प्रिपेअर फॉर हॉट समर

उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे बदलत्या वातावरणाशी जुळवून घेताना अनेकांना आजारपणाचा सामना करावा लागतो. पण या वातावरणाशी जुळवून घेताना आपण काय बदल केले पाहिजेत? पुण्याचा पारा आता वाढला आहे. या हॉट वातावरणामुळे सगळेच हैराण झालेले आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झालेल्या उन्हाने आता आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे. उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढत आहेत. अक्षरश: अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत.

उन्हाच्या तडाख्यामुळे जीव अगदी कासावीस होतो. उन्हामध्ये प्रचंड प्रमाणात येणारा घाम, उकाडा, चिकटपणा यामुळे सगळेच जण खूप त्रस्त झाले आहेत. त्यामुळे अनेकांना उन्हाळा नकोसा होतो. अशा वेळी उष्णतेच्या त्रासापासून बचाव करण्याची गरज प्रत्येकालाच भासते. या हॉट वातावरणात कूल राहण्यासाठी पुढे काही उपाय दिले आहेत. ते करून बघा.

सुती कपडयांचा वापर
उन्हाळ्यात जास्तीत जास्त सुती कपडयांचा वापर करावा. जेणेकरून सुती कापड उष्णता शोषून घेईल. तसेच हे कपडे सैल व सुटसुटीत असावेत. उकाडयात कॉलेजिअन्ससाठी जीन्सऐवजी लेगीन्सचा पर्याय उत्तम आहे. घट्ट कपडे टाळावेत. नायलॉन आणि सिंथेटिक कपडे घालणे शक्‍यतो टाळण्याचा प्रयत्न करावा. कारण नायलॉन कापड अंगाला आलेल्या घामाला चिकटतं त्यामुळे घामाचा ओलावा कायम राहतो. आणि ते आपल्या शरीराला त्रासदायक ठरते.

भरपूर पाणी प्या
उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे आपल्याला भरपूर तहान लागते. तहान भागवण्यासाठी खूप पाणी पितो. भरपूर पाणी पिणं हे उत्तमच आहे. पण काही वेळा त्याचा जेवणावर परिणाम होतो. आपली भूक मंदावते. या काळात दिवसातून बारा ग्लास पाणी प्यावं. उकाडयातून घरी थकून-भागून आल्यावर लगेच पाणी पिणं नेहमी टाळावं. घरी आल्यानंतर फ्रेश होऊन मगच आरामात बसून पाणी प्यावं.

शीतपेयांचा अतिवापर टाळा
आजच्या फास्ट जीवनशैलीमध्ये कोला, सोडा तसेच विविध प्रकारचे कोल्ड्रिंक्‍स ही शीतपेयाचा अविभाज्य अंग झालेली आहेत. उन्हाचा ताण कमी करण्यासाठी आपण पटकन एखादी शीतपेयाची बाटली काढून तोंडाला लावतो. परंतु कधीतरी हे शीतपेय पिणं ठीक आहे. रोजच व्यसन लागल्याप्रमाणे त्याचं सेवन केल्यास आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. या कोल्ड्रिंक्‍सऐवजी ताज्या फळांचा रस, लिंबूपाणी, नारळपाणी, ताक इत्यादी प्यावं. त्यामुळे शरीराला स्फूर्ती येते आणि ऊर्जाही मिळते.

उन्हाळ्यातला आहार
बाहेरच्या पदार्थाची चव आपल्या जीभेवर नेहमीच असते. परंतु उन्हाळ्यात शक्‍यतो बाहेरचे पदार्थ टाळा. कारण त्यामुळे फुड पॉयझन अर्थात अन्नातील विषबाधा होते. शिवाय कावीळ, टायफॉइड, कॉलरा व अतिसार अशा रोगांना आमंत्रण मिळतं. रोजच्या आहाराकडे बारकाईने लक्ष द्यावं. रोज शरीराला पौष्टिक घटक आणि पोषक तत्त्वं मिळत आहेत की नाहीत याकडे लक्ष द्या. उन्हाळ्यात शिजवलेले अन्न लवकर खराब होण्याची शक्‍यता असते, त्यामुळे शिळे अन्न टाळावं. जड आणि तिखट मसालेदार-तळलेले पदार्थ खाऊ नयेत. सहज पचणारं हलकं भोजन घ्यावं.

स्नायूंची काळजी घ्या
उन्हाळ्यात प्रचंड प्रमाणात उष्णता असल्याने घाम येतो. आणि आपल्या शरीरातले द्रवाचं प्रमाण झपाटयाने कमी होते. त्यामुळे शरीरातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियम या घटकांची कमतरता निर्माण होऊन स्नायूंमध्ये पेटके येण्याचं प्रमाण वाढतं. अशा वेळी वेदना वाढल्यास त्या भागावर बर्फ लावा. काही वेळा पाणी प्यायल्यानेसुद्धा पेटक्‍यांना आराम मिळतो.

त्वचा सांभाळा
सूर्याची अतिनील किरणं त्वचेला घातक ठरतात. त्यामुळे कडक उन्हाळ्यात घरातून बाहेर पडताना चेह-यासाठी स्कार्फचा वापर करावा. उन्हाळ्यात एक बादली कोमट पाण्यात दोन थेंब लिंबाचा रस टाकून अंघोळ करावी. त्यामुळे त्वचेचा रंग उजळतो. हानिकारक सूर्यकिरणांपासून त्वचेचा बचाव करण्यासाठी योग्य अशा सनस्क्रीमची निवड करा.

घरातून बाहेर निघताना 20 ते 30 मिनिटं अगोदर सनस्क्रीम लावा. त्वचेला रोगमुक्त ठेवण्यासाठी दररोज दोन वेळा क्‍लिंजिंग, टोनिंग आणि मॉइश्‍चरायजिंग करण्याची सवय लावावी. त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी आहारात ताजी फळं आणि हिरव्या भाज्यांचा समावेश असू द्या. त्वचेचा रंग सावळा होत असेल तर कच्चा टोमॅटो कुस्करून त्यात ताक मिसळून चेह-याला लावल्याने थंडावा मिळतो.

डोळ्यांची काळजी घ्या
उन्हात नेहमी 2 ते 3 तासानंतर डोळ्यांवर गार पाणी मारावं. दुपारच्या वेळी डोळ्यांवर काकडीच्या फोडी ठेवाव्यात. रात्री झोपण्यापूर्वी दहा मिनिटं डोळ्यांवर दुधाच्या पट्टया ठेवाव्यात. तसंच घरातून बाहेर पडताना गॉगल लावणं हितावह ठरेल.

केसांची निगा राखा
उन्हाळ्यात केस कोरडे होतात. अशा वेळी कोणत्याही प्रकारचे केमिकल आणि हेअरस्टाईल बनवणा-या उपकरणांपासून दूरच राहा. याशिवाय मेंदी कंडिशनरचं काम करत असल्याने केसांचं सौंदर्य कायम ठेवण्यासाठी 15 दिवसांनी मेंदी लावावी. तसंच आठवडयातून किमान एकदा अंडे आणि दह्याचा वापर करावा.

आजारापासून मुक्त राहा
उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे बदलत्या वातावरणाशी जुळवून घेताना अनेकांना आजारपणाचा सामना करावा लागतो. उन्हाळ्यात आजारापासून संरक्षण करायचे असेल किंवा अंगाला खाज सुटत असेल तर खरबूज हा उत्तम पर्याय आहे. कारण खरबूजमध्ये 15 टक्के पाण्यासोबत व्हिटॅमिन्सचे प्रमाण मोठया प्रमाणात आढळते.

उन्हाळ्यात ताप किंवा डोकं दुखत असेल तर औषधं स्वत:हूनच घेऊ नये. डॉक्‍टरांच्या सल्ल्‌याने अँटिबायोटिक्‍स घेणं केव्हाही चांगलं. ताप अधिक असल्यास कपाळावर पाण्याच्या पट्टया ठेवल्यास अधिक आराम मिळतो. उन्हाळ्यातील आजारांचे मूळ कारण म्हणजे पाण्याची कमतरता, प्रदूषित अन्न, दूषित पाणी इत्यादी. या गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्या.

वातावरण प्रसन्न ठेवा
ऑफिस किंवा घरातल्या खिडक्‍या स्लाइड्‌सने किंवा पडद्याने झाका, मात्र हवा खेळती राहील याकडे लक्ष द्या. डेस्कवर एक छानसा फ्लॉवरपॉट ठेवावा. जेणेकरून मनाला प्रसन्नता मिळेल. ब-याचदा ऑफिसमध्ये जास्त लाईट्‌स लावले जातात. पुरेसा प्रकाश ठेऊन अतिरिक्त लाईट्‌स बंद ठेवा. डेस्कवर एखादं सुखद, तजेलदार निसर्गचित्र लावून ठेवा. त्यामुळे मानसिकदृष्टया ताजेतवानं राहण्यास मदत होईल.

– श्रुती कुलकर्णी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)