पुणे- पदे रिक्‍त; महसूलचा कारभार प्रभारींवर

पुणे- सध्याची आंदोलने आणि जिल्ह्याचा वाढता कारभार पाहता जिल्हा प्रशासनातील महत्त्वाची पाच पदे रिक्त आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विविध आदेश देण्याचे अधिकार असलेले निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारीसह इतर प्रमुख पदे रिक्त आहेत. पुणे हा महत्त्वाचा जिल्हा असताना ही पदे कधी भरणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

चाकण येथे घडलेली घटना पाहता येथील खेड तहसीलदार हे पद, राजशिष्टाचार, जिल्हा पुनर्वसन अधिकारी आणि शहर अन्नधान्य वितरण अधिकारी या पदी शासनाने नव्याने अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली नाही. ही पदे एक वर्षांपासून ते एक महिन्यांपर्यंत रिक्त आहे. या पदांवर प्रभारी अधिकारी नेमलेले आहे.

-Ads-

निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी हे जिल्हा प्रशासनातील महत्त्वाचे पद आहे. त्यांच्याकडे ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना आदेश देण्याचे अधिकार आहेत. त्याचबरोबर जमावबंदी लागू करण्याचेही अधिकार आहेत. जिल्हाधिकारी आणि नागरिक यांच्यातील दुवा साधण्याचे काम निवासी उपजिल्हाधिकारी हे करत असतात. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांची मंत्रालयात 1 जून रोजी बदली झाली. तेव्हांपासून हे पद रिक्त आहे.

खेड तहसीलदार हे पदही मागील दीड महिन्यांपासून रिक्त आहे. चाकण येथील घटना पाहता या ठिकाणी पूर्णवेळ तहसीलदार आवश्‍यक आहे. शहर अन्नधान्य वितरण अधिकारी हे पद मागील एक वर्षांपासून रिक्त आहे. हा पदभार तात्पुरता प्रभारीकडे सोपविण्यात आला आहे.

देश आणि राज्यातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा दौऱ्याचे नियोजन तसेच राजशिष्टाचाराचे पालन करण्याची जबाबदारी राजशिष्टाचार अधिकऱ्याकडे असते. यावर उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी नेमण्यात येतात. हेही पद मागील सहा महिन्यांपासून रिक्त आहे. मागील सहा महिन्यांत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे दौरे झाले आहेत. पुणे जिल्ह्यात नेहमीच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची विविध कार्यक्रमांना उपस्थिती असते. अशावेळी त्यांचे राजशिष्टाचार पाळणे आवश्‍यक असते. एवढे महत्त्वाचे पदही रिक्त आहे.

जिल्हा पुनर्वसन अधिकारी हे पदही एक वर्षांपासून रिक्त आहे. या सर्व महत्त्वाच्या पदांचा कारभार पाहण्याची जबाबदारी दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे. मूळ पदाचा पदभार आणि अतिरिक्त कारभार त्यामुळे या अधिकाऱ्यांनाही तारेवरची कसरत करावी लागत आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)