राजकारण्यांच्या राजकीय रथयात्रा

वेचक – वेधक

द.वा.आंबुलकर

राजकीय पुढाऱ्यांना त्यांच्या राजकारणात, विशेषतः निवडणुकीच्या राजकारणात रथयात्रांनी वेळोवेळी चांगलाच हात दिलेला आहे. राज्यस्तरावरच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर पण हाच अनुभव वेळोवेळी आला असून त्यापैकीच काही निवडक राजकीय रथयात्रांचा हा मागोवा-

एन. टी. रामाराव ः “तेलगू देशम’ या नव्या पक्षाची स्थापना करणारे विख्यात तेलगू अभिनेते एन. टी. रामाराव यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या निवडणूक प्रचारादरम्यान “प्रचार रथ’ ही संकल्पना प्रचारात आणली.
1982 मध्ये आपल्या “चैतन्य रथम’ या प्रचाररथाच्या माध्यमातून 9 महिने कालावधीदरम्यान एन. टी. रामाराव ऊर्फ एनटीआर यांनी तत्कालीन आंध्र प्रदेशात सुमारे 75 हजार किलोमीटर्सचा व्यापक प्रचार-प्रवास केला होता.

चित्रपटसृष्टीतून येणाऱ्या एनटीआर यांनी त्यांच्या जुन्या व दुर्मीळ अशा शेवरलेट मोटारगाडीचा उपयोग करून विशेष स्वरूपात तयार केलेल्या “चैतन्य रथम’ च्या छतावर छोटेखाली आकर्षक मंच, ध्वनीक्षेपक व आकर्षक आसन व्यवस्था इ.ची व्यवस्था केली होती व त्यामुळे “चैतन्य रथम’ तत्कालीन राजकीय संदर्भात आकर्षण आणि चर्चेचा विषय ठरला होता.
आपल्या “चैतन्य रथ’ यात्रेतून एनटीआर यांनी 1983 मध्ये होणाऱ्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात त्यावेळी सत्तारूढ असणाऱ्या कॉंग्रेसला राज्यातील तेलगू भाषकांबद्दल कसलाही आदर अथवा सहानुभूती नाही हे जनसामान्यांना सांगण्यासाठी “मा तेलगू तलिक्की’ या राज्यगीताचा भरपूर प्रचार-प्रसार करून त्या प्रभावी प्रचाराद्वारे 1983 च्या निवडणुकीत सत्तारूढ कॉंग्रेसला पराभवाचे आस्मान दाखविले.

चौधरी देवीलाल ः हरियाणाच्या जाट-बहुल क्षेत्राचे प्रभावी राजकीय पुढारी म्हणून एकेकाळी गाजलेल्या देवीलाल यांनी 1989 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काढलेली “विजय रथ’ यात्रा त्यावेळी राजकीय आश्‍चर्य आणि उत्सुकतेचा विषय ठरला होता. देवीलाल यांच्या “विजय रथ’ या वातानुकूलित वाहनात छोटेखानी खान-पान यान व आरामदायी कक्षाचा समावेश करण्यात आला होता. “विजय रथ’ यात्रेदरम्यान चौधरी देवीलाल यांच्या भाषण आणि जनसंपर्काला मिळालेल्या प्रतिसादाचे चित्रीकरण करून त्यावर आधारित 18 “व्हिडीओ रथ’ तयार करून त्याद्वारे राज्यभर जोरदार प्रचार करून त्यावेळच्या लोकसभा निवडणुकीत लक्षणीय यश मिळविणाऱ्या देवीलाल यांना थेट उपपंतप्रधान होण्याचे राजकीय भाग्य लाभले होते.

या प्रारंभिक राजकीय रथयात्रांमध्ये अनेकार्थांनी गाजली ती भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांची “सोमनाथ ते अयोध्या’ ही 1990 मधील राम रथ यात्रा. या यात्रेद्वारा आडवाणीजींनी गुजरातमधील सोमनाथपासून उत्तर प्रदेशच्या अयोध्यापर्यंतची प्रदीर्घ “राम रथ’ यात्रा काढून त्याद्वारे भाजप आणि राम मंदिर निर्मितीच्या समर्थनार्थ जोरदार प्रचार केला होता.

लालकृष्ण आडवाणी यांच्या “राम रथा’साठी टोयाटो मिनी ट्रकचा मोठ्या कल्पकपणे वापर करण्यात आला होता. अयोध्येत राम मंदिर होण्यासाठी वातावरण निर्मिती करण्यासाठी आयोजित केलेल्या या “राम रथ’ यात्रेत लालकृष्ण आडवाणी यांना प्रमोद महाजन, नरेंद्र मोदी या भाजपच्या तत्कालीन दुसऱ्या फळीतील नेतृत्वाची पण मोठी साथ लाभली होती व या यात्रेनंतर भारतीय राजकारणाच्या मतदारांच्या मानसिकतेत मोठ्या प्रमाणावर धृवीकरण झाले व त्याचे प्रत्यंतर भाजपला सत्तेच्या जवळ नेऊन तर पोहोचविलेच, शिवाय 1992 मध्ये विश्‍व हिंदू परिषदेद्वारा अयोध्येत मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या कार सेवा- आंदोलनानंतर अयोध्येतील बाबरी ढाचा पण ढासळला गेला या साऱ्याच बाबी भारतीय राजकारण आणि राजकारण्यांसाठी पण निर्णायक ठरल्या.

भाजपचे 2014 च्या लोकसभा निवडणूक प्रसंगीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या लोकसभा निवडणूक प्रचाराच्या दरम्यान प्रकाशध्वनी यावर आधारित “नमो रथ’ या प्रचार रथांचा उपयोग निवडणूक प्रचारादरम्यान मोठ्या खुबीने व कल्पकपणे उत्तर प्रदेशात केला. “नमो रथ’ प्रचार योजनेअंतर्गत 400 महिंद्र मॅक्‍स मिनी ट्रक्‍सवर भाजपचे प्रचार साहित्य, दृक-श्राव्य पद्धतीने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रमुख नेत्यांची भाषणे, नरेंद्र मोदींची निवडक भाषणे इ. सचित्र दाखविण्यात येत होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)