेत. प्रीझन स्टॅटिस्टिक्स इंडिया 2015 या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे. 1401 कारागृहांपैकी 149 कारागृहांत क्षमतेपेक्षा 200 टक्के कैदी असून, तमिळनाडूतील इरोड जिल्हा कारागृहात तर क्षमतेपेक्षा 1250 टक्के अधिक कैदी असल्याचे 2015 मध्ये दिसून आले होते. ज्या जागेत 16 कैद्यांना ठेवायचे तेवढ्या जागेत 200 कैद्यांना कोंबण्यात आल्याचे दिसून आले. महाराष्ट्रातील रोहा उपकारागृहात तीन कैद्यांना लागणाऱ्या जागेत 35 जणांना डांबून ठेवण्यात आल्याचे दिसून आले होते. येथे क्षमतेच्या 1166.7 टक्के अधिक कैदी असल्याचे दिसून आले.

– अॅॅड. प्रदीप उमाप

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)