यादों की बारात : हळवं करणारं टपाल (भाग -1)

-अश्विनी धायगुडे-कोळेकर

कोणत्याही कथेला जर योग्य कलाकार नाही मिळाले तर ती कथा सिनेमारूपात फ्लॉप ठरते, पण इथे मात्र लक्ष्मण उत्तेकरचं भरभरून कौतुकच करावे लागेल. कारण त्यांनी केलेली पात्रांची निवड अगदीच योग्य होती. मास्तरांच्या भूमिकेतील नंदू माधव, तुळसा झालेली वीणा जामकर आणि छोटा रंग्या झालेला रोहन उत्तेकर सगळेच आपापल्या भूमिकेत चपखल बसले आहेत. वीणा आणि नंदू माधव दोघेही अत्यंत प्रगल्भ आणि जाण असलेले कलाकार आहेत याचा प्रत्यय दरवेळी येतोच. जो या सिनेमातही पुन्हा दिसून येतो. हे दोघेही अभ्यासू कलाकार आहेत. त्यांच्या प्रत्येक भूमिकेचा त्यांनी अभ्यास केलेला असतोच हे या सिनेमातही प्रकर्षाने जाणवते.

एक रसिक म्हणून एक गोष्ट कबूल करावीच लागेल की, कित्येक बाबतीत मराठी चित्रपटसृष्टी ही हिंदीच्या तुलनेत कमी आहे. मग ते मार्केटिंग असो, तंत्रज्ञान असो वा सिनेमामधली गुंतवणूक. (आता काही प्रमाणात चित्र बदलते आहे.)

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पण केवळ आशयप्रधान कथानकाच्या बाबतीत मराठी चित्रपटसृष्टी हिंदीपेक्षा कित्येक पावलं पुढेच आहे. एक सशक्त कथाच उत्तम कलाकृती बनू शकते हे मराठी चित्रपटसृष्टीला पुरते ठाऊक आहे. त्यामुळेच मराठीमध्ये नेहमीच इतर गोष्टींपेक्षा उत्तम कथेला नेहमीच प्राधान्य दिले जाते.

याच दर्जेदार कथानकाचा मोह महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांना देखील झाला. त्या पाठोपाठ हिंदीमधील अनेक नामांकित व प्रसिद्ध चेहऱ्यांना मराठी चित्रसृष्टीची भुरळ पडली ती आजतागायत. त्यामध्ये केवळ कलाकारच नाही तर गायक, संगीतकार, निर्माते, सिनेमॅटोग्राफर, तंत्रज्ञ आदी सगळीच मंडळी हल्ली मराठीमध्ये सहजपणे वावरताना दिसतात. मराठीमधील अनेक कलाकारांनी हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली आहेच, पण सलमान खान, रितेश देशमुख, सुनील शेट्टी, उर्मिला, सोनाली, जेनेलिया ते अगदी तमन्ना भाटिया, सायमि खैर या सगळ्या हिंदीमधील नावाजलेल्या कलाकारांनी देखील मराठीमध्ये प्रवेश केला आहे.

याच पंक्तीमधलं एक मराठी नाव ज्याने हिंदीमध्ये उत्तम काम केलेच आणि मराठीमध्येही एक आशयघन सिनेमा करत त्याचे दिग्दर्शनही केले. ते नाव म्हणजे लक्ष्मण उत्तेकर ‘ब्लू’, ‘बॉस’, ‘ इंग्लिश विंग्लिश’ अशा एकाहून एक सरस हिंदी सिनेमांसाठी त्यांनी सिनेमॅटोग्राफी केलेली आहे. कॅमेऱ्याची उत्तम जाण असलेले लक्ष्मण उत्तेकर यांचा 2014 साली आलेला हा चित्रपट म्हणजे ‘टपाल’.

सिनेमाचे नाव पाहिल्याबरोबरच एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे हा सिनेमा जुना काळ दर्शविणारा आहे. आजच्या फोन – मोबाईलच्या युगात ‘टपाल’कडे नक्कीच ‘ओल्ड’ किंवा जुनाट माध्यम म्हणून पाहिले जाते. त्यामुळे सुरुवातीला वाटणारी ही शंका अगदीच रास्त आहे. हा सिनेमा जुना काळ दर्शवितो. ज्या काळात एखादा निरोप केवळ पत्राच्या आणि पर्यायाने पोस्टमनच्या माध्यमातूनच मिळत असे. त्यामुळे पोस्टमनच असणारं महत्त्व देखील या सिनेमातून नकळत अधोरेखित होतं.

तर या सिनेमाची कथा आहे देवराम मास्तर (नंदू माधव) आणि त्यांची पत्नी तुळसा (वीणा जामकर) हिची. पण सिनेमाचा खरा हिरो आहे रंग्या (रोहन उतेकर). देवराम मास्तर आणि त्यांची पत्नी तुळसा यांना मूलबाळ नाहीये. अनेक उपचार करूनही त्यांना फरक पडलेला नाही. पण या दोघांचाही रंग्यावर अतोनात जीव. लहान रंग्याचा मात्र पाटलांच्या कुकीवर जीव तिला इम्प्रेस करण्यासाठी तो वाट्टेल ते करतोय. अगदी शहरातल्या ‘खन्ना – राजेश खन्ना’ सारखी बेलबॉटम ची पॅन्ट आणि रंगीत शर्ट सुद्धा शिवून घेतलाय त्याने आणि त्यासाठी मारुतीच्या देवळातील एक रुपया सुद्धा हळूच चोरलाय. परत करायच्या बोलीवर.

असा हा निरागस रंग्या एकदा कुकीला पत्र लिहितो. म्हणजे प्रेमपत्रच ते आणि ते पत्र पोस्टात टाकतो. त्यांनतर होणारी धमाल आपल्याला अलवारपणे हळवं करून जाते. खरंतर ही गोष्ट एकट्या रंग्याची नाही तर या गोष्टीत देवराम मास्तर आणि तुळसा यांचीही गोष्ट आहे. म्हणजे दोन वेगवेगळ्या गोष्टींची गुंफण करून त्यातून एक सुंदर, अलवार आणि हळवी तिसरीच गोष्ट तयार झालेली इथे पाहायला मिळते.

यादों की बारात : हळवं करणारं टपाल (भाग -2)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)