आंदोलन नव्हे,जल्लोषाची तयारी करा : देवेंद्र फडणवीस

मराठा आरक्षणाचा निर्णय 30 नोव्हेंबरपर्यंत घेणार

नेवासे – मराठा आरक्षणाबाबत मागसवर्गीय आयोगाकडून अहवाल राज्य सरकारला प्राप्त झाला आहे. येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत इतर समाजाच्या आरक्षणाला धक्‍का न पोहोचविता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येणार आहे. आता आरक्षणाच्या श्रेयासाठी आंदोलन न करता 1 डिसेंबरला जल्लोषाची तयारी करा, जे 15 वर्षांत झाले नाही ते भाजपने चार वर्षांत करून दाखविले आहे, याचा अभ्यास करा असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

अखिल भारतीय मराठा महासंघप्रणित शेतकरी मराठा महासंघाच्यावतीने तालुक्‍यातील शनीशिंगणापूर येथे आयोजित केलेल्या शेतकरी वारकरी महासंमेलनाचे उद्‌घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. अध्यक्षस्थानी बद्रीनाथ महाराज तनपुरे होते. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, पंढरपूरचे अध्यक्ष अतुल भोसले, खासदार दिलीप गांधी, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी आमदार बबनराव पाचपुते, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, उद्धव महाराज मंडलिक आदिसह शेतकरी वारकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ना. फडणवीस म्हणाले, यापूर्वीच्या सरकारच्या काळात 15 वर्षांत मूठभर प्रस्थापितांनी स्वतःच्या तिजोऱ्या भरल्या. साखर कारखाने, दूध संघ यासह इतर सहकारी संस्था भाजपकडे नाहीत. त्यामुळे जनतेच्या विकासासाठी सदैव भाजप प्रयत्नशील राहिला आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या समस्या मोठ्या आहेत. सध्या दुष्काळ समोर आहे. या 4 वर्षाच्या कालावधीत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलो. गेल्या चार वर्षात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50 हजार कोटी रुपयांची मदत थेट दिली आहे.

प्रत्येक अडचणीमध्ये शेतकऱ्यांच्या पाठीमागे आमचे सरकार आहे. हे मागील कोणतेही सरकार करू शकले नाही. कर्जमाफी योजनेमध्ये एकट्या नगर जिल्ह्यात साडेतेराशे कोटी रुपये मिळाले. राज्यात 21 हजार कोटी रुपये कर्जमाफीच्या माध्यमातून दिले. आजही कर्जमाफी योजना थांबवली नाही. जोपर्यंत सर्व शेतकरी कर्जमुक्‍त होत नाही तोपर्यंत कर्जमाफी योजना थांबवणार नाही. आज बोंडअळीची नुकसानभरपाई दिली आहे. जलयुक्‍त शिवार योजना राबविली. त्यामुळे उत्पादनात मोठी वाढ झाली. शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी काम केले. दुधाचे भाव आम्ही वाढविले, असे ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)