प्रजनेशची क्रमवारीत 84 व्या स्थानी झेप

नवी दिल्ली – इंडियन वेल्स स्पर्धेत केलेल्या शानदार कामगिरीमुळे भारताचा अव्वल टेनिसपटू प्रजनेश गुन्नेश्‍वरनच्या क्रमवारीत सुधारणा झाली असून त्याने कारकीर्दीतील सर्वोत्तम 84 व्या स्थानी झेप घेतली आहे. तर, दुसरीकडे दुखापतीमुळे कोर्टबाहेर असलेल्या युकी भांबरीच्या क्रमवारीत घसरण होत असून तो अव्वल 200 जणांच्या यादीतून बाहेर फेकला गेला आहे.

एटीपी मास्टर्स सीरिज स्तरावरच्या स्पर्धेत तिसऱ्या फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या प्रजनेशने 61 गुणांची कमाई केली. या स्पर्धेत प्रजनेशने जागतिक क्रमवारीत 18 व्या स्थानी असलेल्या निकोलोझ बासिलाश्‍विली याला पराभवाचा धक्का दिला. कारकीर्दीतील सर्वोत्तम विजय मिळवणाऱ्या प्रजनेशला 13 क्रमांकाने बढती मिळाली आहे.

तर, अन्य भारतीय टेनिसपटूंमध्ये रामकुमार रामनाथन 139 व्या क्रमांकावर आहे. युकीच्या गुडघ्याला दुखापत झाली असून तो 207 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. जुलै 2017 नंतर तो प्रथमच अव्वल 200 टेनिसपटूंमधून बाहेर पडला आहे. मे महिन्यात तो व्यावसायिक टेनिसमध्ये पुनरागमन करण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

साकेत मायनेनी 251व्या तर शशीकुमार मुकुंद 268व्या स्थानी आहे. दुहेरीत जीवन नेदुनचेझियान याने कारकीर्दीतील सर्वोत्तम 64 वे स्थान प्राप्त केले असून रोहन बोपण्णा 36व्या तर दिविज शरण 41व्या क्रमांकावर आहे. पूरव राजाने 80वे आणि लिएण्डर पेसने 94 वे स्थान प्राप्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)