दखल: राजकारण आणि शिस्त

जयेश राणे

लोकसभागृहात लोकप्रतिनिधी किती गोंधळ करतात, हे सर्वश्रुत आहे. अनेक दशके हे असेच चालू आहे. सत्तांतरे झाली तरी ‘गोंधळ’ हे सूत्र मात्र एकसामायिक आहे. त्याच्यापासून आपण वेगळे व्हायला पाहिजे असे का कोणाला वाटत नाही ? विचारांचा प्रतिवाद विचारांनी नक्‍की करावा. तो करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र विरोधास विरोध करताना कधी कुठे जीभ घसरते, तर कधी अध्यक्षांसमोरच्या दालनात धावण्यात येते. काय आहे हे सर्व? जनता यासाठी तुम्हाला सभागृहात पाठवते का? या गोंधळातून काहीच हाती लागत नाही.

उत्तर प्रदेशमध्ये जिल्हा नियोजन बैठकीत मंत्र्यांसमोरच भाजपच्या खासदार-आमदार यांच्यात झालेली हाणामारी चकित करणारी आहे. खासदार शरद त्रिपाठी यांनी आमदार राकेश बघेल यांना एका रस्त्याच्या पायाभरणी समारंभाच्या कोनशिलेवर नाव नसल्याबद्दल जाब विचारला होता. त्यावर हा आपला निर्णय होता असे बघेल यांनी सांगताच, येथे बैठकीचे परिवर्तन कुस्तीच्या आखाड्यात झाले. त्यामुळे आयोजित बैठकीचा घडल्या प्रकारामुळे विचकाच झाला. या ठिकाणी दोन लोकप्रतिनिधींमुळे उपस्थितांचा आणि जनहितकारी प्रश्‍न तडीस नेण्यासाठी दिलेला वेळ वाया गेला. बैठकीत चर्चा, नियोजन, अडचणींचे समाधान आदी गोष्टी होत असतात. याचे भान न ठेवता हाणामारी करून एकमेकांवर कुरघोड्या करण्याचा आटापिटा झाला. जनसेवेपेक्षा स्वप्रतिष्ठा जपणे आणि जाणीवपूर्वक एखादी गोष्ट करणे यांसाठी वेळ देणे चूकच !

मारहाणीच्या घटनेविषयी संबंधितांवर कारवाई झाली तरी भारतीय जनता पार्टीला विरोधक यावरून भविष्यातही खोचक प्रश्‍न विचारत राहणार हे सत्य आहे. उतावीळपणे चुकीच्या गोष्टी केल्या जातात. मात्र त्याचे परिणाम दूरगामी होणारे असतात. त्या बैठकीत शिस्तीच्या चिंधड्या चिंधड्या झाल्या आणि बेशिस्तीचे जाहीर प्रदर्शन झाले. लोकप्रतिनिधी हे सूत्र थोडे बाजूला ठेवले, तरी व्यक्‍तीला शिस्त असणे का आवश्‍यक आहे ? ते ये या घटनेवरून अधोरेखित होते. मुळातच शिस्त नसेल तर ठिकठिकाणी बेशिस्तीचे जाहीर प्रदर्शन होत राहणार. शिस्त आणि बेशिस्त या गोष्टी एका म्यानात राहू शकत नाही. शिस्त आहे तिथे बेशिस्तीला थारा नाही. राजकीय क्षेत्रात हे प्रमाण किती आहे, हे जनतेला उत्तमप्रकारे ज्ञात आहे. कारण प्रत्येक घटनेवर जनतेची बारीक नजर आहे. या बेशिस्त लोकप्रतिनिधींना जनता जाब विचारणार का ? किंबहुना तो विचारलाच पाहिजे. तसे होत नसल्यानेच असे प्रकार पाहण्याची नामुष्की ओढवली आहे.

लोकसभागृहात गोंधळ आणि जनहितकारी बैठकीत हाणामारी. त्यामुळे राजकारण आणि शिस्त यांचे नाते किती दूरचे? किती जवळचे? अशा प्रकारे पराकोटीचा संताप शाळा-महाविद्यालयांत चालू तासिकेत शिक्षकांसमोरही कोणी व्यक्‍त करणार नाही. हा काही चेष्टेचा विषय नाही, तर अत्यंत गंभीर विषय आहे. खासदार त्रिपाठी यांच्याकडून बुटाने करण्यात आलेली मारहाण एवढी भयानक होती की यावेळी पूर्ण ताकद काढून समोरील व्यक्तीवर (आमदार बघेल यांवर) प्रहार करण्यात आले. या वेळी काही विपरीत ही घडू शकले असते. पण सुदैवाने तसे काही झाले नाही, असेच म्हणता येईल. बुटाने केलेल्या मारहाणीत समोरील लोकप्रतिनिधीला गंभीर दुखापत झाली असती तर ते प्रकरण तेवढ्यावरच न थांबता तिथेच अधिक चिघळले असते. विशेष म्हणजे रागाच्या जोशात एवढे प्रहार केले जात असताना उपस्थितांपैकी त्यात कोणालाही हस्तक्षेप करावासा वाटला नाही. जे घडतंय ते घडू दिले जात होते, अशी स्थिती होती. दोन्ही बाजूंनी जेव्हा एकमेकांवर शारीरिक कसरती दाखवण्यात आल्या. त्या नंतर पोलीस आणि अन्य मंडळी त्यांना एकमेकांपासून दूर नेले. आमदार समर्थकांच्या संतापाचा कडेलोट झाल्याने त्यांनी बैठक स्थळी धुडगूस घातला.

लोकप्रतिनिधीच हाणामारी करणारे आहेत असे म्हटल्यावर ते कार्यकर्त्यांना काय दिशादर्शन करणार? कसे वागावे? जनसेवा कशी करावी? हेच ज्यांना अजून कळणे शेष आहे, त्यांना लोकसभागृहात पाठवण्यासाठी पुन्हा तिकीट द्यायचे का? अशांना लोकसभागृहात निवडून पाठवायचे का? याचा मतदारराजानेच नीट विचार करावा. आपसातच ज्यांची एवढी धुसफूस आहे. ते जनतेचे प्रश्‍न कसे सोडवत असतील? असा प्रश्‍न पडणे साहजिकच आहे. जनतेचे प्रश्‍न सोडवण्यासाठी आपण लोकप्रतिनिधी झालो आहोत. त्यासाठी एकजुटीने काम करणे लांबच राहिले. येथे तर एकमेकांविरुद्ध मुठी आवळल्या जाऊन संतापला वाट करून देण्यात आली.

लोकसभा निवडणुकीत याचे पडसाद उमटणार नाहीत, हे कशावरून ? जे एकमेकांना एका बैठकीत डोळ्यासमोर बघून घेऊ शकले नाहीत, ते प्रचाराच्या रणधुमाळीत काय धुमाकूळ घालतील ? मुद्द्यावरून गुद्द्यावर येणे लज्जास्पद आहे. जेव्हा संवाद हरपतो तेव्हाच वाद निर्माण होतात आणि येथेही तेच झाल्याचे स्पष्ट दिसते. हाणामारी, वाद यातून काहीच साध्य होत नसते. तरीही या वाटेवर चालणे निरर्थकच ! गटबाजी हा विषय राजकीय पक्षांना नवीन नाही. पक्षात असा भाग काही प्रमाणात असणारच असे गृहीत धरून का चालायचे ? नेते, कार्यकर्ते यांत शिस्त बिंबवण्यासाठी ठोस उपाययोजना अत्यावश्‍यक आहे.

शिस्त नसलेली व्यक्‍ती बहुतांशी रागीट स्वभावाची असते. ‘अति राग आणि भीक माग’ असे एक वाक्‍य आहे. त्यामुळे काहीजण मनाविरुद्ध घडत असलेल्या प्रसंगातही रागाला आपल्यापासून चार हात लांब ठेवणेच पसंत करतात. म्हणजेच आपल्या एकंदरीत व्यक्‍तिमत्त्वावर त्याचा कुठेही प्रभाव पडणार नाही याची काळजी घेतात. हेच अत्यंत महत्त्वाचे आहे. येथे त्या व्यक्‍तीची संयमीवृत्ती लक्षात येते. रागाच्या आवेशात काय बोलले जाते, कृती केली जाते याचे काहीच भान नसते. त्यावेळी आपल्या मनाप्रमाणे जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत रागाचे व्यक्‍त होणे थांबत नाही. असा हा राग व्यक्‍तीच्या व्यक्‍तिमत्त्वावर गंभीर परिणाम करण्यासह शारीरिक हानी ही करतो.

यामुळे रक्‍तदाब वाढतो. अशा व्यक्‍ती उच्च रक्‍तदाबाच्या विळख्यात सहज अडकतात. अर्थातच स्वतःच स्वतःला अडकून घेतात. सभागृहाचे कामकाज पुष्कळदा काही कालावधीसाठी थांबवावे लागते. लोकसंख्या वाढ आणि त्यानुसार वाढणाऱ्या मूलभूत गरजा. यांप्रमाणे कोणत्याही देशाला कायम पुढची वाटचाल करत राहावी लागते. त्याप्रमाणे भारतही मार्गस्थ होतो आहे. त्यात नवीन असे काही नाही. हे सर्व होत असताना काही लोकप्रतिनिधींचा गोंधळ करण्याचा भाग मात्र ‘जैसे थे’ आहे. यात पालट कधी होणार?

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)