राजकीय सत्ता उलथून टाकायची ओबींसींमध्ये ताकद

माजी आ. प्रकाश शेंडगे यांचा इशारा आरक्षण रक्षणासाठी मुंबईत मोर्चा
सातारा –
राज्यातील ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्याचे पाप सरकारने केले आहे. मात्र, राजकीय सत्ता उलथून टाकायची ताकद ओबींसींमध्ये आहे. त्यामुळे आरक्षणाच्या रक्षणासाठी 25 फेब्रुवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अरुण खरमोटे, बिपीन कुंभार आदी उपस्थित होते.

शेंडगे म्हणाले, मराठा समाजाने कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण द्यावे, अशी मागणी केली होती. मात्र, राज्य सरकारने मराठा समाजासाठी आरक्षण देताना एसईबीसी प्रवर्ग निर्माण केला. वास्तविक एसईबीसी आणि ओबीसी हा एकच प्रवर्ग आहे. त्यामुळे मराठा समाजाला अप्रत्यक्ष ओबीसी आरक्षण देण्याचे काम सरकारने केले आहे. वास्तविक मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीच्या समर्थनार्थ सर्वच समाज घटक होते. परंतु सरकारने जाती-जातींमध्ये व्देष निर्माण करण्याचे काम केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सरकारला मराठा समाजाला मजबूत व टिकणारे आरक्षण द्यायचे असेल तर ते तामिळनाडूच्या धर्तीवर दिले पाहिजे. मराठा समाजाला स्वतंत्र 16 टक्‍क्‍याच्या आरक्षणाचा कायदा संसदेतील दोन्ही सभागृहाकडून मंजूर करून घेतला पाहिजे. त्यासाठी हवे तर एक दिवसाचे विशेष संसदेचे अधिवेशन आयोजित करावे आणि ज्या प्रमाणे एका दिवसात आर्थिक निकषावर दहा टक्के आरक्षण देण्याचा कायदा मंजूर करून घेतला. त्याप्रमाणे मराठा समाजाला ही सरकारने न्याय द्यावा आणि ओबीसी समाजावर होणारा अन्याय थांबवावा, अशी मागणी शेंडगे यांनी केली.

25 हजार कुणबी होणार सहभागी

मोर्चात राज्यातील ओबीसी प्रवर्गातील 340 जाती सहभागी होणार आहेत. त्यामध्ये विशेषत: मोर्चात 25 हजार कुणबी मराठा नागरिकांचा समावेश असणार आहे, अशी माहिती सांगून शेंडगे म्हणाले, मोर्चात आ.छगन भुजबळ यांच्यासह हरिभाऊ राठोड यांच्यासह नेते सहभागी होणार आहेत. मोर्चाव्दारे, न्या.गायकवाड आयोग व सादर केलेला अहवाल रद्द करावा या मागणीसह ओबीसी, व्हीजेएनटी आरक्षणाला सरंक्षण द्यावे, मंडल आयोगाच्या शिफारशींची शंभर टक्के अंमलबजावणी करावी, ग्रामपंचायत ते संसदेपर्यंत आरक्षण देण्यात यावे, 2021 मध्ये जातीनिहाय जणगणना करावी अशा विविध मागण्या मांडण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)