#प्रभात_प्रभाव : ‘त्या’ मायलेकरांच्या मदतीसाठी सरसावले हात

11 हजार रूपयांची दिली रोख मदत

पाथर्डी : अपंग रामा काळोखे व त्यांची आई शांताबाई काळोखे या अभागी मायलेकरांची दिवाळी गोड करण्यासाठी तालुक्‍याचे सुपुत्र व पुणे येथील उद्योजक अनिल देवढे यांनी अकरा हजार रुपयांची रोख स्वरुपात मदत केली आहे. मायलेकाच्या जिद्दीपुढे नियतीने टेकले हात ! या मथळ्याखाली दैनिक प्रभात मधून प्रसिद्ध झालेल्या शांताबाई काळोखेंच्या जीवनातील विदारक सत्य वाचून पाथर्डीकरांचे अक्षरशः डोळे पाणावले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

माणसातील माणूसकी जिवंत असल्याचे दर्शन घडवत अनेकांनी मदतीचे हात पुढे केले. जिवंत आहे म्हणून जगायचे, हा एकमेव आशावाद ठेवून नैराश्‍यात जीवन जगणाऱ्या काळोखे मायलेकरांना उद्योजक देवढे यांच्या रूपाने माणुसकीचा झरा सापडला आहे. तर समाजालाही आजच्या स्वार्थी जगात आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, अशी प्रेरणा देणारा भूमिपुत्र गवसला आहे. दै. प्रभातने काळोखे मायलेकरांची कर्म कहाणी मांडून त्यांच्या जीवनातील विदारक वास्तव्य जगासमोर आणले. शहरवासीयांना दररोज रस्त्यावर दिसणाऱ्या या जोडीचे खरे वास्तव वाचून धक्काच बसला आहे.

शांताबाईच्या पालथ्या नशिबाचा फेरा वाचून अनेकांनी डोळे पाणावल्याच्या प्रतिक्रिया दिल्या, तर अनेकांचे मदतीचे हात पुढे आले. दै. प्रभातचे वृत्त वाचून तालुक्‍यातील मोहोज देवढे येथील सुपुत्र व पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डचे संचालक अनिल देवढे यांनी या अभागी मायलेकरांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेतला. कुठलीही प्रसिद्धी न करता व स्वार्थ न ठेवता प्रामाणिक पणे या कुटुंबाला मदत करण्याची भूमिका व्यक्त केली.

दैनिक प्रभातचे प्रतिनिधी बाबासाहेब गर्जे यांच्याशी संपर्क करून अकरा हजार रुपये रोख संबंधितांना पोहोच करण्याची व्यवस्था केली. आपल्या जन्मभूमीशी इमान राखत, माणसातील माणूसकी जिवंत असल्याचे देवढे यांच्या आजच्या कृतीतून दर्शन घडले आहे. आपल्या मोहोज देवढे गावीही त्यांनी 100 वंचित कुटुंबांची दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व गरजूंना दिवाळीसाठी किराणा सामान, महिलांना साड्या व कपडे देण्यात आले. त्यांचा हा उपक्रम सर्वांसाठी दिशादर्शक ठरावा.

मायलेकाच्या जिद्दीपुढे नियतीनेही टेकले हात!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)