“किसान सन्मान निधी’चा प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते रविवारी शुभारंभ

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची अंमलबाजवणी सुरू
एक कोटीपेक्षा अधिक अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणार लाभ
 

पुणे – केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार राज्यस्तरीय पातळीवर अंमलबाजवणीला सुरुवात कऱण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील एक कोटीपेक्षा अधिक अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर रविवार (दि. 24) सकाळी 10.30 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह, पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंक येथे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ होणार आहे. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, कृषी व पणन मंत्री सदाभाऊ खोत, सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे, कृषी सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसकर आदी उपस्थित राहणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अल्प-अत्यल्प भूधारकांना निश्‍चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासन प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेद्वारे प्रती शेतकरी वार्षिक 6 हजार रुपये देणार आहे. त्यासाठी राज्यशासनाने 15 फेब्रुवारी रोजी अंमलबजावणीचे परिपत्रक देखील काढले आहे. शासन निर्णया प्रमाणे जिल्हा, गाव पातळीवर तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक अधिकारी यांद्वारे पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात येत आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे नाव, पत्ता, आधार क्रमांक, बॅंक खाते क्रमांक, जन्म तारीख तसेच सातबारा आणि इतर कागदपत्रे आवश्‍यक असणार असल्याचे सूचित करण्यात आले आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे आधार कार्ड नसेल त्या शेतकऱ्यांनी स्वयं घोषणापत्र देण्याचे बंधनकारक आहे.

संबंधित माहिती तलाठी, ग्रामसेवक यांकडून प्रात यादीच्या छाननीनंतर अंतिम यादी केंद्र शासनाच्या पीएम किसान पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या थेट बॅंक खात्यात हा निधी जमा होणार आहे. ही योजना 1 डिसेंबर 2018 पासून लागू करण्याचे आदेश असल्याने शेतकऱ्यांना मागील वर्षाचे 2 हजार रुपये आणि चालू वर्षाचे 2 हजार असे एकूण 4 हजार रुपये प्रथम लाभ देण्यात येणार आहे. तर उर्वरित 4 हजार वर्षाच्या 3 हप्त्यात देण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही अल्प, अत्यल्प भूधारकांसाठी असून राज्यात अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांची माहिती एकत्रित करून ग्रामपंचायत स्तरावर चावडीवाचन करण्यात आले आहे. सद्य:स्थितीला राज्यात 1 कोटी 52 लाख 85 हजार शेतकरी आहे. त्यापैकी 1 कोटी 21 लाख 55 हजार अल्प, अत्यल्प भूधारक आहेत, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)