कैद्यांना मिळणार माफी (भाग-२)

गुन्हेगारांसाठी सुधारगृहे बनण्याऐवजी आपल्याकडील तुरूंग यातना आणि गुन्ह्यांची केंद्रे बनू लागले आहेत. समाजात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करायची असल्यास कायदेशीर प्रक्रियेतील अडथळे दूर करण्याबरोबरच तुरुंगांची परिस्थिती सुधारणे आणि कैद्यांशी संवेदनशील व्यवहार करणे गरजेचे आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त वयस्कर तसेच गंभीर आजारांनी ग्रस्त कैद्यांना माफी देण्याचा स्वागतार्ह निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, आता तुरुंगांची दुरवस्था दूर करण्यासाठीही प्रयत्न व्हायला हवेत.

कैद्यांना मिळणार माफी (भाग-१)

कैद्यांची वाढती संख्या विचारात घेता गेल्या वर्षी विधी आयोगाने न्यायालयांकडून अवलंबिण्यात येणाऱ्या जामिनाच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केला होता. विधी आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष बी. एस. चौहान यांनी सादर केलेल्या अहवालानुसार, भारतातील जामिनाची सध्याची प्रक्रिया योग्य नाही. धनिकांना तसेच शक्तिलशाली व्यक्तींना आपल्या देशात लगेच जामीन मिळतो. मात्र, अशिक्षित आणि गरीब लोक तुरुंगात खितपत पडतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी कायद्यात बदल करण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली होती. ज्याला सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा झाली आहे, त्याने तीन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा भोगली असल्यास तो स्वतःच जामिनास पात्र ठरावा, अशीही एक शिफारस होती. तुरुंगांची स्थिती बदलण्यासाठी 2015-16 या आर्थिक वर्षात तुरुंगांच्या बजेटमध्ये 20.5 टक्यांची वाढ करण्यात आली होती. त्यापूर्वीच्या वर्षी 4,27,881.2 लाख रुपयांच्या तरतुदीच्या तुलनेत 2015-16 मध्ये 5,15,763.1 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, या तरतुदींमध्ये राज्यवार फरक दिसून येतो. मिझोराम, उत्तर प्रदेश, मेघालय, दमण आणि दीव तसेच आसाममध्ये तुरुंगांच्या खर्चात वाढ करण्यात आली, तर आंध्र प्रदेश, उत्तराखंड, तेलंगण, दिल्ली आणि कर्नाटकमध्ये पूर्वीपेक्षा खर्चात कपात झाल्याचे दिसून आले. तुरुंगातील कच्च्या कैद्यांना आर्थिक मदत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विविध कंपन्यांच्या मदतीने गेल्या महिन्यात योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत किशोरवयीन आरोपी, मनोरुग्ण आरोपी, तसेच निम्मी शिक्षा भोगलेल्या कैद्यांना कायदेशीर मदत दिली जाणार आहे. तसेच लहानसहान अपराधांबद्दल गुन्हा दाखल झालेल्या कच्च्या कैद्यांनाही कायदेशीर प्रक्रियेसाठी आर्थिक मदत दिली जाईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तुरुंगांच्या स्थितीविषयी चर्चा करताना महिला कैद्यांना दुर्लक्षून चालणार नाही. विविध कारणांसाठी तुरुंगात गेलेल्या महिलांपैकी 50.5 टक्केा महिला 30 ते 50 वयोगटातील असल्याचे समोर येते. 31.3 टक्केक महिला कैद्यांचे वय 18 ते 30 च्या दरम्यान आहे. त्यामुळे तुरुंगात लैंगिक शोषण, हिंसा आणि दुर्व्यवहाराच्या तक्रारी येतात आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रणाली विकसित करण्याची शिफारस करण्यात आली आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेत (सीआरपीसी) सुधारणा करून महिला कैद्यांना दिलासा देण्याचाही प्रयत्न सुरू आहे. एकतृतीयांश शिक्षा भोगलेल्या महिला कैद्यांना शिक्षेत सूट देण्याची मागणी महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने केली आहे. विमेन इन प्रीझन नावाच्या अहवालात जामीन मिळाल्यानंतर महिला कैद्यांच्या सुटकेसाठीचा कमाल कालावधी ठरविण्याची शिफारस करण्यात आली आहे. महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने गेल्या महिन्यात केलेल्या अध्ययनानुसार, महिला कैद्यांना त्यांच्या मुलांना सोबत ठेवण्यासाठीचा कालावधी वाढविण्याची सूचना विचारार्थ ठेवली आहे. आतापर्यंत नियमानुसार वयाच्या सहाव्या वर्षापर्यंतच मुले कैदी महिलेसोबत राहू शकतात. काही तज्ज्ञांच्या मते ही वयोमर्यादा वाढविण्याची गरज आहे. छत्तीसगड, उत्तराखंड, दिल्ली, गोवा आणि उत्तर प्रदेशात क्षमतेपेक्षा अधिक महिला कैदी तुरूंगवास भोगत आहेत. गोव्याच्या तुरुंगात तर पुरुषांपेक्षा महिला कैद्यांची संख्या अधिक आहे. तेथील तुरुंगांत क्षमतेपेक्षा 20 टक्के अधिक महिला कैदी असून, पुरुषांची संख्या मात्र क्षमतेपेक्षा 35 टक्यांनी कमी आहे. ही आकडेवारी 2016 ची आहे. या सर्व विवेचनावरून तुरुंगांमधील स्थितीचा अंदाज कुणालाही येऊ शकेल. दोषी ठरविलेल्या कैद्यांच्या तुलनेत कच्च्या कैद्यांमध्ये नैराश्याचे प्रमाण अधिक भयावह असल्याचे दिसून येते. अर्थात, नैराश्यााची लक्षणे दोन्ही प्रकारच्या कैद्यांमध्ये दिसून येतात. निराशा आणि आत्महत्या करण्याची प्रवृत्ती यांचा संबंध मिळालेल्या शिक्षेचे स्वरूप आणि शिक्षेच्या कालावधीवर अवलंबून असतो, असे जाणकार सांगतात. प्रलंबित प्रकरणांमुळे कैद्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच कारागृहे अपुरी पडत असून, तुरूंग कर्मचाऱ्यांची संख्याही कमी आहे. अशा स्थितीत तुरुंगातील परिस्थिती चांगली राहणे शक्य च नाही. ही स्थिती लवकरात लवकर बदलायला हवी.

– अॅॅड. प्रदीप उमाप


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)