पेरणीपूर्वी सावधान, बियाणे निवडा छान! (भाग- ३)

डॉ. विजय शेलार, डॉ. अविनाश कर्जुले व डॉ. युवराज बालगुडे 
बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजना, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी
10) बियाण्यात दोष आढळल्यास केव्हा तक्रार करावी 
*बियाण्याची बहुतांश तक्रारी या उगवणक्षमतेबाबत असतात त्यामुळे बियाणे पेरणीनंतर 15-20 दिवसात उगवणक्षमतेबाबत शंका असल्यास तत्काळ तालुका कृषि अधिकारी, पंचायत समिती यांचेकडे तक्रार नोंदवावी.
*बियाण्याच्या उत्पन्नाबाबत म्हणजेच कणसात दाणे न भरणे किंवा त्या अनुषंगाने येणाऱ्या सर्व तक्रारीबाबत पिक उभे असताना तक्रार करावी.
*बियाण्याच्या अनुवांशिक शुध्दतेबाबत तक्रार असल्यास म्हणजेच पिकांच्या,झाडांच्या बाह्य गुणधर्मामध्ये एकसारखेपणा नसणे याबाबत तक्रार असल्यास पिकाची समक्ष पहाणी करता येईल अशा रितीने तक्रार करावी
11) बियाणे तक्रार निवारणाचे कशा प्रकारे कार्य चालते? 
*शेतकऱ्यांच्या बियाण्या बाबत असलेल्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी तालुका स्तरीय तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आलेली असते. हे काम तत्परतेने होण्यासाठी तालुकास्तरावर तक्रार नोंदवणे, पहाणी करणे चे अधिकार देण्यात आलेले आहे. या समितीमध्ये कृषि अधिकारी, बीज प्रमाणीकरण अधिकारी, बियाणे महामंडळाचा प्रतिनिधी, कृषि विद्यापीठ किंवा संशोधन केंद्रावरील शास्त्रज्ञ यांचा समावेश केलेला असतो. तक्रार नोंदविल्यानंतर आगाऊ नोटिसा देऊन समितीव्दारे बाधीत क्षेत्राची पहाणी केली जाते.
*मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यास शासनस्तरावर त्याचा निर्णय घेतला जातो.
 *एखाद दूसरी तक्रार असल्यास बियाणे तक्रार समितीच्या निर्णयानंतर पूढील कारवाई करणे आवश्‍यक असते.
*बियाणे सदोष किंवा भेसळयुक्त आहे. असा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ग्राहक मंचाकडे तक्रार करता येऊ शकते.
*बियाणे सदोष असल्यास संबंधीत विक्रेता,उत्पादक यांचेवर बियाणे कायदा 1966 मधील कलम 19 नुसार कायदेशीर कार्यवाही होऊ शकते.
12) बियाणे उपलब्ध असून सुध्दा विक्री करण्यास नकार दिल्यास दुकानदारा विरूध्द तक्रार करता येऊ शकते काय?
जीवनावश्‍यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत बियाणे समाविष्ट असल्यामुळे बियाण्याची साठेबाजी करणे, चढ्या भावाने विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे जर शेतकऱ्यांना या बाबत तक्रार असल्यास कृषि अधिकारी, पंचायत समिती यांचेकडे लेखी तक्रार करू शकतात.
13) बियाणे तक्रार निवारणासाठी चौकशी समिती येणार असल्यास काही तयारी करणे आवश्‍यक आहे? 
*शेतकऱ्यांनी बियाण्याबाबतीत काही तक्रार केली असल्यास आणि चौकशी समिती येणार असल्यास शेतकऱ्यांनी काही गोष्टींची तयारी केल्यास चौकशी समितीचे काम सुलभ होते. यामध्ये पेरणीची तारीख, पेरणीची पध्दत, पेरलेले एकूण क्षेत्र, पेरणीसाठी किती बियाणे वापरले, पेरणीपूर्वी आणि पेरणीनंतर पावसाचे प्रमाण काय होते किंवा पिकास किती पाणी दिले, कोणत्या प्रकारे दिले, यापूर्वी कोणते पीक घेतले होते. नांगे भरण्यासाठी बी वापरले असल्यास कोणते बी वापरले आणि पीक संरक्षण केल्यास रोग किडीसाठी कोणती औषधे वापरले या बारीक सारीक गोष्टींची माहिती तयार ठेवावी.
*त्याचप्रमाणे 7/12 चा उतारा, बियाणे खरेदीची पावती, बियाण्याची टॅग असलेली बॅग, बियाण्याचा नमुना, बियाणे पेरणीपासून केलेल्या मशागती यांची माहिती तयार ठेवावी.
14) बिजोत्पादनासाठी बियाणे खरेदी करावयाचे असल्यास काय काळजी घ्यावी? 
*जर शेतकऱ्यांना बीजोत्पादनासाठी बियाणे खरेदी करावयाचे असल्यास ठराविक स्टेजचे बियाणे वापरावे लागते..
बियाण्याच्या वेगवेगळे स्टेज,प्रकार माहिती असणे आवश्‍यक आहे.
*प्रमाणित बिजोत्पादनासाठी पायाभूत बियाणे तर पयाभूत बिजोत्पादनासाठी मुलभूत बियाणे वापरावे लागते.
*हे बियाण्याच्या पिशवीवरील टॅगच्या विशिष्ट रंगावरून हे बियाणे ओळखता येऊ शकते. मुलभूत बियाण्याच्या पिशवीला पिवळ्या रंगाचा, पायाभूत बियाण्याच्या पिशवीला पांढऱ्या रंगाचा तर प्रमाणित बियाण्याच्या पिशवीला जांभळ्या रंगाचा टॅग असतो. तसेच सत्यप्रत बियाण्याच्या पिशवीला हिरव्या रंगाचा टॅग असतो.
*प्रत्येक स्टेजचे बियाणे तयार करण्याची पध्दत वेगवेगळी असते. त्यांची अनुवंशिक आणि भौतिक शुध्दतेची मानके वेगवेगळी असतात
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)