रेल्वे, संरक्षण खात्याच्या प्रश्‍नांना प्राधान्य – गिरीश बापट

शासनाच्या विविध योजनांचे लाभार्थी वाढवण्याचे उद्दिष्ट

पुणे – रेल्वे आणि पुण्यातील संरक्षण खात्याचे प्रश्‍न या विषयात लक्ष घालणार असून, अधिवेशनादरम्यान दिल्लीत या संदर्भात संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे खासदार गिरीश बापट यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

संरक्षण खात्याच्या जमिनी, विमानतळ या संदर्भात संरक्षण खात्याकडे काय पाठपुरावा केला आहे, याची माहिती माजी खासदार अनिल शिरोळे यांच्याकडून घेणार असून, त्यातील प्रलंबित कामांचा पाठपुरावा करणार आहे. मेट्रोला गती देणे, एचसीएमटीआर प्रकल्प मार्गी लावणे हे उद्दिष्ट असल्याचे बापट यांनी नमूद केले. दप्तरदिरंगाई न होता झटपट निर्णय करून, निधी कमी पडला तर तो उपलब्ध करून पुण्यातील विकासाची कामे गतीने पार पाडण्यासाठी नियोजन केले आहे. गेल्या काही दिवसांत जिल्हा आढावा बैठक, दुष्काळी स्थिती, सासवड विमानतळ, पालखी मार्ग या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. तसेच शहरातील प्रश्‍नांसंदर्भात महापालिका आयुक्तांशीही चर्चा झाली आहे.

केंद्रातील अधिवेशन संपल्यानंतर पीएमआरडीए आणि अन्य विषयांच्या बैठका घेण्यात येणार आहेत. महापालिका, जिल्हा स्तरावर जे प्रकल्प सुरू आहेत, त्याचा दर आठवड्याचा अहवाल संबंधित प्रमुखांकडून मागवला आहे. हे प्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजेत. यामध्ये टाळाटाळ करणे आणि धिम्या गतीने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्याचाही अहवाल द्यावा, असेही आदेश दिल्याचे बापट यांनी स्पष्ट केले.

विधानसभा जिंकणार
विधानसभेसाठी युतीच्या माध्यमातून जास्त जागा जिंकण्याचा संकल्प आहेच. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलून पावले टाकणार आहे. संघटना आणि मतदार हातात हात घालून, जास्तीतजास्त जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बापट म्हणाले.

विस्तारक नेमणार
केंद्र आणि राज्याने केलेल्या विविध योजनांचे लाभार्थी वाढवण्याचे उद्दिष्ट राहणार आहे. विधानसभेपर्यंत ते पूर्ण करणार आहे. राहिलेल्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी शहर आणि जिल्हा स्तरावर प्रत्येकी पाच विस्तारक नेमणार असून, त्यांच्यामार्फत या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत, असे बापट यांनी सांगितले.याशिवाय आमदार आणि नगरसेवक यांनाही विविध नियोजनाच्या जबाबदाऱ्या देणार असल्याचे बापट यांनी नमूद केले.

कसबा पेठेतील मेट्रो विरोधावर तोडगा काढण्याचा प्रयत्न
कसबा पेठेत भुयारी मेट्रो आणि स्टेशनला स्थानिक रहिवाशांकडून विरोध होत आहे. त्याच्यावर अद्याप तोडगा निघाला नाही. त्यामध्ये काही राजकीय विरोधकांनी नागरिकांची दिशाभूल केल्याने ते रहिवासी चिंतीत झाले. त्याविषयी बापट म्हणाले की, षयेथे असलेल्या दादोजी कोंडदेव शाळेमध्ये स्टेशनचा पर्याय दिला आहे. त्यामुळे कोणीही विस्थापित होण्याचा प्रश्‍न उरणार नाही. मात्र, येथे ते स्टेशन करत असताना वाहतूक, डायव्हर्जन्स, पार्किगची जागा आणि अन्य काही महत्वपूर्ण बाबींचा अभ्यास होणे आवश्‍यक आहे. त्याचा विचार सुरू आहे.’

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)