यादों की बारात : हळवं करणारं टपाल (भाग -2)

यादों की बारात : हळवं करणारं टपाल (भाग -1)

-अश्विनी धायगुडे-कोळेकर

कोणत्याही कथेला जर योग्य कलाकार नाही मिळाले तर ती कथा सिनेमारूपात फ्लॉप ठरते, पण इथे मात्र लक्ष्मण उत्तेकरचं भरभरून कौतुकच करावे लागेल. कारण त्यांनी केलेली पात्रांची निवड अगदीच योग्य होती. मास्तरांच्या भूमिकेतील नंदू माधव, तुळसा झालेली वीणा जामकर आणि छोटा रंग्या झालेला रोहन उत्तेकर सगळेच आपापल्या भूमिकेत चपखल बसले आहेत. वीणा आणि नंदू माधव दोघेही अत्यंत प्रगल्भ आणि जाण असलेले कलाकार आहेत याचा प्रत्यय दरवेळी येतोच. जो या सिनेमातही पुन्हा दिसून येतो. हे दोघेही अभ्यासू कलाकार आहेत. त्यांच्या प्रत्येक भूमिकेचा त्यांनी अभ्यास केलेला असतोच हे या सिनेमातही प्रकर्षाने जाणवते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रंग्याचे ते पत्र मास्तरांना मिळणं, ते पत्र मिळवण्यासाठी रंग्याचा आटापिटा, शेवटी शहरात कामासाठी निघालेल्या तुळसा आणि मास्तरांसोबत अख्खा एक दिवस शहरात घालवणं ही सगळी धमाल या गोष्टीत रंगत आणते. रंग्याच्या त्या बालसुलभ गोष्टींनी तुळसा आणि मास्तरांच्या बेरंग आयुष्यात आयुष्यभर पुरून उरतील असे रंग भरले आहेत ज्याची त्याला कल्पना नाही.

तो एक उनाड दिवस त्यांच्या आयुष्याला जणू नवा अर्थ देऊन जातो, पण नियतीने त्यांच्यासमोर काहीतरी वेगळेच मांडून ठेवले आहे. तो एक दिवस मास्तरांसाठी जणू काळा दिवसच ठरतो. सारं गाव ज्याला देवासारखा मानत असतो त्याच मास्तरांना गाव सोडायची पाळी येते. ते गाव सोडतात, पण ना रंग्याच्या मनातून मास्तर जातात ना मास्तरांच्या मनातून रंग्या जातो. एकमेकांच्या मनातील हळवा कोपरा दोघेही कायमस्वरूपी जपून ठेवतात. इतका की मास्तर गेल्यानंतर त्यांचे सगळे विधी देखील रंग्याच करतो.

ते म्हणतात न, की प्रत्येकाच्या आयुष्यात काही आठवणी अशाच आसतात ज्या दुखऱ्या असतात, पण तितक्‍याच हव्याहव्याशा असतात आणि मनाच्या एका कोपऱ्यात तरलपणे जपूनही ठेवल्या जातात. असंच काहीसं हा सिनेमा पाहताना वारंवार वाटून जातं.

मुळात सिनेमाची कथाच फार हळवी आहे. सोबतच त्या एका कथेला मिळालेली दुसऱ्या निरागस प्रेमकथेची झालर आहे. त्यामुळे पहिली कथा अजूनच देखणी आणि उठावदार झालीय. या कथांना साजेसंच संगीत संगीतकार रोहित नागभिडेने दिले आहे. सिनेमातील चारही गाणी अत्यंत श्रवणीय तर आहेतच, पण गुणगुणत राहावीत अशीही आहेत. रंग्या आणि कुकीवर चित्रित झालेले स्वप्नील बांदोडकरच्या आवाजातील ‘मन मोहरून आले’ हे गाणं तर अत्यंत देखणं झालंय. अख्खा सिनेमाभर आपल्याला एक पिवळसर झालर दिसते त्यामुळे तर सिनेमा देखील अजूनच देखणा झालाय.

एका मुलाखती दरम्यान विणाला विचारलं गेलं होतं की तुझ्या जवळपास सगळ्याच भूमिका ग्रामीण बाज असणाऱ्या आहेत. तेव्हा यावर विणा म्हणाली होती की, जरी माझ्या कपाळावरचं कुंकू सारखंच दिसत असल तरी ते वेगळंच आहे. अगदी तसेच माझा गेटअप जरी सारखा वाटत असला तरी त्याला विविध पैलू असतात आणि त्याच विविधतेमुळे मी भूमिका स्वीकारलेली असते.

हा सिनेमाही ज्या भागात चित्रित केला आहे त्या भागातील भाषा यांच्या तोंडी दिसून येते. त्याला लहेजा आणि हेल यावरही उत्तम काम केलेलं सिनेमाभर जाणवत राहतं.

छोटा रोहन अगदीच निरागस दिसतो. त्याचा तो खोडसाळ निरागसपणा दिगदर्शकाने फार मस्त वापरला आहे. त्यामुळेच विणा आणि नंदू माधव या दिगग्ज कलाकारांच्या सोबतच रोहन देखील लक्षात राहतो.

मंगेश हाडवळेची निर्मिती व कथाही त्यांचीच असणारा हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात मात्र कायमस्वरूपी घर करतो हे मात्र अगदी खरे.

-क्रमश:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)