नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने आज आणखी एका वक्त्यव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट दिली आहे. ६ मे रोजी मोदींनी एका प्रचारसभेत दिवंगत राजीव गांधी यांच्यावर ‘भ्रष्टाचारी नंबर-1’ अशी टीका केली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. मात्र, यामध्ये सुद्धा मोदींना निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट मिळाली आहे. यापूर्वी मोदींना तब्बल आठ प्रकरणांमध्ये क्लीन चिट देण्यात आली आहे.
कर्नाटकच्या चित्रदुर्गमधील सभेत मोदींनी पुलवामाचा उल्लेख करत बालाकोट हवाई हल्ल्यातील हिरोंसाठी मतदान करा अशी हाक दिली होती. तर, महाराष्ट्रातील वर्धा, लातूर, नांदेड आणि राजस्थानमधील बाडमेर, उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथील सभांमध्ये केलेल्या वक्तव्यांवरून मोदींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यातसुद्धा निवडणूक आयोगाने मोदींना क्लीन चिट दिली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या अशा निर्णयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘क्लीन चिटचा बादशाह’ अशी उपमा दिली आहे.