“प्रज्ञासिंह ठाकूरसारखी प्रवृत्ती मतदानातून ठेचा’

मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ अल्पसंख्याक मेळाव्याचे आयोजन

खोटे आश्‍वासन देऊनच बापट निवडून येत आहेत
भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांनी काल पुन्हा शहरातल्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याचे आश्‍वासन दिले आहे, पण बापट साहेब गेली पंचवीस वर्षे कसबा पेठेतल्या मतदारांना हेच आश्‍वासन देऊन निवडून येत आहेत. त्यांना अजून कसबा मतदारसंघातला वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सोडवता आला नाही. ते संपूर्ण शहरातील कसा सोडवू शकतील, असा सवाल मोहन जोशी यांनी केला.

पुणे – आतापर्यंतच्या पंतप्रधानांनी कधी सरकारचा उल्लेख स्वत:च्या नावाने केल्याचे ऐकिवात नाही. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात सरकारचा उल्लेख “मोदी सरकार’ असा स्वत:च्या नावाने करतात. अहंकार निर्माण झाला की लोकशाही धोक्‍यात येते आणि हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू होते. त्याची प्रचिती भाजपने उमेदवारी दिलेल्या साध्वी प्रज्ञासिंह यांच्या शहीद करकरे यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून लक्षात येते. ही प्रवृत्ती ठेचायची असेल तर ती भाजपच्या विरोधात मतदान करून ठेचा असे आवाहन माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी केले.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्षांच्या आघाडीचे पुणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे अल्पसंख्याक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कॉंग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, आमदार विश्‍वजित कदम, उल्हास पवार, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, रशीद शेख आदी उपस्थित होते. प्रज्ञा ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल जे निषेधार्ह वक्तव्य केले. त्याबाबत उद्धव ठाकरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी पाटील यांनी केली. भाजप प्रज्ञा ठाकूर यांचे वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे सांगते. परंतु, त्या भाजपच्या उमेदवार आहेत. त्या उमेदवार नसत्या तर ते त्यांचे वैयक्तिक मत झाले असते. त्यामुळे त्याला भाजपच जबाबदार आहे, असे पाटील म्हणाले.

मतदानातून भाजपची भ्रष्ट राजवट उद्‌ध्वस्त करा
तूरडाळ, रेशनवरील धान्यांवर डल्ला मारणाचे काम भाजपच्या उमेदवारांनी केले आहे. रेशनवरील धान्य हे गोरगरिबांचा आधार असतो. मात्र, या धान्यापासून लाखो गरिबांना दूर ठेवले जात आहे. सर्वसामान्यांना महागाईच्या खाईत लोटणाऱ्या भ्रष्ट भाजपची राजवट या मतदानातून उद्धवस्त करा, असे आवाहन पाटील यांनी केले. मोहन जोशी यांच्या प्रचारार्थ पद्मावती येथे सभा झाली. ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी, उमेदवार मोहन जोशी, अभय छाजेड, प्रवक्ते अंकुश काकडे, आमदार शरद रणपिसे, उल्हास पवार, इंटकचे सुनील शिंदे, “युक्रांद’चे संदीप बर्वे, वीरेंद्र किराड, कमल व्यवहारे, नगरसेवक सुभाष जगताप उपस्थित होते.

शहिदांचा अपमान करणाऱ्यांना साथ देणार काय?
देशात परिवर्तनाचे वातावरण आहे. पंतप्रधान मोदी यांना पराभव दिसू लागल्यानेच ते शहीद जवानांच्या नावावर पक्षाला मते मागतात आणि देशासाठी शहीद झालेल्या स्व. हेमंत करकरे यांच्या नावाने, भाजपच्या उमेदवार प्रज्ञा ठाकूर अपमानास्पद भाष्य करतात. अशा दुटप्पी लोकांच्या हाती सत्ता देणार काय? असा सवाल कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी केला. घोरपडीतील जय हिंद चौकात कोपरा सभा घेण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)