“रयत’च्या निमित्ताने राजकीय आढावा

पवारांची काही आमदारांसमवेत कमराबंद चर्चा

पदाधिकाऱ्यांनी केली तक्रार

रयत शिक्षण संस्थेच्या विद्यालयांमध्ये आमदारांनी शिफारस करूनदेखील प्रवेश मिळत नसल्याची लेखी तक्रार पदाधिकाऱ्यांनी केली. त्याचबरोबर रयतच्या अधिकाऱ्यांनी परस्पर प्रवेश केल्याची बाब देखील यावेळी पवारांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. आजपर्यंतच्या रयत आणि राष्ट्रवादीच्या इतिहासात अशा प्रकारे प्रथमच पवारांपर्यंत तक्रार देण्यात आल्यामुळे संस्थेच्या मुख्य कार्यालयातील वातावरण गंभीर झाल्याचे दिसून आले.

सातारा – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थेच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय आढावा सोमवारी घेतला. सोमवारी सायंकाळी पवारांनी रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, सत्यजित पाटणकर आणि जिल्हाध्यक्ष सुनील माने, तेजस शिंदे यांच्यासोबत अर्धा तास कमराबंद चर्चा केली. विशेष बाब म्हणजे यावेळी साताऱ्याचे आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले अनुपस्थित होते तर बैठकीनंतर पवार आ. शिंदेंना सोबत घेऊन बारामतीच्या दिशेने रवाना झाले.

सोमवारी रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरणात प्राण गमाविलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांची विचारपूस केल्यानंतर पवार पाटणमार्गे साताऱ्यात दाखल झाले. रयत शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पवारांचे आगमन होताच सुरूवातीला संस्थेचे चेअरमन अनिल पाटील यांनी स्वागत केले. त्यानंतर संस्थेत दाखल झाल्यानंतर उपस्थित रामराजे नाईक निंबाळकर व आ. बाळासाहेब पाटील यांनी पवारांचे स्वागत केले.

दरम्यान, नियोजनानुसार रयत शिक्षण संस्थेची बैठक होणार होती. मात्र, पवारांचे आगमन होताच त्यांनी रामराजे व आ. बाळासाहेब पाटील यांच्यासोबत कमराबंद चर्चेला सुरूवात केली. यानंतर काही वेळातच आ. शशिकांत शिंदे व तेजस शिंदे बैठकीला दाखल झाले. दरम्यान, पवारांना अर्धा तास आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. बैठकीनंतर सर्व जण बाहेर पडले तर पवारांनी रयतच्या पदाधिकाऱ्यांशी 20 मिनिटे चर्चा केली. मात्र, आ. शशिकांत शिंदे अखेरपर्यंत कार्यालयात थांबून होते.

पवार कार्यालयातून बाहेर पडले तेव्हा पत्रकारांनी संवाद साधण्याबाबत विचारणा केली. मात्र, प्रवास खूप झाल्याचे कारण सांगत त्यांनी संवाद साधणे टाळले. मात्र, बारामतीच्या दिशेने रवाना होताना पवारांनी आ. शशिकांत शिंदे यांना सोबत घेऊन गेले. त्याचबरोबर आ. शिवेंद्रसिंहराजे साताऱ्यात असूनही त्या ठिकाणी अनुपस्थित राहिल्यामुळे दोन्ही घटनांच्या चर्चांना राजकीय उधाण येण्यास सुरूवात झाली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)