“बंद पाईपलाईन’चे सेनेकडून राजकारणच

एकीच्या बैठकीकडे नगरसेवकांची पाठ

शिवसेनेमध्ये सध्या प्रचंड धुसफूस असल्याची चर्चा शहरात आणि मावळ लोकसभा मतदारसंघात सुरू आहे. त्यामुळे शिवसेना एकसंध असून कसलीच धुसफूस नसल्याचे दाखविण्यासाठी शिवसेनेने आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. महापालिकेत सध्या शिवसेनेचे 9 नगरसेवक आहेत. मात्र या 9 जणांपैकी प्रमोद कुटे हे एकमेव नगरसेवक पत्रकार परिषदेला उपस्थित होते. यामुळे शिवसेनेत धुसफुस असल्याचीच बाब एकीचे दर्शन घडविणाऱ्या पत्रकार परिषदेत समोर आली आहे.

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरासाठी भविष्यातील पाणी योजना म्हणून महत्त्वाच्या असलेल्या बंद पाईपलाईन योजनेवर शिवसेनेकडून राजकारण सुरुच आहे. शेतकरी आंदोलनावरून इतरांवर आरोप करणाऱ्या शिवसेनेने दुटप्पी घेत शहरवासियांच्या महत्त्वाच्या प्रश्‍नावर भावनिक वातावरण निर्मिती करण्याचे धोरण राबविल्याने त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसण्याची शक्‍यता आहे.

आज (बुधवारी) झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी या प्रश्‍नावर घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेना या प्रश्‍नाचे राजकीय भांडवल करीत असल्याचीच बाब समोर आली आले. पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची गरज लक्षात घेवून तात्कालीन सत्ताधाऱ्यांनी 2007 साली बंद पाईपलाईन योजना राबविण्याचा निर्णय धेतला होता. या योजनेबाबत संपूर्ण तयारी झाल्यानंतर 2011 साली या योजनेच्या कामाला मंजूरी देण्यात आली होती. पवना धरण ते रावेत बंधारा या 72 किलोमिटर अंतरामध्ये बंद पाईपलाईन टाकून थेट पाणी आणण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र मावळातील शेतकऱ्यांनी या योजनेला विरोध दर्शविल्याने ही योजना अडचणीत आली होती. त्यातच पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याने त्या ठिकाणी झालेल्या गोळीबारात तीन शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले होते.

यानंतर आजपर्यंत ही योजना बंद बस्त्यात आहे. न्यायालयातही या योजनेवर सुनावणी सुरू आहे. गेल्या सात वर्षांपासून ही योजना जैसे थे आहे. शिवसेनेकडून प्रत्येक लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत मावळच्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित करून शेतकऱ्यांमध्ये सहानुभूती निर्माण करण्याचा व त्यावर मते मिळविण्याचा प्रयत्न होत आला आहे. मात्र गेल्या सात वर्षांत हा प्रश्‍न सुटावा यासाठी केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेने कोणताच प्रयत्न केलेला नाही. मावळात योजनेच्या विरोधात भूमिका धेणारे शिवसेना नेते पिंपरीत मात्र शेतकऱ्यांना विश्‍वासात घेवून ही योजना झाली पाहिजे अशी भूमिका घेत असल्याने या दुटप्पी भूमिकेचा शिवसेनला फटका बसण्याची शक्‍यता आहे.

भावनिक वातावरण निर्मितीचा प्रयत्न आज झालेल्या पत्रकार परिषदेतही शिवसेनेच्या नेत्यांकडून हा मुद्दा उपस्थित करून पुन्हा भावनिक वातावरण निर्मिती करण्याचा प्रकार घडला. मावळची जनता बंद पाईपलाईन योजनेतील गोळीबार विसरले नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. मात्र शिवसेनेने हा प्रश्‍न सोडविण्यासाठी काय केले आणि नेमकी भूमिका काय? यावर मात्र शेतकऱ्यांना विश्‍वासात घेवून हा प्रश्‍न सुटला पाहिजे एवढेच उत्तर देवून बोळवण करण्याचा प्रयत्न झाला. शहरवासियांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या या प्रकल्पाला मुळ स्वरुप देण्याची गरज असताना सत्ताकाळात शिवसेनेने काहीच केले नसल्याचेच स्पष्ट झाले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)