उत्तरेतले बेरजेचे राजकारण… (अग्रलेख)

राजकारणातील बेरीज आणि वजाबाकी हे शब्द महाराष्ट्रातील धुरंधर राजकारण्यांनी दीर्घकाळ लोकप्रिय केले असले तरी या शब्दांचा खरा अर्थ उत्तर प्रदेशातील नेत्यांनाच कळला आहे, असे म्हणावे लागते. ज्या प्रकारे तेथे अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष आणि मायावती यांचा बहुजन समाज पक्ष एकत्र आले आणि कॉंग्रेसची वजाबाकी करतानाच सत्ताधारी भाजपची चिंता वाढवली, ते पहाता आता आगामी काळात देशातील आणि राज्यातील राजकारणाला वेगळे वळण मिळण्याचे संकेत आहेत. आगामी लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आली असतानाच उत्तर प्रदेशातील ही राजकीय समीकरणे बदलली आहेत. सर्व बाजुंनी विरोधी वातावरण तयार होत असतानाच भाजपाच्या चिंतेत भर पाडणारी सप-बसप यांच्या ऐतिहासिक युतीची घोषणा शनिवारी करण्यात आली.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांची झोप उडवणारी ही युती ठरणार आहे’, असे सांगत मायावती यांनी आपली रणनीती स्पष्ट केली आहे. या आघाडीत सपा-बसपाने कॉंग्रेसला स्थान दिलेले नसल्याने त्या पक्षालाही फटका बसणार आहे. मात्र, रायबरेली आणि अमेठी या कॉंग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघात उमेदवार उभा न करण्याची मायावतींची घोषणा कॉंग्रेसला थोडा दिलासा देऊ शकेल. अर्थात या युतीबाबत भाजपची प्रतिक्रियाही ठरलेली अशीच होती.”मोदींना टक्कर देण्यासाठी सप-बसप एकत्र येत असले तरी ही संधीसाधू आघाडी आहे. मोदी विरोधातील द्वेषाला आधार बनवून हे एकत्र येत आहेत’, अशा शब्दात केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नितीन गडकरी यांनी या युतीवर टीका केली आहे. ही युती संधीसाधू असेल किंवा उत्कृष्ठ राजकीय रणनिती असेल, पण राजकारणात सारे काही क्षम्य असते, ही म्हण लक्षात घेतली तर या युतीला संधीसाधू म्हणता येणार नाही. सप-बसप आतापर्यंत एकमेकांविरोधात लढले असले तरी आता अखिलेश आणि मायावती यांनी भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांना दूर ठेवून ही युती केली आहे, हे महत्वाचे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

युतीची घोषणा करताना त्यांनी या दोनही पक्षांवर जोरदार टीका केली आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे. “कॉंग्रेसच्या काळात घोषित आणीबाणी होती, तर आता देशात अघोषित आणीबाणी आहे. कॉंग्रेस- भाजपाची अवस्था एकसारखीच आहे, दोन्ही सरकारच्या काळात घोटाळे झाले आहेत, कॉंग्रेसच्या काळात त्यांना बोफोर्स घोटाळ्यामुळे सत्ता गमवावी लागली होती, तर आता भाजपाला राफेल घोटाळ्यामुळे सत्ता गमवावी लागेल’, असा दावा या दोघांनी केला आहे. तसेच यापुढे कॉंग्रेससोबत आघाडी करणार नाही अशी घोषणा करतानाच आम्ही कॉंग्रेससोबत गेल्याने नेहमी त्यांचा फायदा झाला, पण आम्हाला यातून काहीच मिळाले नाही, असे कारणही त्यांनी दिले आहे हे महत्वाचे आहे. त्यामुळे भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना आपल्या रणनीतीचा आता फेरविचार करावा लागणार आहे. खरे तर कोणतीही युती झाली की जागावाटप हा नेहमीच चिंतेचा विषय असतो. पण सप-बसपने जागावाटपाचा फॉर्म्युला निश्‍चित करुनच युतीची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या एकूण 80 जागा असून दोन्न्ही पक्ष प्रत्येकी 38 जागांवर निवडणूक लढवणार आहे.तर उर्वरित चार जागा महाआघाडीत सामील होणाऱ्या अन्य पक्षांसाठी सोडण्यात आल्या आहेत.

अन्य पक्ष कोणते याबाबत काहीच सांगण्यात आले नसले, तरी काही छोटे पक्ष या आघाडीत सामील हाऊ शकतात. नितीन गडकरी आणि भाजपच्या इतर नेत्यांनी, “या आघाडीचा आमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही’, असे म्हटले असले तरी ते काही खरे नाही.गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने उत्तरप्रदेशातील 80 पैकी 71 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही पक्षाला चांगले यश मिळाले होते. लोकसभेत भाजपच्या स्वत:च्या ज्या 281 जागा होत्या त्यापैकी 25 टक्के जागा उत्तर प्रदेशातून होत्या.आता आगामी निवडणुकीत भाजपला 80 पैकी 71 जागा मिळवणे अवघड असल्याने त्याचा परिणाम केंद्रातील सत्ता स्थापनेवर होणे अपिराहार्य आहे.

सप-बसपचे हे आव्हान मोडून काढण्यासाठी भाजपला संपूर्ण ताकद पणाला लावावी लागणार आहे. या राज्यात तिरंगी निवडणूक व्हावी आणि भाजपविरोधी मतांमध्ये फूट पडावी, अशीच आशा भाजपला करावी लागणार आहे.आता या राज्यात कॉंग्रेसही स्वबळावर लढणार असले तरी सध्याची या राज्यातील कॉंग्रेसची ताकद पहाता निवडणुकीतील तिसरी शक्ति म्हणून कॉंग्रेस ठळकपणे पुढे येईल अशी शक्‍यता कमी आहे. लालूंचा राजद आणि समाजवादी पक्षातून फुटून निर्माण झालेल्या पक्षांची कॉंग्रेसने आघाडी बांधली तरी, ती आघाडी किती परिणामकारक ठरेल याबाबत शंका आहे. त्यामुळे या राज्यात “बुवा-भतिजा’ एकत्र आल्याचा मोठा फटका सत्ताधारी भाजपलाच बसेल, हे उघड आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरही मायावती आणि अखिलेश यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. सत्ता समीकरणे घडवण्याची आणि बिघडवण्याची ताकद या दोघांमध्ये असणार आहे. आता ही युती कोणाच्या सत्तेची बेरीज करते आणि कोणाला सत्तेतून वजा करते हे येणारा काळच ठरवणार असला तरी हा काळ प्रामुख्याने भाजपलाच कठीण जाणार आहे, हे नक्की.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)