बाई म्हणून समृद्ध करणारा अनुभव…(प्रभात ब्लॉग)

गेल्या वर्षी अमोलने दिवाळी अंकासाठी माझी मुलाखत घेतली होती. मुलाखतीशिवाय पण आमच्या खूप गप्पा झाल्या होत्या. त्याने मुलाखती दरम्यान खूप छान प्रश्न विचारले होते. म्हणजे नेहमीच्या मुलखातीत जसे असतात ते सोडून आणि फार महत्वाचे असे. मला ते सगळं फार आवडलं होतं. त्यानंतर माझ्या लग्नाची पहिली बातमीसुद्धा अमोलने दिली होती. आमचे मध्ये मध्ये फोन व्हायचे पण मुलाखती नंतर आमची भेट नव्हती झाली. आणि मग अचानक एक दिवस अमोलचा फोन आला, कि ‘रायगड जिल्ह्यात सुधागड तालुक्यात असणाऱ्या राबगाव मध्ये आदिवासी महिलांसाठी रानभाज्यांची स्पर्धा घेण्यात आली होती, त्याचा बक्षीस वितरण समारंभ आहे. तर तू येशील का ?’ त्याने असं बिचकत बिचकत मला विचारलं होतं. आणि मी त्याला पटकन हो म्हंटले होते. मला माहित नाही मला काय वाटलं. ही स्पर्धा या बायकांशी माझा संपर्क येणार हे दोन्ही खूप वेगळं वाटत होतं. त्यामुळे मी पटकन तयार झाले.

आणि आमचा पुणे टू राबगाव हा प्रवास फारच अविस्मरणीय झाला. मध्ये आम्हाला कुणी तरी चुकीचा रस्ता सांगितला आणि मग आम्ही ज्या रस्त्यावर गेलो तिकडचे अनुभव मी कधीच विसरू शकणार नाही. म्हणजे एक क्षण असा आला होता कि संपूर्ण रस्त्यामध्ये मोठी दगडं होती आणि आम्हाला पुढे मुख्य रस्ता आहे कि नाही हे सुद्धा कळत नव्हतं. पण थोड्या वेळाने आम्हाला मुख्य रस्ता मिळाला.

राबगाव मध्ये आम्ही पोहोचलो. तर तिथे वेगवेगळ्या आदिवासी वाड्यांहून महिला येत होत्या. अनेक किलोमीटर चालत येऊन त्या सगळ्या महिला एका मंदिरात जमल्या होत्या. मुख्य म्हणजे बक्षीस वितरणासाठी सगळ्या महिला खूप छान नटून-थटून आल्या होत्या. तिथे गेल्या गेल्या त्या गावात राहणारी ग्राम परिवर्तक शिल्पा शिरवडकर हीने प्रोजेक्टरच्या साहाय्याने रानभाज्या स्पर्धेदरम्यानचे काही व्हिडिओ आणि फोटो दाखवले. ते व्हिडिओ फारच उत्साहवर्धक होते. मुळात एवढ्या प्रकारच्या रानभाज्या असतात हे मला खरंच माहित नव्हतं. आपल्याकडे पावसाळी भाज्या म्हणून काही २-४ भाज्या मला माहित असतील तेवढ्याच. पण ह्या व्यतिरिक्त मला २५ रानभाज्यांची नव्याने ओळख झाली. ते सगळेच व्हिडिओ खूप छान होते. प्रत्येक व्हिडिओ मध्ये एक-एक महिला रानभाज्यांची माहिती सांगत होती. रानभाज्यांची कृती, त्यांचा औषधी उपयोग या सगळ्या गोष्टी त्या खूप उत्साहाने सांगत होत्या. त्यांच्यासाठी हा खरं तर खूप नवा आणि वेगळा अनुभव होता. कुठेही असं वाटत नव्हतं कि या सगळ्या महिला हे पहिल्यांदा करतायत.

या सगळ्या माहिती नंतर आमचं अनौपचारिक असं स्वागत झालं. आम्हाला छान रोपं भेट दिली त्यांनी. नंतर मग सगळ्या बायका समोर छान बसल्या होत्या. माझी त्यांच्याशी बोलण्याची वेळ आली तेव्हा मला असं वाटलं की, एकतर्फी आपण नेहमीच बोलतो पण आज संवाद साधला गेला पाहिजे. कारण या बायकांना संवाद साधायची संधी किती मिळते, याबाबत मी थोडीशी साशंकच होते. या सगळ्या बायका दिवसभर शेतात काम करणाऱ्या किंवा कोणाच्या तरी शेतत कामाला जाणाऱ्या, त्यामुळे त्यांच्या स्वतःसाठी त्यांच्याकडे वेळ नसतोच. त्यातल्या एक-दोन जणींनी उठून माझे आभार मानले. त्यांना फार अप्रूप वाटलं की रविवारी सकाळी पुण्याहून मी त्यांना भेटायला आलीये. आणि मग त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी मी त्यांना काही प्रश्न विचारले. तेव्हा मला त्यांच्याबद्दल काही माहिती कळली, की त्यांचा दिनक्रम कसा असतो, त्या दिवसभर काय करतात. मुळातच मला तिथं जाण्याआधी एक शंका होती की या सगळया बायका किती बोलतील. किंवा यांच्याशी काय गोष्टी नेमक्या बोलल्या गेल्या पाहिजेत. तर मी त्यांच्याशी श्रमविभागणी बद्दल बोलले. मी त्यांच्याशी घराबद्दल बोलले, शिक्षणाविषयी बोलले. तुमच्या पुढच्या पिढीने कसं छान शिक्षण घेतलं पाहिजे, याबद्दल आमचा संवाद सुरू होता.

यात माझ्या एक गोष्ट लक्षात आली की, कुठंही जा जास्तीत जास्त कामाचं ओझं हे बाईकडेच असतं. आणि ज्या घटकांपर्यंत अजूनही काही गोष्टी पोहोचल्या नाहीयेत तिथे अजूनही स्त्री-पुरुष हा भेदभाव आहे. खरं तर माझं हे वाक्यच चुकीचं आहे, कारण आपल्याकडे सुशिक्षित लोकांमध्येही स्त्री-पुरुष भेदभाव आहेच. तर तिथे बोलताना मी एक मुद्दा मांडला, तुम्ही मुलींना फार बंधनांमध्ये ठेवत असाल, दबावाखाली ठेवत असाल, त्या मुलींना इथं राहून शिक्षणाची संधी किती मिळत असेल हे मला माहिती नाही किंवा त्यांच्या कलागुणांना किती वाव मिळत असेल, हे मला माहित नाही. मुलगी झाली तर लग्न हा एकच उद्देश तुमच्या समोर येत असेल. पण मला असं वाटतं की मुलींच्या आई पेक्षा, म्हणजे मुलींची आई असण्यापेक्षा मुलांची आई असणं हे जास्त जबाबदारी वाढवणारे आहे. कारण शालेय शिक्षणा व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या मुलाला या सगळ्या पद्धतीचं शिक्षण दिलं पाहिजे, की पुरुष आणि स्त्री हे समान आहेत. खरं तर मल्टी टास्किंग, शारीरिक ताकद ही स्त्रियांमध्ये जास्त असते असं मला वाटतं. सहनशक्ती जास्त आढळून येते. तर तुम्ही तुमच्या मुलांना हे शिकवलं पाहिजे, मुली शिकताहेत, स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. आणि त्या तुमच्या सारख्याच लाडात वाढलेल्या असतात. तर त्यांना जशी सगळी कामं येणं गरजेचं असतं, तसंच मुलगा म्हणून तुम्हाला सुद्धा सगळी कामं आली पाहिजेत. मुळात पालक म्हणून तुम्ही मुलगा आणि मुलगी यांना समान वागणूक दिली पाहिजे. आणि मुलांच्या आईची जबाबदारी जास्त आहे कारण, तू मुलगा आहेस म्हणून काहीही केलेलं चालणारे किंवा तू मुलगा आहेस म्हणून काहीही केलंस तरी फरक पडणार नाही, हे असं नाही चालणार हे तुम्ही बायकांनी त्यांना शिकवायची आज गरज आहे. मुलगा म्हणून बाहेर वागताना तू अतिशय जबाबदार असलं पाहिजे, हे त्यानं आईने शिकवायला हवं. मुलगा म्हणून दुसऱ्या मुलीकडे पाहताना तू कायम आदरानेच पाहायला पाहिजे, हे तुम्ही त्यांना सांगायला पाहिजे.आणि या गोष्टी एका रात्रीत शिकवून होत नाहीत, किंवा एखाद्या पुस्तकात एखादा भारी लेख वाचला म्हणून ते होत नाही. तर या गोष्टी आई म्हणून तुम्ही मुळातून त्यांना शिकवायची गरज आहे.

मी हे सगळं बोलल्यानंतर मला कळत नव्हतं की हे सगळं त्या बायकांना किती पचनी पडेल, मीच जरा साशंक होते. पण त्यातली एक बाई पटकन उभी राहिली आणि म्हणाली, तुम्ही बोलल्यावर मला ही जाणीव झाली, मला दोन मुलं आहेत, मला आत्ता पर्यंत असं वाटत होतं की छान आहे सगळं, मला काही जबाबदारी नाहीये. पण तुमचं ऐकल्यानंतर मला असं वाटतंय की माझी जबाबदारी जास्त आहे. मला फक्त मुलगा आहे हे सांगून भागत नाही , तर त्याला एक चांगला माणूस करण्याची जबाबदारी माझी आणि माया घराची आहे.

हे ऐकून मला खूप छान वाटलं. त्यानंतर बऱ्याच गोष्टींवर आमची चर्चा झाली. त्या बायकांनी मला काही प्रश्न विचारले, मुळातच त्यांच्याकडून काही प्रश्न येतील असं मला वाटलंच नव्हतं, त्यामुळे त्या प्रश्नांची उत्तरे देताना छान वाटलं. नंतर त्यांनी त्यांचं पारंपरिक नृत्य करून दाखवलं, मलाही त्यात सहभागी करून घेतलं. तो आनंद माझ्यासाठी फारच वेगळा होता. त्यानंतर बक्षीस वितरण करताना प्रत्येक सहभागी महिलेला साडी देण्यात आली. ती साडी घेऊन जाताना, प्रत्येक महिला खूप खुश होती. कारण प्रत्येक ‘ती’ ही साडीने सुखवतेच असं माझं म्हणणं आहे.

हा सगळा अनुभव माझ्यासाठी वेगळा , उत्साहवर्धक आणि मुख्य म्हणजे मला स्वतःला खूप काही देऊन जाणारा होता. म्हणजे आपण बऱ्याचदा असा विचार करतो की इथे जाऊन ते कळणारच नाही, किंवा तिथे जाऊन ते कळणारच नाही, हे मुद्दे या बायकांपर्यंत कितपत पोहोचतील. तर असं काही नाहीये त्यांनी ज्या सहजतेने माझा मुलांच्या आई बद्दलचा हा मुद्दा उचलून धरला, तो मुद्दा स्वीकारला, मला असं वाटतं आपल्याला ही हे मुद्दे स्वीकारायला जड जातात, आणि आचरणात आणायला तर त्याहीपेक्षा वेळ लागतो. मला असं वाटतं की या बायकांची ही सहजता आहे ती मला फार भावली, आणि ही सहजता मी त्यांच्याकडून तिथून घेऊन येतेय.

हा सगळा अनुभव बाई म्हणून, व्यक्ती म्हणून मला खूप समृद्ध करणारा असा होता. कायम लक्षात राहणारा होता.

– प्राजक्ता हनमघर
(शब्दांकन – अमोल कचरे)

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)