पंचायत समितीत वीज बचत ठरत आहे फार्स

कार्यालयात लावलेले पोस्टर ठरते आहे कुचकामी ः सर्वच विभागांतून बचतीबाबत निराशाच

शेवगाव – “एकच सेकंद थांबा साहेब, लाईट बंद करून येतो,’ असे चपरासी दादा सांगतो, असे विजेच्या बचतीचा संदेश देणारे छोटे पोस्टर पंचायत समितीच्या पोर्चमधून डाव्या बाजूस असलेल्या उपसभापतीच्या दालना बाहेर लावलेले आहे. त्यामुळे औत्सुक्‍य म्हणून समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या दलनासह कोणत्याही विभागाच्या कार्यालयात डोकावले, तर सर्रास विजेची उपकरणे सुरू असल्याने वीजबचतीबाबत निराशाच दिसते.

वीजनिर्मितीसाठी आवश्‍यक असणारे जल व कोळशाची मोठी टंचाई निर्माण झाल्याने लोडशेडिंगचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. ग्रामीण भागात तर आज दहा-बारा तासांपर्यंत लोडशेडिंग वाढले आहे. अशावेळी विजेची किंमत कळायला हवी. विजेची बचत म्हणजेच विजेची निर्मितीच असते. पंचायत समितीच्या उपसभापतींच्या दालना बाहेर महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरण (महाऊर्जा) वीजबचतीचा संदेश देणारे पोस्टर लावण्यात आले आहे. त्यात दिवे, पंखे, विद्युत उपकरणे वेळीच बंद करा, विजेची बचत करा, असे आवाहन या पोस्टरद्वारे करण्यात आले आहे.

पंचायत समितीनेही विजेची अडचण ओळखून बारा लाख रुपये खर्चून दहा किलो वॉटनिर्मितीची सोलर सिस्टिमची उभारणी केली आहे. त्यामुळे समितीच्या कार्यालयाची विजेची मोठी गरज भागते. शिवाय सुटीच्या दिवशी निर्माण झालेली सुमारे 300 युनिट वीज महावितरण कंपनीला विकली जाते. असे असले, तरी पदाधिकाऱ्यांच्या दालनात विजेची उपकरणे सदैव सुरू असतात. येथे पदाधिकारी नसले, तरी कार्यकर्त्यांची उठ-बस चालू असते. त्यामुळे ही उपकरणे एखाद वेळी चालू राहिली तर समजू शकते. मात्र पंचायत समितीच्या विविध विभागांत कोणी असो अथवा नसो सर्व पंखे, विद्युत दिवे दिवसा उजेडी सुरू असल्याचेच दिसून येते. एका विभागात तर एकही कर्मचारी उपस्थितीत नसताना सहा फॅन, पाच ट्यूब चालू असतात. असेच दृश्‍य बहुतेक सर्व विभागात आढळते. पंचायत समिती समाजाला दिशा देणारी व मार्गदर्शन करणारी संस्था असल्याने किमान तेथे तरी अशी विजेची उधळपट्टी होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)