केवळ एका मतदारासाठी पोलिंग बूथ

– सुधीर मोकाशे

लोकशाहीमध्ये प्रत्येक मत अमूल्य आणि मौल्यवान असते. त्यामुळेच निवडणूक आयोग प्रत्येक मतदाराला मतदान करता येईल अशा सोयीसुविधा पुरवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. याचे उत्तम उदाहरण यंदा समोर आले आहे. हे उदाहरण आहे अरुणाचल प्रदेशातील. भारतातील मोठ्या राज्यांच्या यादीतील एक राज्य असणाऱ्या अरुणाचलमध्ये लोकसभेच्या दोन जागा आहेत. 2014 मध्ये तेथे कॉंग्रेस आणि भाजपाने एक-एक जागा पटकावली होती. 31 डिसेंबर रोजी या राज्यातील सत्तारूढ पक्ष असणाऱ्या पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल या पक्षातील 43 पैकी 33 आमदारांनी भाजपाच्या गोटात प्रवेश केला. यानंतर तेथे भाजपाचे सरकार सत्तेत आले आहे.

या राज्यात यंदाच्या लोकसभेसाठी एकूण 7.94 लाख मतदार मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत. तेथे येणाऱ्या 11 एप्रिल रोजी लोकसभेच्या दोन जागांसाठी आणि विधानसभेच्या 60 जागांसाठी मतदान होणार आहे. या पहाडी प्रदेशात 2202 पोलिंग स्टेशन्स आहेत. यापैकी ह्युलियांग विधानसभा मतदारसंघातील एका बूथवर केवळ एकच मतदार आहे. 11 एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये हा मतदार मतदान करणार आहे. पण तरीही तिथेही निवडणूक आयोगाने पोलिंग बूथ बनवले आहे. गतवेळच्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी तिथे केवळ दोनच मतदारांनी मतदान केले होते. अरुणाचल पूर्व लोकसभा मतदारसंघातील हे पोलिंग बूथ देशातील सर्वांत छोटे पोलिंग बूथ म्हणून नोंदवले गेले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)