कोरेगावच्या पोटनिवडणुकीत पालकमंत्र्यांना धक्का

शशिकला शेळके यांचा 539 मतांनी दारुण पराभव
राष्ट्रवादीच्या मनीषा जाधव विजयी; अपक्षाचा भाजपाला फटका

पालकमंत्र्यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

कर्जत-जामखेड मतदारसंघातून रोहित पवार हे इच्छुक आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ते मतदारसंघात कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करीत आहेत. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष मंजुषा गुंड यांचीही मोर्चेबांधणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कोरेगाव पंचायत समिती गण हा भाजपच्या ताब्यातून काढून घेत, त्यांनी पालकमंत्री राम शिंदे यांना मोठा धक्का दिला आहे. हा पराभव पालकमंत्री शिंदे यांना आत्मचिंतन करायला लावणारा आहे.

कर्जत – कर्जत तालुक्‍यातील कोरेगाव पंचायत समिती गणाच्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचा दारुण पराभव करीत, राष्ट्रवादी-कॉंग्रेस आघाडीच्या मनीषा दिलीप जाधव विजयी झाल्या. त्यामुळे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना मतदारसंघात मोठा धक्का बसला. भाजपच्या ताब्यातील कोरेगाव गणात पालकमंत्री राम शिंदे यांना कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने धोबीपछाड केले आहे.

कोरेगाव पंचायत समिती गणासाठी रविवारी मतदान झाले होते. सोमवारी सकाळी कर्जत तहसील कार्यालयामध्ये मतमोजणी झाली. त्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे वर्चस्व मोडून काढत ही जागा खेचून आणली. मनीषा दिलीप जाधव यांनी 5238 मते मिळवून भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार शशिकला हनुमान शेळके यांचा 539 मतांनी दारुण पराभव केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या गणातील ही निवडणूक असल्याने त्यांच्यासाठी या निवडणुकीला विशेष महत्त्व होते. आगामी विधानसभेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर भाजपनेही जागा राखण्यासाठी चांगलीच कंबर कसली होती.

तालुक्‍यातील भाजपाचे बहुतांश नेते गणात ठाण मांडून होते. मात्र या निवडणुकीत त्यांना वर्चस्व राखता आले नाही.अपक्ष उमेदवार असलेल्या शितल हृषिकेश धांडे यांना 2309 मते मिळाली. त्याचा भाजपाला मोठा फटका बसला. निकाल जाहीर होताच कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे नेते, कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत फटाक्‍यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत कर्जत शहरातून मिरवणूक काढली. जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र गुंड, नानासाहेब निकत, ऍड. सुरेश शिंदे कॉंग्रेसचे ऍड. कैलास शेवाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, तालुकाध्यक्ष किरण पाटील, युवा नेते हृषिकेश धांडे, बाळासाहेब लोंढे आदींनी गोदड महाराज मंदिरात दर्शन घेऊन नवनिर्वाचित सदस्य मनीषा जाधव यांचा सत्कार केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)