आपही दंडा आप तराजू

-ऍड. असीम सरोदे,
कायदे अभ्यासक

“यथा राजा, तथा प्रजा’ असे म्हटले जात असले तरी इथे राजा ज्या प्रवृत्तीचा आहे तशीच प्रजाही आहे असे दाखवण्याचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प करत आहेत. त्यामुळेच हा निर्णय अमेरिकेचा आहे असे म्हणण्यापेक्षा तो राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे असे म्हणणे अधिक सयुक्‍तिक ठरेल. अमेरिकेतील प्रजा मानवी हक्‍कांसंदर्भात अतिशय जागरुक आहे. प्रत्येकाच्या व्यक्‍तिगत स्वातंत्र्याचा तेथे विचार केला जातो. इस्रायलच्या सतत केल्या जाणाऱ्या लाडांबाबत अमेरिकेतील जनतेच्या मनात रोष आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इस्त्रायलचा वापर करून सत्ता गाजवण्याचा प्रयत्न ट्रम्प सरकार करत असून याचे वैषम्य तिथल्या लोकांना वाटते. एकाधिकारशाहीचा वापर करून डोनाल्ड ट्रम्प ज्या पद्धतीने निर्णय घेत आहेत ते एकुणात मानवी हक्‍क संकल्पनेला मागे नेणारे आहे. आजवर संपूर्ण जग मानवी हक्‍कांचे संरक्षक म्हणून अमेरिकेकडे पाहात आले आहे. लहान मुलांना फाशी देणे यांसारख्या अत्यंत वाईट गोष्टी अमेरिकेत असल्या तरीही एक अत्यंत पुढारलेला, लोकशाही देश असलेल्या अमेरिकेकडे मानवी अधिकारांच्या जपणुकीसाठीचे उदाहरण म्हणून जग पाहते. अमेरिकेची प्रवृत्ती मानवी हक्‍कांना पाठिंबा देणारी राहिली आहे. त्यामुळेच ट्रम्प यांच्या निर्णयाला तेथील सर्व जनतेचा पाठिंबा आहे असे मानण्याचे कारण नाही.

मागील काळात जॉर्ज बुश (ज्येष्ठ) यांनीही अशीच भाषा वापरली होती; पण प्रत्यक्षात तसे केले नाही. पण ट्रम्प यांनी मात्र आपण अत्यंत उर्मट, उद्धट आंतरराष्ट्रीय भूमिका घेऊ शकतो हे यातून दाखवून दिले आहे. मानवी हक्कांसाठी काम करायचे सोडून संयुक्‍त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार संघटनेतून बाहेर पडण्याचा ट्रम्प यांचा निर्णयच निकी हॅले यांच्या तोंडून संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या सभेदरम्यान बाहेर पडला आहे. ही भूमिका अत्यंत चुकीची आहे.
इस्रायल निष्पाप देश मुळीच नाही.

पॅलेस्टिनी नागरिकांवर इस्रायलकडून होणारे अत्याचार जगाने पाहिले आहेत. अशा वेळी या देशाला पाठिंबा देण्यासाठी संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या परिषदेतून फारकत घेतली जात असेल तर त्यातून ट्रम्प यांचा दृष्टिकोन समोर येतो. या निर्णयाचा अमेरिकेतील लोक मोठ्या प्रमाणावर निषेध करताहेत. या प्रवृत्तीतून अमेरिकेसारख्या राष्ट्राचा कारभार ते फार काळ चालवू शकणार नाहीत असे दिसून येत आहे.

गेल्या काही काळात अमेरिकेत व्हिसा संपल्यानंतर राहणाऱ्या, अनधिकृतपणे राहणाऱ्या, स्थलांतरितांना, रोजगारानिमित्त गेलेल्यांना ट्रम्प प्रशासनाने त्रास देणे सुरू केले आहे. त्याचाही संयुक्‍त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेने सातत्याने निषेध केलेला आहे. त्यामुळे आपली प्रतिमा खराब होत असल्याचे टम्प यांच्या लक्षात आले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष असल्याने संयुक्‍त राष्ट्राच्या मानवाधिकार समितीनेही त्यांचीच री ओढावी, त्यांच्याच मताला दुजोरा द्यावा अशी ट्रम्प यांची अपेक्षा आहे; परंतु तसे होत नाहीये.

संयुक्‍त राष्ट्रातील प्रतिनिधी त्यांना कोणत्याही प्रकारची संधी देत नसल्यामुळे किंवा त्यांच्या मताला सहमती दर्शवत नसल्यामुळे ट्रम्प यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण कोरिया, इराण हे देश संयुक्‍त राष्ट्राच्या मानवी अधिकार संघटनेचे सदस्य नाहीत. त्यामुळे या सर्व गोष्टींचा उद्देश आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवाधिकारांसंदर्भातील वातावरण गढूळ करणे एवढाच आहे.
यानिमित्ताने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, संयुक्‍त राष्ट्र परिषदेतील मानवाधिकार परिषदेतून अमेरिका बाहेर पडल्याने तिथे एक नेतृत्वाची पोकळी तयार होऊन या भागात चीनचा दबदबा वाढण्याची शक्‍यता आहे. हे माहीत असूनही ही संपूर्ण यंत्रणा आयतीच चीनच्या हातात देण्याचे कृत्य अमेरिकेने केले आहे.

ट्रम्प यांचा स्वभाव युद्धखोर आहे. त्यांना जिवंत व्यक्‍तींचे अस्तित्व आणि त्याबद्दल जराही आदर नाही. जसे धर्मांधपणे लोकांचा विचार करण्याची प्रवृत्ती आशिया खंडात दिसते तशी ट्रम्प यांची भूमिका वर्णाधारित आहे. ट्रम्प केवळ गौरवर्णीय लोकांबाबतच जागरूक आहेत. कारण ते मूळ अमेरिकन आहेत. त्याच पायावर ते निवडून आले आहेत. गोऱ्या लोकांसाठीच काम केले तरीही मी पुन्हा निवडून येऊ शकतो या भाबड्या विश्‍वासावर ते स्वतःची दिशाभूल करून घेत आहेत.

अमेरिकन नागरिक हे सर्व सहृदयीपणे पाहात आहेत. ते अमानुष विचार करू शकत नाहीत. त्यांच्या मते, जात, धर्म, वर्ण याला महत्त्व नाही. प्रत्येकाला समान अधिकार असले पाहिजेत आणि ते जपले पाहिजेत असे हा समाज मानतो. ही मोठेपणाची संस्कृती किंवा एकोप्याने सर्व राहू शकतो हा विचार ट्रम्प यांच्याकडे नाही.

बराक ओबामा हे प्रतिकार करणाऱ्या घटकांशी संवाद साधून त्यांना सहकार्य करण्याच्या पातळीवर आणायचे. जेणेकरून प्रतिकार आपोआपच नष्ट होऊन सहकार्याच्या भूमिकेत येईल. पण ट्रम्प विरोधी चालीचे आहेत. त्यांच्या मते, एक तर माझ्या बाजूने किंवा माझ्या विरोधात. अशा लोकांना मानवी हक्‍क अथवा मानवाधिकार समजत नाहीत. कारण जे विरोध करतात त्यांचे सहकार्य घेण्यासाठी खूप निधड्या छातीचा नेता असावा लागतो. त्याचा संवादावर विश्‍वास असला पाहिजे.

ट्रम्प यांचा संवादावर अजिबात विश्‍वास नाही. त्यामुळेच त्यांनी अमानुषपणाचा विचार केला आहे. त्यात चलाखी वाटत असेल पण मानवी हक्‍कांच्या जपणुकीसाठी लोकमानसातून जी प्रतिक्रिया येते ती पाहता इतिहासात वाईट घटनाक्रम म्हणून नोंदवली जाणार आहे. ट्रम्प यांच्या काळात वर्णद्वेषावर आधारित राजकारणाची होत चाललेली वृद्धी अमेरिकेच्या पुरोगामी संस्कृतीला भविष्यात ढवळून काढणारी ठरणार आहे. अमेरिकेतील अनिवासी लोकांना अटक करून त्यांच्या परिवारापासूनही वेगळे केले जात आहे.

व्हिसा नाही म्हणून, स्थलांतरित आहेत म्हणून जी अमानुष वर्तणूक अमेरिकेने केली आहे त्याबद्दल आंतरराष्ट्रीय मानवी हक्क परिषदेने संयुक्‍त राष्ट्रसंघात अमेरिकेवर ताशेरे ओढले आहेत. कायद्याच्या अंमलबजावणीच्या नावाखाली लहान मुलांची पालकांपासून ताटातूट करताहेत ते चुकीचे आहे. हिटलर सर्वच राष्ट्रांत जन्माला येतो असे म्हटले जाते. पण जेव्हा हिटलर प्रवृत्ती असलेल्या लोकांच्या हाती अनियंत्रित सत्ता येते तेव्हा ते कोणतीच विचारधारा मान्य करत नाहीत. त्यांना माझा शब्द अंतिम अशी मग्रुरी असते.

यावर कुमार गंधर्वांनी म्हटलेला कबीराचा दोहा आहे. “आपही दंडा आप तराजू आपही बैठा तोलता है। पंछी बोलता है।। ‘ प्रत्येकाच्या ठायी मीच कायदा करणार, मीच निर्णय घेणार ही हिटलरप्रवृत्ती आहे आणि आधुनिक लोकशाहीत ती उपयोगाची नाही. ज्या राजकीय लोकांना हे उमजत नाही की आपण आधुनिक लोकशाहीच्या आधुनिक परिप्रेक्ष्यामध्ये जगतो आहोत. यंत्रणा चालवण्यासाठीचे आपण निमित्त आहोत. आपल्यासाठी यंत्रणा, व्यवस्था नसून आपण त्यातील एक लहानसा भाग आहोत. ही नम्रता ज्यांच्यात नाही तेच असा व्यवहार करू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)