माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची डोकेदुखी वाढणार
सोलापूर- सोलापूर लोकसभा मतदार संघातून बहुजन वंचित आघाडीकडून प्रकाश आंबेडकर निवडणूक लढविणार आहेत. याबाबतची घोषणा स्वतः त्यांनी केली आहे. आंबेडकर हे सोलापूर लोकसभा लढणार असल्याने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची डोकेदुखी वाढणार असल्याचे मानले जात आहे. गेल्या वर्षभरात सोलापूर जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढली आहे. हे पाहता याचे प्रवर्तक ऍड. प्रकाश आंबेडकर यांना कार्यकर्त्यांकडून सोलापूर लोकसभा निवडणूक लढविण्याचा आग्रह होत होता. त्यानुसार त्यांनी सोमवारी सकाळी अकोला येथे पत्रकार परिषद घेवून सोलापूरमधून उभे राहण्याचे जाहीर केले.
ऍड. आंबेडकर यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे स्पष्ट केल्याने आता ते कॉंग्रेस आघाडीत सहभागी होणार की नाही? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. आंबेडकर यांचा पारंपारिक मतदारसंघ हा अकोला असून तेथून ही ते लढणार का ? हा प्रश्न आहे. एकाच वेळी दोन लोकसभा मतदारसंघातून ते लढतील असा ही अंदाज व्यक्त केला जात आहे. सुशीलकुमार शिंदे हे कॉंग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते आहे. त्यांच्याच मतदारसंघातून ऍड. आंबेडकर यांनी निवडणूक लढण्याचा इरादा जाहीर केल्यानंतर आता कॉंग्रेस सावध झाली आहे. बहुजन वंचित आघाडीची स्थापना ही सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमध्ये झाली आहे. यास मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सोलापूर, मंगळवेढा, पंढरपूर, माळीनगर या भागात मोठ्या सभा झाल्या आहेत. ऍड. आंबेडकर यांनी शेजारच्या माढ्या मतदारसंघात ऍड. विजयराव मोरे यांची उमेदवारी जाहीर केली असून त्यांच्या प्रचारास सुरूवात झाली आहे. मोरे हे ग्रामीण भागात रोज दौरे करत आहेत. माढ्यातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादीचा उमेदवार कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.