साताऱ्यातून साडे दहा हजार, माढ्यातून चार हजार झाले होते मतदान

सम्राट गायकवाड
सातारा – लोकशाही प्रक्रिया पारदर्शीपणे पार पाडण्यामध्ये सर्वाधिक महत्वाचे स्थान असलेल्या लोकसभेच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. जिल्ह्यातील माढा आणि सातारा मतदारसंघासाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य असणार आहे ते नकारात्मक मतदान रोखण्याचे. मागील निवडणुकीत सातारा मतदारसंघातून 10 हजार 589 मतदारांनी तर माढा मतदारसंघातून 4 हजार 209 मतदारांनी नकारात्मक मतदान करण्याचा पर्याय निवडला होता. साहजिकच यंदा दोन्ही मतदारसंघात चुरशीच्या लढती होणार असल्याने उमेदवारांसमोर नकारात्मक मतदान रोखण्याचे आव्हान असणार आहे.

सन.2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने नकारात्मक मतदान तथा सर्व उमेदवारांना मतदान नाकारण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला. तद्‌नंतर झालेल्या सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सातारा व माढा मतदारसंघात देखील मोठ्या संख्येने नकारात्मक मतदान करण्यात आले. सातारा मतदारसंघात झालेल्या एकूण मतदानापैकी 1.08 टक्के मते ही नकारात्मक होती. त्या निवडणुकीत एकूण 18 उमेदवार रिंगणात होते. मात्र, या सर्वांना साडे दहा हजार मतदारांनी नाकारले होते. विशेष बाब म्हणजे, सात उमेदवारांना मिळालेल्या मतांपेक्षा नकारात्मक मतांची संख्या अधिक होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत उभ्या राहणाऱ्या उमेदवारांसमोर प्रतिस्पर्धी उमेदवारासह नकारात्मक मतदानाचे देखील तितकेच आव्हान असणार आहे.

नकारात्मक मतदान होण्यामागे अनेक कारणे असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी महत्वाचे कारण म्हणजे उमेदवारांचा मतदारांशी संपर्क नसणे, ही सर्वात महत्वाची बाब नोंद करण्यात आली आहे. त्या पाठोपाठ निवडणुकीतील जाहीरनाम्यात दिलेल्या आश्‍वासनांची पुर्तता न करणे आणि निवडणुकीपुरतेच घराच्या दारासमोर मते मागण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांबाबत मतदारांच्या मनात राग असल्याची देखील बाब समोर आली आहे. त्याचबरोबर जे उमेदवार पहिल्यांदाच निवडणूक लढवित आहेत. त्यांचा जाहीरनामा, मतदारांप्रती असलेली समाजकार्याची भावना नसेल, अशा कारणांमुळे देखील मतदार नकारात्मक मतदानाचा पर्याय निवडतात. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवारासह नकारात्मक मतदानाचे आव्हान असणार आहे. विशेषत: यंदाची निवडणूक चुरशीची होणार, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. अशावेळी नकारात्मक मतदानाची संख्या वाढली तर त्याचा सर्वात मोठा परिणाम तुल्यबळ उमेदवारावर होणार आहे.

उमेदवार आत्मचिंतन करणार का ?

मागील निवडणूकीत सातारा आणि माढा दोन्ही मतदारसंघात झालेल्या नकारात्मक मतदानाची संख्या निश्‍चितपणे चिंता वाढविणारी आहे. विशेषत: मागील निवडणूकीतील पक्ष आणि त्यांचे तेच उमेदवार पुन्हा एकदा निवडणूकीला सामोरे जाणार आहेत. अशावेळी जाहीर प्रचार सभांमध्ये ज्या प्रकारे मतांचा जोगवा मागणार आहेत. त्याचप्रमाणे यंदाच्या निवडणुकीत नकारात्मक मतदान न करण्याचे आवाहन ते मतदारांना करणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)