प्रभात संवाद : निर्बंध उठले, लाभांशचे वाटप आज

रावसाहेब रोहकले यांचा दावा : शिक्षक बॅंकेतील पारदर्शकतेवर बोलण्याची खुली तयारी

नगर – नगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेतील गैरकारभारामुळे रिझर्व्ह बॅंकेचे निर्बंध आलेले नव्हते, तर 2015-16 मध्ये पूर्वीच्या सत्ताधारी मंडळाने कर्मचाऱ्यांच्या बोनस, रजेच्या पगारावर न केलेल्या तरतुदीमुळे निर्बंध आले होते. तत्कालीन सत्ताधारी मंडळाची ही त्रुटी आता आपण दूर केली आहे. रिझर्व्ह बॅंकेने घातलेले निर्बंध आमच्या प्रयत्नांमुळे मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे सभासदनांना तीन टक्के लाभांशाचे वाटप करण्याचा निर्णय घेतला असून उद्या (दि. 16) पासून सभासदांच्या खात्यावर लाभांशाची रक्कम जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती या बॅंकेचे अध्यक्ष रावसाहेब रोहोकले यांनी केला. बॅंकेच्या पारदर्शक कारभारावर खुलेपणाने बोलण्याची आपली तयारी आहे. पारदर्शक कारभारावर बोलायचे  ठरल्यावर विरोधकांचा घसा कोरडा पडेल, असा अशी टीका त्यांनी केली.

रोहकले यांनी दैनिक प्रभात कार्यालयाला आज भेट देत संवाद साधला. शिक्षक विकास मंडळाचे अध्यक्ष संजय शिंदे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. निवासी संपादक भागा वरखडे यांनी त्यांचे स्वागत केले. रोहकले म्हणाले, “”बॅंकेचा इतिहास पहिल्यावर शिक्षक बॅंकेत गुरूमाउली एवढा पारदर्शक कारभार कोणत्याच मंडळाने केलेला नाही. बॅंकेच्या कारभारावर उत्तर द्यायला आपण तयार आहोत. बॅंकेचा कारभार हा कोणा एकाची वैयक्तिक गोष्ट नाही. त्यामुळे सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. त्या अधिकारवर आपण गदा आणत नाही. पोलीस बंदोबस्त हा सभासदांच्याच सुरक्षितेसाठी आहे. कोणाला बोलून न देण्यासाठी नाही. वार्षिक सभेत सर्वांना बोलण्याची संधी आहे; पण बोलताना काही पथ्ये पाळून सभागृहाला समजावून देण्याची ताकद त्यात असली पाहिजे.प्रश्‍नाला उत्तर देता आले नाही, तर आपण दोषी आहोत. सभागृह जी शिक्षा देईल, ती आपण भोगायला तयार आहोत.”

या वर्षी विरोधकांनी संचालक मंडळाचा घेतलेला भत्ता, बैठका, रिझर्व्ह बॅंकेचे निर्बंध आणि नेवासे शाखेतील कथित गैरव्यवहार यावर भर दिला आहे. या प्रश्‍नांवर रोहोकले यांनी सविस्तर चर्चा केली. ते म्हणाले, की पूर्वीच्या संचालक मंडळाने भत्त्यापोटी 25 लाख रुपये घेतले आहेत. महागाई वाढली. बैठकांची संख्या वाढली, तरीही आमचा भत्त्यावरचा खर्च कमी आहे. चालू वर्षात 21 लाख 76 हजार रुपये खर्च आला. खर्चात तीन लाख रुपये कपात करण्यात आली. वचननाम्यात भत्ता घेणार नाही, असे म्हणालो होतो, हे खरे आहे; परंतु चांगल्या कामासाठी तसेच कर्ज समित्यांचे कामकाज सुरळीत करण्यासाठी आणि गैरप्रकार टाळण्यासाठी भत्ता घ्यायला सुरुवात केली. शिक्षकांची नोकरी हेच मिळकतीचे साधन आहे. त्यातून तो बॅंकेच्या कामकाजावर खर्च करायला लागला, तर कसे होणार? शिक्षक विकास मंडळाचे काम बॅंकेच्या इतिहासात वेगळी ओळख निर्माण करणारे ठरत आहे.

ही इमारत गुरूमाउलीच्या आणि संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उभी राहत असल्यानेच विरोधकांना पोटशूळ उठला आहे. ही इमारत बॅंक आणि शिक्षक विकास मंडळांचे उत्पन्नाचे साधन ठरणार आहे. त्याची रचना आणि उभारणी झाल्यावर हे लक्षात येईल. ही इमारत धोकादायक इमारतीच्या यादीत होती. तशी विकास मंडळाला महापालिकेने नोटीसदेखील दिली होती. 2017 मध्ये इमारतीचा काही भाग कोसळून दुर्घटनादेखील झाली आहे. विरोधकांनीच त्यावर आरडाओरडा केला होता. विकास मंडळाची 56 गुंठे जागा आहे. त्यात व्यापारी संकुल, साडेसातशे खुर्च्यांचे सभागृह, वरच्या मजल्यावर वसतिगृह बांधण्यात येणार आहे. तिथे सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. ऐक्‍य मंदिराच्या पुनर्बांधणीच्या काळात विकास मंडळाच्या जागेत शिक्षक बॅंकेचे मुख्यालय येऊ शकते, असे निदर्शनास आणून रोहोकले म्हणाले, की महाराष्ट्र बॅंक या व्यापारी संकुलासाठी कर्ज द्यायला तयार होते; परंतु सध्या विरोधात बोलणाऱ्यांनीच या निधीला विरोध केला होता.

ही मिळकत शिक्षकांची आहे. तिला एक ऐतिहासिक वारसा आहे. त्यामुळे स्वकीयांच्याच निधीतून उभारण्याचा निर्णय नंतर घेण्यात आला. या वास्तूच्या उभारणीसाठी आवश्‍यक असलेल्या ठेवी आता जमा व्हायला सुरूवात झाली आहे. संगमनेर, जामखेड, शेवगाव व पारनेर तालुक्‍यातून अधिक ठेवी आल्या आहेत. काहींनी एक लाखापर्यंत ठेवी दिल्या आहेत; परंतु विरोधकांनी ठेवीच्या मुद्यावर सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रकार सुरू केला आहे.

नेवासे शाखेच्या फर्निचरबाबत केलेले आरोपही धादांत खोटे आहेत, असे सांगून ते म्हणाले, “” दोन मजली इमारतीचे नूतनीकरण, तिचे फर्निचर आदींसाठी तीस लाखांचा खर्च सांगितला होता. आपण निविदा मागविल्या. संबंधितांशी चर्चा केली. 18 लाख रुपये इमारत तसेच फर्निचर आणि जीएसटीवर खर्च झाला आहे. विरोधकांचा आरोप निखालस खोटा आहे. बॅंकेची शतक महोत्सवाकडे वाटचाल सुरू आहे. या शतक महोत्सवी वर्षानिमित्ताने बॅंकेच्या प्रत्येक शाखेची रंगरंगोटी आणि फर्निचरचे नूतनीकरण करणार आहे. विरोधक येथेही खोडा घातल्याशिवाय राहणार नाहीत. विरोधाला विरोध हीच विरोधकांची भूमिका आहे गुरूमाउली ही बॅंकेच्या हितासाठी एकसंघ आहे. घरात भांडणे होतातच आणि ती लगेच मिटतातदेखील. तसेच काहीसे गुरूमाउलीमध्ये आहे.”

डीसीपीएसधारकांसाठी योग्य निर्णय घेऊ

डीसीपीएसधारक हे बॅंकेचा मोठा घटक आहेत. गुरूमाउली सत्तेत आल्यावर त्यांचा मदतनिधी दोन लाख रुपये केला. असे असताना आम्ही अन्याय कसा करू, असा सवाल करून ते म्हणाले, की मदतनिधी पाच लाख करा अशी विरोधकांची मागणी आहे. त्यावर विचारमंथन सुरू आहे. सभागृहापुढे हा विचार मांडून त्यावर निर्णय घेणार आहोत. बॅंकेतील कर्मचारी किंवा सभासदांच्या वारसांना सात लाखांचा मदतनिधी देत आहोत. डीसीपीएसधारकांनादेखील हा नियम आहे. त्यात डीसीपीएसधारकांना दोन लाखांचा अतिरिक्त निधी मिळतो आहे. म्हणजेच नऊ लाखांचा निधी त्यांना मिळणार आहे.

सभासद हितासाठी उत्पन्नावर पाणी

शिक्षकांचे पगार बॅंकेत जमा व्हायला उशीर होतो. कर्जदार शिक्षकांना त्याचा फटका बसायचा. त्याची दखल घेत प्रणालीत तशी सुधारणा केली. यात सभासदांचे हीत पाहिले. कर्जदार शिक्षकांच्या थकीत हप्त्यावर 66 लाख रुपयांचे उत्पन्न बॅंकेला मिळते. प्रणालीत दुरुस्ती केल्यानंतर हे उत्पन्न थांबले आहे. बॅंकेचे नुकसान झाले; परंतु सभासदांचे नुकसान होऊ दिले नाही, असा दावा रोहकले यांनी केला. आजही बॅंक तीन टक्के फरकानेच काम करत आहे. सभासदांना प्रति महिना एक हजार रुपये फायदा होईल, असाच बॅंकेचा कारभार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)