पुणे व बारामती या दोन लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान; प्रशासन सज्ज

सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत वेळ


सखी मतदान केंद्रांमुळे महिलांचा सहभाग वाढणार


खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सुट्टी, सवलत बंधनकारक

पुणे – पुणे व बारामती या दोन लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी (दि.23) मतदान होणार असून जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. मंगळवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

151 मतदान केंद्र संवेदनशील, बंदोबस्त वाढविणार
निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार, जिल्ह्यात संवेदनशील अशा मतदान केंद्रांची यादी तयार करण्यात आली आहे. मतदार यादीमध्ये मतदारांचे छायाचित्र असण्याचे प्रमाण कमी आहे. यादीमध्ये मयत, दुबार आणि स्थलांतरीत मतदारांचे प्रमाण जास्त आहे. ज्या मतदान केंद्रावर यापूर्वी 90 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे. तसेच या ठिकाणी एकाच उमेदवाराला 75 टक्के मतदान मिळाले आहे. मतदान केंद्रावर गोंधळ, भांडणे, गैरप्रकार किंवा वारंवार एकाच मतदान केंद्रावरील ईव्हीएममध्ये बिघाड होणे आदी निकषानुसार संवेदनशील मतदान केंद्र निवडण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पुणे आणि बारामती मतदारसंघात एकूण 151 मतदान केंद्र संवेदनशील आहे. पुणे मतदारसंघात 89 तर बारामती मतदारसंघात 62 मतदान केंद्र संवेदनशील असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त राहणार आहे.

22 हजार कर्मचाऱ्यांची टपाली मतदानासाठी नोंदणी
पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या चार लोकसभा मतदारसंघात सुमारे 40 हजार कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आले आहे. त्यापैकी 22 हजार कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानासाठी नाव नोंदणी केली आहे. निवडणुकीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्‍यकता भासते. जिल्हा प्रशासनाकडून विविध विभागातील अधिकारी- कर्मचाऱ्यांसह शिक्षकांचीही नेमणूक निवडणुकीच्या कामासाठी करण्यात आली आहे. निवडणुकीसाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षणाच्या काळात कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानासाठी नोंदणी करून घेतली जात आहे.

मतदानासाठी ही ओळखपत्रे राहणार ग्राह्य
1) पासपोर्ट, 2) ड्रायव्हिंग लायसन्स, 3) राज्य व केंद्र शासन, सार्वजनिक क्षेत्रातील, पब्लिक लिमिटेड कंपनीतील कर्मचाऱ्यांचे फोटो असलेले ओळखपत्र, 4) बॅंक व पोस्ट कार्यालयाने फोटोसह दिलेले पासबुक, 5) पॅन कार्ड, 6) आधार कार्ड, 7) राष्ट्रीय जनसंख्या रजिस्ट्रारने दिलेले स्मार्ट कार्ड, 8) मनरेगा जॉब कार्ड, 9) श्रम मंत्रालयाच्या योजनेद्वारे दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, 10) पेन्शन ओळखपत्र 11) खासदार, आमदार यांनी दिलेले ओळखपत्र

12 मतदान केंद्र सखी मतदान केंद्र
लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदार संघनिहाय एक मतदान केंद्र महिला व्यवस्थापित मतदान केंद्र (सखी मतदान केंद्र) निर्माण करण्यात येणार आहे. त्यानुसार पुणे व बारामती मध्ये एकूण 12 मतदान केंद्र ही सखी मतदान केंद्र असणार आहे. सखी मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वच जण महिला असतील. सखी मतदान केंद्रांमुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढण्यास मदत होणार आहे.

मतदान केंद्रावर या असणार सुविधा
लोकसभा निवडणुकांकरिता मतदान केंद्रांवर अत्यावश्‍यक किमान सुविधांची संख्या यावर्षी दुप्पट करण्यात आली आहे. यामध्ये मेडिकल किट, मतदान केंद्रांवर सावलीची व्यवस्था, दिव्यांग तसेच गर्भवती महिला मतदारांसाठी स्वयंसेवकांची मदत, लहान मुलांसाठी पाळणाघर, अंध आणि दिव्यांग मतदारांच्या वाहतुकीची व्यवस्था, रांगेचे व्यवस्थापन या सुविधा यावर्षी नव्याने करण्यात येणार आहेत. मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी निवडणूक आयोगामार्फत विविध उपाययोजना केल्या जातात. गेल्या निवडणुकीत मतदान केंद्रांवर सुमारे सात प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये रॅम्पची व्यवस्था, पिण्याचे पाणी, वीजेची उपलब्धता, मदत कक्ष, स्वच्छतागृहांची सुविधा या अत्यावश्‍यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या होत्या. यावर्षी त्यामध्ये दुपटीने वाढ करुन 15 प्रकारच्या अत्यावश्‍यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. नव्याने उपलब्ध करुन दिलेल्या सुविधेतील मेडिकल किटमध्ये वेदनाशामक औषध, बॅण्डेज, ओआरएस पावडर, जखमेवर लावण्यासाठी पट्टी आदी साहित्याबरोबरच प्रत्येक मतदान केंद्रावर एक वैद्यकीय सहाय्यक उपलब्ध असणार आहे. वाढत्या तापमानाची दखल घेताना मतदान केंद्रांवर महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार आणि महिलांसोबत असलेल्या लहान मुलांचा उन्हापासून बचावाकरिता, सावलीसाठी मंडप टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)