सत्तेबाजी : ओळख दिग्गजांची

राम मनोहर लोहिया

देशाच्या राजकारणात आणि स्वातंत्र्यपूर्व इतिहासात राम मनोहर लोहिया यांचे स्थान महत्त्वाचे आहे. लोहिया हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग असलेले स्वातंत्र्यसैनिक होते. तसेच ते भारतातील समाजवादी चळवळीतील एक अग्रगण्य नेते आणि विचारवंत म्हणून ओळखले जातात. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कॉंग्रेस अध्यक्षांसह कोणीही पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र भारताचे पंतप्रधान होऊ नये, अशी त्यांची धारण होती. अखेर कॉंग्रेसमधील समाजवादी विचारसरणीच्या गटाला घेऊन ते बाहेर पडले. त्यांनी स्वतंत्र समाजवादी पक्षाचे नेतृत्व केले.

हा समाजवादी पक्ष कृषक मजदूर प्रजा पक्षात विलीन करण्यात आला आणि त्याचे नाव प्रजा सोशॅलिस्ट पक्ष असे ठेवण्यात आले. त्याचे ते महासचिव झाले; तथापि त्यातही त्यांचे मतभेद होऊन त्यांनी हैदराबाद येथे समाजवादी पक्ष स्थापन केल्याचे जाहीर केले. पुढे हाही पक्ष पुन्हा प्रजासमाजवादी पक्षात विलीन होऊन 7 जून 1964 रोजी त्याचे संयुक्‍त समाजवादी पक्ष असे नामांतर झाले. 1962 साली त्यांनी पं. जवाहरलाल नेहरू यांच्याविरोधात निवडणूक लढवली. लोहिया हे अखेरपर्यंत लोकसभेचे सदस्य होते. “जनवाणी दिना’ची सुरुवात लोहिया यांनीच केली. जनवाणी दिनी प्रत्येक खासदार आपल्या भागातील लोकांच्या समस्या ऐकतो. लोहिया आणि नेहरू यांच्यामध्ये झालेला “तीन आणे, पंधरा आणे’ हा वाद प्रसिद्ध आहे. लोहिया यांच्या मते नेहरूंवर प्रत्येक दिवशी 25 हजार रुपये इतकी रक्कम खर्च केली जाते, तर भारतातील सामान्य नागरिकाची (त्यावेळी) कमाई दिवसाला तीन आणे इतकी आहे. यावर उत्तर देताना नेहरूंनी काही आकडे जाहीर केले, ज्यानुसार भारतातील सामान्य नागरिकाची कमाई पंधरा आणे होती.

सोमनाथ चटर्जी

1968 साली भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य बनल्यावर सोमनाथ चॅटर्जी राजकारणात खऱ्या अर्थाने सक्रिय झाले. 1971 साली ते पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर 2004 पर्यंत ते दहा वेळा खासदार बनले. 1989 ते 2004 या कालखंडात त्यांनी लोकसभेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रतिनिधित्व केले. 1996 मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट खासदाराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. 1971 पासूनच एक बुद्धिमान राजकारणी म्हणून त्यांची ख्याती होती. कामगार आणि वंचितांच्या समस्यांना वाचा फोडणारे म्हणून त्यांना ओळखले जाई.

2004 साली ते लोकसभेचे अध्यक्षही बनले. परंतु उत्कृष्ट वक्‍ते असणाऱ्या सोमनाथ चटर्जी यांच्या वक्‍तृत्वाला अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसल्यामुळे खीळ बसली. अभ्यासू वृत्ती, आपला मुद्दा कौशल्याने मांडायची हातोटी आणि इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व यामुळे त्यांनी लोकसभेच्या कामकाजावर आपला प्रभाव गाजवला. जुलै 2008 मध्ये मनमोहन सिंग सरकारवरील विश्‍वासदर्शक ठरावादरम्यान त्यांनी राजीनामा न देता अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडण्याला प्राधान्य दिले. या कारणावरून त्यांचे पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी मतभेद झाले आणि त्यांना मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षातून काढून टाकण्यात आले. यानंतर त्यांनी इ.स. 2009 ची लोकसभा निवडणूक न लढवता निवृत्ती घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)