“रामकारणाचा हुंकार’ (अग्रलेख) 

कुंभकर्णी झोपेतून जागे व्हा आणि अयोध्या येथे राम मंदिर उभारण्याची तारीख जाहीर करा, असे आव्हान अयोध्या दौऱ्यावर असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला दिले आणि राम मंदिर बांधण्यासाठी केंद्र सरकार कायदा करणार असेल किंवा अध्यादेश काढणार असेल तर शिवसेना पाठिंबा देईल, अशी घोषणाही केली आहे. राम मंदिर बांधण्यासाठी कायदा करणे वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत कठीण होते. परंतु आता केंद्रात भाजपचे मजबूत सरकार आहे. त्यामुळे स्पष्ट शब्दात उध्दव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडल्याने आता भाजप सरकार काय भूमिका घेते, हे पहावे लागणार आहे. अर्थात उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा ठरला असतानाच संघ परिवाराने नागपूर, कानपूर आणि अयोध्या येथे राम मंदिरासाठी “हुंकार रॅली’चे आयोजन केल्याची घोषणा केली होती. त्या घोषणेप्रमाणे रविवारी या तीनही ठिकाणी “हुंकार रॅली’ होऊन हिंदुत्ववाद्यांनी आपले शक्तीप्रदर्शन केले. त्यापुर्वी काही दिवस आधी कॉंग्रेसच्या एका नेत्याने कॉंग्रेसच्याच काळात राममंदिराचे दरवाजे उघडले होते आणि आता राहुल गांधी पंतप्रधान झाल्यावरच राममंदिर उभे राहील अशी घोषणा केली होती.

इतर काही राजकीय पक्ष देशात राम मंदिरापेक्षा अनेक महत्वाचे प्रश्‍न बाकी असल्याची भूमिका घेत असले तरी, देशातील सध्याच्या परिस्थितीत विधायक “राजकारणापेक्षाही रामकारणच’ महत्वाचे ठरत आहे. महाराष्ट्रातील आणि देशातील सरकारवर सतत टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यापासून राम मंदिराचा प्रश्‍न उचलून धरल्यापासून सर्वचजण जागे झाले आणि या विषयात आपलेही योगदान असावे म्हणून मोर्चेबांधणीही सुरू झाली. गेल्याच महिन्यात राम मंदिरासाठी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा रा. स्व. संघाने दिल्यानंतर नागपूरमध्ये संघ मुख्यालयातल्या बैठकीत राम मंदिरासाठी संघातर्फे “हुंकार रॅली’चे आयोजन करण्याची घोषणा करण्यात आली. त्यापुर्वी संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या समारोपाप्रसंगी सहकार्यवाह भय्याजी जोशी यांनी, “हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील राम जन्मभूमी हा आमच्या प्राधानक्रमाचा मुद्दा नाही, हे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे केवळ खेदजनक नव्हे, तर हिंदूंच्या भावनांचा अपमान करणारे आहे. न्यायालयाने आपल्या प्राधान्यक्रमाचा विचारा करावा, अन्यथा गरज पडल्यास राम मंदिरासाठी पुन्हा एकदा आंदोलन उभे करावे लागेल’, असा स्पष्ट इशारा दिला होता. त्यानंतरच आता नियोजनपूर्वक राम मंदीराचा मुद्दा पुढे रेटला जात आहे.

शिवसेनेने याबाबत पुढाकार घेतल्यानंतरच या हालचाली सुरु झाल्या आणि शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यात आडकाठी आणण्याचे प्रयत्न सुरु झाले होते. ठाकरे यांच्या दौऱ्याच्या दिवशीच अयोध्येत “हुंकार रॅली’चे आयोजन करण्यात आल्याने ठाकरे यांना जाहीर सभाही रद्द करावी लागली. म्हणजेच राम मंदिरासाठी राजकारण सुरु असतानाच एकमेकांवर कुरघोड्या करण्याचे राजकारणही सुरु आहे. “भाजपशी पुन्हा युती करण्यासाठीच शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा हाती घेतल्याची,’ टीका रा. स्व. संघाचे नेते म. गो. वैद्य यांनी केली आहे. “हिंदुत्वाच्या मुद्यावरच भाजपशी युती होऊ शकते,’ असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनीही केले होते, हे लक्षात घेण्यासारखे आहे. देशात सध्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. “आणखी पाच महिन्यातच लोकसभा निवडणूकही होणार आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे निवडणुकीच्या तोंडावरच राम मंदिराचा विषय समोर आणला जात आहे,’ या विरोधकांच्या आक्षेपात तथ्य आहे, असेच म्हणावे लागते. देशात मूलभूत समस्यांबाबत सवाल उपस्थित केले जात असतानाच, राम मंदिराचा प्रश्‍न समोर आणून भारतीयांचे लक्ष वळवण्याची ही नेहमीची खेळी आहे.

“राम मंदिराच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी कायदा करा किंवा अध्यादेश आणा’, अशी मागणी केली जात असताना ती मागणी पूर्ण करणे शक्‍य आहे का, याचाही विचार व्हायला हवा. हा विषय सध्या न्यायालयासमोर आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणासाठी जानेवारीतली तारीख दिली आहे. त्या तारखेला जे काही होईल ते समोर येईपर्यंत सरकारला वाट बघावी लागणार आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने मंदिराच्या बाजून निर्णय दिला नाही किंवा पुढची तारीख दिली, तरच सरकार अध्यादेश आणू शकते. सरकारला याबाबत तशी कोणतीही अडचण नाही. कारण राम मंदिर उभारणीच्या विषयातील मुस्लीम पक्षकार इक्‍बाल अन्सारींनीही आता राम मंदिराच्या निर्मितीसाठीच्या कायद्याचे समर्थन केले आहे. “मंदिर निर्मितीसाठी सरकारने जर कायदा आणला तर त्याला आपला आक्षेप नसेल,’ असे त्यांनी म्हटले आहे. अन्सारी यांनी यापूर्वी राम मंदिराचा तोडगा

सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातूनच झाला पाहिजे, अशी आग्रही भूमिका मांडली होती. पण त्यांनीच भूमिका बदलल्याने सकारात्मक वातावरण निर्मीती झाली आहे. तरीही सरकार अध्यादेशाचा मार्ग स्वीकारणार नाही. या “रामकारणा’च्या हुंकारातून भाजपला निवडणुकीतील यशही हवे आहे. कोणी कितीही आंदोलने केली, तरी राम मंदिराच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी सरकार योग्य वेळेची वाट पहात आहे, हे उघड आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)