पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उल्लू बनवले

आ. आनंदराव पाटील : उदयनराजे हे कॉंग्रेसला हवे असलेले उमेदवार

सातारा – आगामी लोकसभा निवडणुक देशाच्या राजकारणाची दिशा ठरविणारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उल्लू बनवले असून ते पुन्हा एकदा हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न करत आहे. कॉंग्रेसला हवे असलेले उमेदवार आघाडीच्या माध्यमातून उदयनराजे भोसले यांच्या रुपाने मिळाले आहेत. त्यांच्या मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आपण सर्वांनी एकदिलाने काम करूया, असे आवाहन कॉंग्रेसचे आमदार आनंदराव पाटील यांनी केले.

दि.24 रोजी खा. शरद पवारांच्या उपस्थितीत कराड येथे होणाऱ्या मेळाव्याचे नियोजन करण्यासाठी येथील जिल्हा कॉंग्रेस कमिटीमध्ये आज महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खा.श्री. छ. उदयनराजे भोसले, कार्याध्यक्ष विजयराव कणसे, धैर्यशील कदम, जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील, श्रीनिवास थोरात, सातारा शहराध्यक्ष रवींद्र झूटिंग, सुनील काटकर, जितू खानविलकर,अविनाश फाळके, नंदा जाधव, बाळासाहेब शिरसाठ, कल्याण राक्षे, पीपल्स रिपब्लिकनचे युवराज कांबळे, धनश्री महाडिक, पंकज चव्हाण, रजनी पवार, नम्रता उतेकर, किशोर बाचल, धैर्यशील सुपले, बाबासाहेब कदम आदी उपस्थित होते.

आनंदराव पाटील पुढे म्हणाले, आज महाराष्ट्रात राजकारण गढूळ व्हायला लागले आहे. गेल्या साडेचार वर्षांत मोदीनी सर्वांनाच उल्लू बनवले आहे. देशात पुन्हा एकदा हुकूमशाही आणण्याचा जातीयवादी पक्षाचा डाव आहे. सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये आघाडीचा उमेदवार म्हणून उदयनराजे भोसले यांचे नाव पुढे आल्याने कॉंग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांचे प्रामाणिकपणे काम करेल. उदयनराजे यांना प्रचंड मताधिक्‍याने निवडून देण्यासाठी आपण सर्वांनी मतदानाची टक्केवारी वाढवूया असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

उदयनराजे भोसले यावेळी म्हणाले, आज लोकसभा निवडणूकीकडे केवळ निवडणूक म्हणून न पाहता परिवर्तनाची चळवळ म्हणून पहावे. हा विचार केवळ सातारा लोकसभा मतदार संघासाठी न करता राज्यभर, देशभर याचा विचार होणे गरजेचे आहे. सध्याच्या सरकारने राबविलेल्या धोरणामुळे देशाची अधोगती झाली आहे. देशामध्ये चांगली परिस्थिती निर्माण करायची असेल तर बदल ही काळाची गरज आहे. इथे केवळ फक्त माझा विचार न करता, सर्वांनी देशाच्या विचार करावा. रवींद्र झूटिंग म्हणाले, कराड येथे24 रोजी उदयनराजे यांच्या प्रचाराची सभा होत आहे. त्यांच्यासाठीच आपण काम करणार आहोत. ते या निवडणुकीत निवडून येणार हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही

बाळासाहेब बागवान म्हणाले, 24 ला आघाडीची सभा होते आहे. विजयासाठी कुठल्याही ज्योतिषाची आवश्‍यकता नाही, पण आपण गाफील राहून चालणार नाही, कॉंग्रेस राष्ट्रवादी दोन्ही पक्ष झोकून देऊन काम करत आहेत. पृथ्वीराज बाबा गेल्या तीन महिन्यापासून कामाला लागले आहेत. 24 रोजी कराड येथे होणाऱ्या सभेसाठी, उदयनराजे यांचा विजय यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपल्या गावातील वाडी- वस्तीवर प्रचार केला पाहिजे. शरद पवार, पृथ्वीराज बाबा यांचे विचार गावागावात गेले पाहिजेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)