शक्‍ती आणि संयम (अग्रलेख)

भारताने अवकाशात फिरणारा उपग्रह पाडण्याची क्षमता साध्य केली आहे. याद्वारे अंतराळातील महासत्ता हे बिरूदही आता भारताच्या मागे अभिमानाने लावले जाणार आहे. अवकाशात असलेला एखादा असा उपग्रह पाडला जाऊ शकतो अथवा पाडता येतो, याची पुसटशीही कल्पना जे या प्रांतातले नाहीत त्यांना नव्हती. मात्र, भारतीय शास्त्रज्ञांनी जे नेत्रदीपक यश संपादन केले त्यानंतर ते बहुतांश भारतीयांना समजले व अशी क्षमता असणाऱ्या चार देशांत आता आपलाही समावेश झाला आहे, हे कळून त्यांच्या आनंदात वाढच झाली असणार हे नि:संशय. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रांत भारत महासत्ता आहे असे आता जरी कालच्या यशानंतर म्हटले जात असले तरी भारताने ही उपलब्धी त्याच्या फारच अगोदर प्राप्त केली आहे. त्यामागे तत्कालीक असे काही नाही. तर गेली अनेक दशके आपल्या देशाने या दिशेने जी नियोजनबद्ध पावले उचलली, त्याचा हा परिपाक आहे.

स्वातंत्र्य मिळून उणेपुरे अर्धे शतक झालेल्या, अजूनही गरिबी आणि गांजलेले लोक आजूबाजूला असताना, परिस्थिती नाही म्हणून मुलांना मध्येच शिक्षण सोडावे लागणाऱ्या आणि केवळ अंधश्रद्धा अथवा अकलेचा आणि समजेचा दुष्काळ म्हणून अजूनही हजारो मुलींना चूल आणि मूल यातच बांधून ठेवणाऱ्या आपल्या देशाने आणखी एका क्षेत्रात केलेली ही प्रगती लक्षणीयच. भारतीयांचे गणित चांगले असते व त्यांना इंग्रजीचीही उत्तम समज असल्याने त्यांच्या ज्ञानाची कक्षा रूंदावली आहे. भाषेची परकीयता किंवा अस्पृश्‍यता त्यागली गेल्यामुळे जगभरातील माहितीचा खजिना भारतीयांसाठी खुला झाला. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आपण प्राप्त केलेले उत्तुंग यश ही त्याचीच पावती. श्रीमंत राष्ट्रांना कमी पैशांत कुशल कामगार मिळतात म्हणूनच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचा बोलबाला असल्याचे सांगत भारताला हिणवण्याचा प्रयत्न काय कमी झाला? मात्र निंदकांना मागे टाकून भारताने कायम मुसंडी मारली. त्यामुळे जगभरात संगणक क्षेत्रातील भारतीय अभियंत्यांचा प्रचंड बोलबाला झाला. जगाला आपल्या क्षमतेची दखल घ्यावी लागली नव्हे, तर या क्षेत्रासाठी आपले मोठेपण सोडून भारताच्या वाऱ्याही त्यांना कराव्या लागत आहेत.

माहिती तंत्रज्ञानाप्रमाणेच आपल्या बुद्धिमत्तेमुळे जगभरात आपले आदराचे स्थान निर्माण झाले ते अंतराळ संशोधन या आणखी एका क्षेत्राने. गेल्या काही दशकांपासून भारताची या क्षेत्रात अतुलनीय अशी घोडदौड सुरू असून आम्ही अन्य कोणत्याही प्रगत राष्ट्रापेक्षा तसूभरही मागे नाही, हे भारताने वारंवार सिद्ध केले आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी फारच कमी कालावधीत उपग्रह प्रक्षेपणाचे आपले तंत्रज्ञान विकसित करून मोलाची कामगिरी केली. या क्षेत्रातील अग्रणी देशांच्या यादीत भारताला स्थान प्राप्त करून दिले. उपग्रह असले तरी ते प्रक्षेपित करण्याचे उच्च आणि विश्‍वासार्ह तंत्रज्ञान बऱ्याच देशांकडे नाही. असे देश आणि जे स्वत: आपले उपग्रह प्रक्षेपित करू शकतात असेही देश हे सगळे भारताकडे आशेने पाहात आपल्या उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी भारताची निवड करतात हे वाटते किंवा दिसते तेवढे सोपे नाही. असंख्य बुद्धिवंतांनी अथक परिश्रम करून मिळवलेल्या योग्यतेचे ते फळ आहे. यातून भारताला अर्थप्राप्तीची नवी कवाडेही खुली झाली आहेत.

मिशन शक्‍ती हा याचाच एक परमोच्च बिंदू. त्याचे कारण या मोहिमेंतर्गत संरक्षण संशोधन विकास संस्था अर्थात डीआरडीओने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाने पृथ्वीच्या खालच्या कक्षेत भ्रमण करत असणाऱ्या उपग्रहाला लक्ष्य करून पाडण्यात भारताला यश आले. उपग्रह सोडणारा ते अवकाशात सोडलेल्या आपल्या उपग्रहाचे संरक्षण करण्याची क्षमताही असलेला देश असा हा भारताचा प्रवास थक्‍क करणारा आहे. अन्य कोणता देश जर अगळीक करत असेल तर पृथ्वीवरूनच आम्ही त्यांच्या उपग्रहांना लक्ष्य करत आमच्या उपग्रहाचे रक्षण करू शकतो असा संदेश मिशन शक्‍तीने बिनचूक दिला आहे. यापूर्वी केवळ अमेरिका, चीन आणि रशिया या देशांकडेच ही क्षमता होती.

एखाद्या उपग्रहाला पृथ्वीवरून असे लक्ष्य करणे सोपे नसते. कारण ते पृथ्वीपासून बऱ्याच अंतरावर तिच्या कक्षेत अत्यंत वेगात भ्रमण करत असतात. त्यात थोडी जरी गल्लत झाली तर लक्ष्य चुकते अथवा अन्य कोणत्या देशाच्या उपग्रहाला ते हानिकारक ठरू शकते. प्रगतीच्या या कालखंडात अनेक देशांचे असंख्य उपग्रह अवकाशात आहेत व तेथून माहिती देण्याचे काम बजावत आहेत. त्यामुळे मानवी जीवन अधिक सुकर करण्याच्या संदर्भात निर्णय घेणे देशांना सोयीचे झाले आहे. जगातल्या बहुतेक बाबी आता माहिती आणि तंत्रज्ञानावर अवलंबून राहिल्या असल्यामुळे उपग्रहांची गरजही अनन्यसाधारण आहे. एका अर्थाने ते प्रत्येक राष्ट्राची अवकाशातील मालमत्ता असल्यासारखेच असते. जेव्हा मालमत्ता अथवा संपत्ती म्हणून एखाद्या गोष्टीकडे पाहिले जाते तेव्हा त्याच्या संरक्षणाचीही दक्षता घेतली अथवा घ्यावी लागते. आतापर्यंत कोणत्या देशाने खालचा म्हणजे पृथ्वीवरचा हिशेब वर अंतराळात चुकता करण्याचा प्रयत्न केलेला नाही.

मात्र, माणूस जसा विचार करतो तशी कृतीही करू शकतो. या न्यायाने आपली संरक्षण क्षमता सिद्ध करण्यात काही वाईट नाही. उपलब्ध माहितीनुसार डीआरडीओच्या ज्या क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह नष्ट करण्यात आला तो उपग्रह सात वर्षांपूर्वीच विकसित करण्यात आला होता. काल करण्यात आली ती त्याच्या क्षमतेचीच चाचणी होती व त्याकरता दोन महिन्यांपूर्वी अवकाशात साडेसातशे किलो वजनाचा एक उपग्रह तीनशे किलोमीटरवर पृथ्वीच्या कक्षेत स्थापित करण्यात आला होता. चाचणी यशस्वी झालीच, मात्र केवळ तीनशेच नव्हे, तर पाच हजार किमी अंतरावरील उपग्रह नष्ट करण्याचीही आपली क्षमता असल्याचे डीआरडीओने म्हटले आहे.

भारताच्या या चाचणीमुळे काहींच्या भुवया उंचावल्या आहेत, तर पाकिस्तानसारख्या देशांनी अंतराळाचे लष्करीकरण करू नये असे म्हटले आहे. जगात तुमच्याकडे शक्‍ती असली तर संयम असणेही आवश्‍यक असते. आपल्या शक्‍तीमुळे दहशत वा अकारण कोणाला असुरक्षित वाटणार नाही याची दक्षता घ्यावी लागते. कारण तसे जर झाले नाही, तर विनाकारण आपल्याला नको त्या संघर्षाला तोंड द्यावे लागते. भारताने शक्‍ती असली तरी आमच्याकडे संयमही आहे, हे असंख्य वेळा दाखवून दिले आहे. त्यामुळेच अमेरिकेसारखा सर्वशक्‍तिमान देशही भारतासोबत अणुसहकार्य करार करायला धजावला. हे भारताला दूषणे देणाऱ्या देशांनीही लक्षात घ्यायला हवे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)